लोकनेता न्युज नेटवर्क
आमचं गोजेगाव मोठं गमतीचं गाव! पंचक्रोशीतलं सर्वात मोठं गाव आमचंच. भवतालच्या गावाच्या बरोबरीत आमच्या गावात वेगवेगळे कार्यक्रम जरा जास्तच व्हायचे. दरवर्षी २६ जानेवारीला आमच्या गावाची जंगी जत्रा भरायची. गावच्या जत्रत लय मज्जा यायची. त्यावर पण मी लिहिणार आहे. गावच्या शिवारात दहा-पाच विहिरी होत्या. सगळा शिवार कोरडवाहू असल्यामुळं दिवाळीला सगळं उनगायचं! सगळा शिवार ढोरं-वासरं-शेळ्या चारायला मोकळा व्हायचा. त्यात सालभर गावात काही ना काही कार्यक्रम चालूच असायचे. आखाडीपासून ते पार शिमग्यापस्तोर कार्यक्रम असायचे. कोणताही कार्यक्रम असला की कार्यक्रमासाठी सगळा गाव झटायचा! लहान-मोठे-पोर्हसोर्ह सगळे एकत्र येऊन कार्यक्रम मोठा झन पार पडायचा. रामायणाची समाप्ती, लक्ष्मण शक्ती, नागपंचमी, पोळा, खंडोबाची जत्रा, पंढरपूर जत्रेच्या मावंज्या, गणपतीच्या काळात गावातल्याच कलाकारांची नाटकं, गावचा सप्ता, गोकुळाष्ठमी, रामनवमी सगळेच कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरे व्हायचे. त्यातल्या त्यात आमच्या गावची हनुमान जयंती मात्र मोठ्या अफलातून पद्धतीनं साजरी केली जायची! गावातले सगळे कार्यक्रम एकीकडं अन हनुमान जयंती एकीकडं!
हनुमान जयंतीची चर्चा अगोदर एकदोन दिवस व्हायची. गावातली बुजुर्ग मंडळी पारावर दोऱ्या वळत, चिलमिचा धूर काढंत मोठ्या गमतीनं चर्चा करायची. गेल्यावर्षी हनुमान जयंतीला तुरीची दाळ अन १० रुपये न देता कोण कोण जेवायला आलं(?) अन वर्हून वाढंण घेऊन गेलं याची मोठ्या चवीनं चर्चा व्हायची. दरसाली हनुमान जयंती साजरी करण्यासाठी पुढाकार घेणारा एकंच माणूस ते म्हणजे श्री गणपतराव सांगळे मामा उर्फ गणा मानकरी! कोणत्याही कार्यक्रमाचा मान मानकरी घराला असायचा, त्यात हनुमान जयंती आली की कोणत्याही मानपानाशिवाय ते पुढं होऊन हा कार्यक्रम करायचे. मानकरी म्हणजे गळ्यात मोठ्ठी तुळशीमाळ, कपाळावर अबीर-अष्टगंधाची शिडी, हातात काठी, बारीक आवाज अन मिश्कील स्वभाव. आधल्यादिवशीच मानकरी सगळ्या पोर्हायला पेटवायचे. “ये पोऱ्ह हो, घरी जाऊन तुमच्या माय-बापालं सांगा की; उद्या मारोती जल्माची पंगत हाये. त्यासाठी किलोभर तुरीची दाळ अन दहा रुपये द्या.” लगेच पोर्ह घरी जाऊन सांगायची. गावात हनुमान जयंतीची चर्चा सुरु व्हायची. गावाच्या मधोमध मोठमोठ्या शिळांनी बांधलेला आणि माळवद असलेला आमच्या गावचा पार म्हणजे वास्तुशिल्पाचा सुंदर नमुना! उन्हाळ्यात थंडगार अन हिवाळ्यात गरम रहायचा. कधी कधी हिवाळ्यात पाराच्या मागच्या वट्यावर उन येत असल्यामुळे जोशी सर आमचा चौथीचा वर्ग भरवायचे. मस्त उन लागायचं. उजळणीसोबत देवळातल्या घंटीचा “टन” आवाज यायचा.
हनुमान जन्म सूर्योदयाच्या वेळी झाल्यामुळे सगळी भजनी मंडळी चार वाजताच मारोतीच्या पारावर जमायची. साउंड सिस्टीम नाही काही नाही; तरीही दणदणीत भजन व्हायचं! आमचे बाबा श्री खंडूजी जायभाये मृदंगावर असायचे. मृदंगावर बाबांची थाप पडली की; सगळा पार दणाणून जायचा. किसनराव सांगळे, लोडबाराव सांगळे, नागोराव नागरे, विठोबा कांदे, किसन जायभाये, पंडितराव सांगळे, देवबा जायभाये ही सगळी बुजुर्ग मंडळी आणि यांच्या सोबतीला नाजूकराव सांगळे, आमचा नामादादा, गणा, सोपानदा ही नव्या थडीची मंडळी भजनाला असायची. पहाटे पहाटे सुरु झालेले दणदणीत भजन सगळा गाव जागे करायचे. टाळ-मृदंग गावात नवचैतन्य निर्माण करायचे. गावातील महिला दिवस उगवायच्या वेळेला पुजेचे ताट घेऊन यायच्या. बरोबर दिवस उगवायच्या वेळेला हनुमान जन्माचा अभंग घेऊन गावच्या मारोती मंदिरात गुलाल उधळला जायचा. “बजरंगबली हनुमान महाराज की जय!” गजर व्हायचा. पाच-पन्नास नारळ फोडली जायची. शिरणी वाटली जायची आणि सकाळचे हनुमान जन्माचे भजन संपायचे.
त्यानंतर बुजुर्ग मंडळी आणि विशेषतः गणा मानकरी लहान-मोठ्यांना घेऊन संध्याकाळच्या पंगतीची चर्चा करायचे. घरपरत एक किलो तुरीची दाळ अन दहा रुपये अशी पट्टी ठरायची आणि मानकरी मामासोबत तरून मंडळी, पोर्ह-सोर्ह पट्टी गोळा करायचे. कुणाकड तुरीची दाळ नसली तर गहू, ज्वारी, मुगदाळ किंवा जे देतील ते घ्यायचं. चार-दोन घराशिवाय सगळा गाव पट्टी द्यायचा. दुपारपर्यंत दाळ-दाणा जमा व्हायचा. सायंकाळच्या पंगतीला लागणारी तुरदाळ ठेवायची अन राहिलेली तुरदाळ बरोबरच पट्टीत जमा झालेले गहू, ज्वारी, मुगदाळ सर्व भुसार एकदोन लोक घेऊन औंढ्याला जाऊन ते विकून दाळीसाठी लागणारा मसाला, कांदे, लसून, चटणी इत्यादी घेऊन यायचे, तोपर्यंत पाराजवळचं चुल्हांगण पेटलं जायचं. गावातलेच आमचे काका श्री मारोतराव सांगळे म्हणजे एक नंबरचे दाळ फोडणी देणारे व्यक्तिमत्व! दाळीसाठी आधन ठेवणे, दाळ टाकण्यापासून ते फोडणीपर्यंतचं सगळं महत्वाचं काम काका मोठ्या निगुतीनं करायचे. त्यात त्यांचा हात कुणीच धरू शकत नव्हतं. सायंकाळच्या वेळेला पाराच्या भोवताल दाळीचा घमघमाट सुटायचा!
दिवस माळवायच्या वेळेला गायी घरी यायच्या वेळेला दत्तूदा वारकाकडून गावाला जेवायला बोलावलं जायचं. लोक घरून येतांनाच ताट, तांब्याभर पाणी, कांदा, लिंबू आणि भाकरी किंवा चपात्या घेऊन यायचे. पौर्णिमेच्या चांदण्यात पंगत बसायची. तरूण पोर्ह दाळ वाढायचे. “पुंडलिक वरदे हरी विठ्ठल! बजरंगबली हनुमान महाराज की जय!” गजर होऊन लोक मनसोक्त जेवायचे. पंचक्रोशीतील गावात पंगतीचे आवतन असायचे. पाहुणे मंडळी जेवायला बसायची. त्यांना वाढण्यासाठी चपात्या किंवा भाकरी नसायच्या. अशावेळी गणा मानकरी सगळ्या पंगतीतून “एक भाकर, एक भाकर” मागत फिरायचे. लोक एकदोन भाकरी-चपात्या जास्तीच्या आणायचे आणि मानकरी मामांना द्यायचे. त्यातून पाव्हणे मंडळीची मस्त जेवणं व्हायची. पुरुषांची पंगत उठली की महिलांची पंगत आणि शेवटी वाढे जेवायचे. संध्याकाळी पुन्हा दणदणीत भजन व्हायचे. मोठ्या आनंदात हनुमान जयंती संपन्न व्हायची!
काळ झपाट्याने बदलला. जुनी पिढी कालवश झाली. गावात लाईटचा उजेड आलाय. दगडाचा पार जाऊन भव्यदिव्य मारोतीचे मंदिर आणि सभा मंडप उभा राहिलाय. कोरडवाहू गोजेगावचा संपूर्ण शिवार पाण्याखाली आलाय. आता पहिल्यासारखे लोक गावात थांबत नाहीत. फाट्यावर हॉटेल झाले असून तिथे वाढदिवस साजरे होतात. लोकांकडे पैसा आलाय. मातीची घरे जाऊन सिमेंटची घरे उभी राहिलीत. सगळे बदल झाले परंतु पूर्वीसारखी हनुमान जयंती आज गावात साजरी होत नाही. ती दाळीची चव आता गावात येत नाही! बाबा, जुनी भजनी मंडळी, एक भाकर मागणारे गणा मानकरी, दाळ फोडणी देणारे मारोतराव काका देवाघरी गेले. कालच गावाच्या व्हाट्सएप ग्रुपवर हनुमान जयंतीला गाव भगवा करायचे आव्हान केले आणि माझी हनुमान जयंतीची आठवण जागी झाली. आज हनुमान जयंतीच्या दिवशी तरुणांनी हनुमंताचे बुद्धिमंत, शक्तिशाली, पराक्रमी, एकनिष्ठता, शक्ती-युक्ती, शौर्य, वीरता, चपळ, विरक्त, वीर्यवान इत्यादी गुण अंगी बाळगण्याची नितांत गरज आहे. विविध सण-उत्सवाच्या माध्यमातून समाजमनाची मजबूत जडणघडण होऊन बंधुभाव, धर्मसहिष्णूवृत्ती वृद्धिंगत होऊन राष्ट्रप्रेम वाढीस लागावे या दृष्टीने कार्यक्रम होत राहावेत. गावागावातून दारू, गुटखा, तंबाखू इत्यादी व्यसनं हद्दपार होऊन सर्वलोक सन्मार्गी लागून श्रीराम-हनुमान यांचे भक्त होऊन त्यांच्याप्रमाणे सद्गुणी व्हावेत हीच हनुमंतरायाच्या चरणी विनम्र प्रार्थना! जय हनुमान!
प्रा.डॉ.विठ्ठल खंडूजी जायभाये
कै.रमेश वरपूडकर महाविद्यालय, सोनपेठ
जि. परभणी (महाराष्ट्र)
मो. 9158064068
(टीप: लेखक हे व्याख्याता, कवी, किर्तनकार, समीक्षक, योग-प्राणायाम प्रशिक्षक आहेत.)
_____________
I don’t think the title of your article matches the content lol. Just kidding, mainly because I had some doubts after reading the article.