May 20, 2024

आमुचे आदर्श : राष्ट्रमाता जिजाऊ-स्वामी विवेकानंद

This get from this site or source

लोकनेता न्यूज नेटवर्क

 मातेच्या दैदिप्यमान कर्तृत्वाने आणि सुसंस्कारित पालन पोषणाच्या बळावर अनेकविध सुपुत्रांनी आकाशाला गवसणी घालण्याचे भव्य-दिव्य कार्य केल्याचा इतिहास सर्वसाक्षी आहे! पुरुष कितीही बलशाली आणि स्वतःला श्रेष्ठ समजत असला तरी त्याला मातृऋण कधीच फेडता येत नाही, म्हणूनच

सुशीलो मातृ पुण्येन पितृ पुण्येन चातुरः |
औदार्यं वंश पुण्येन आत्मा पुण्येन भाग्यवान् ||


हे संस्कृत सुभाषितातसुद्धा आईचे ऋण सर्वप्रथम व्यक्त करते. आईच्या संस्काराने पुत्र-कन्या सुशील, वडिलांमुळे चतुर, कुटुंबामुळे उदार आणि स्वकर्तृत्वामुळे भाग्यवान बनतात! एवढे लिहिण्याचे कारण म्हणजे आज राष्ट्रमाता जिजाऊ आईसाहेब आणि प्रज्ञावंत सुपुत्र स्वामी विवेकानंद यांची जयंती!
            छत्रपती शिवबांसारखे पुत्ररत्न घडवून आपल्या सर्वांगीण संस्काराने ज्या मातेने स्वबळावर रयतेचे साम्राज्य उभे केले अशा राष्ट्रमाता जिजाऊ आईसाहेब यांचा इतिहास सुद्धा तेवढाच भव्य आणि दिव्य आहे! बालवयात वेरुळच्या भोसले घराण्यातील शहाजीराजे भोसले यांच्याशी त्यांचा विवाह झाला. संघर्ष जिजाऊंच्या पाचवीलाच पुजला होता. जाधव-भोसले यांच्यात बेबनाव झाला. दुर्दैवाने दोन्ही घरात प्रचंड वितुष्ट आले, परिणामी जिजाऊंचे माहेर कायमचे तुटले, परंतु न डगमगता त्यांनी शहाजीराजे भोसले यांचा संसार उजळवून टाकला. आई या नात्याने जिजाऊंसमोर अनंत अडचणींचे पहाड उभे होते. त्यातच शहाजी राजांना पुणे परगणा सोडून बंगळूरूला जावे लागले. जेष्ठ पुत्र संभाजींनी आपल्या वडिलांना भक्कम साथ दिली तर इकडे जिजाऊंनी शिवबांना मजबूत-तल्लख बनवले. मुघलशाही-कुतुबशाही-आदिलशाही-निजामशाही या बलाढ्य शाह्यांशी चार हात करण्याचे शारीरिक आणि मानसिक सामर्थ्य शिवबामध्ये ठासून भरले. काळ मोठा खडतर होता. गाढवांचा नांगर फिरलेल्या पुण्याच्या भूमीत अठरापगड जातीतील मावळ्यांच्या साथीने सोन्याचा नांगर फिरविण्याचे महत्कार्य जिजाऊंनी केले! अशा शूर-धाडसी-पराक्रमी मातेचे बाळकडू लाभलेल्या शिवबांनी वयाच्या सोळाव्या वर्षी तोरणा किल्ला काबीज करून स्वराज्याचे तोरण बांधले आणि नंतर मागे वळून पहिलेच नाही!             एकावर एक आक्रमणे आणि शह-काटशह यांनी दररोजचे जीवन व्यस्त-त्रस्त होत असतांना शिवबांच्या पाठीशी त्या खंबीरपणे उभे राहिल्या! युद्ध किंवा व्यवहारकुशलते प्रसंगी सूक्ष्म निरीक्षण-परीक्षण-मार्गदर्शन करण्याचे महत्वपूर्ण कार्य मांसाहेब जिजाऊंनी केले. विजापुर-मुघलसाम्राज्याशी संघर्ष, अफजलखान प्रकरण, पन्हाळगडचा वेढा, पावनखिंड लढाई, शाहिस्तेखान प्रकरण, सुरतची लुट, पुरंदरचा तह, आग्रा प्रकरण, मुघलांसोबत तह, उमराणी-नेसरीची लढाई आणि छत्रपती शिवबांचा राज्याभिषेक या सर्वच घटना सर्वसामान्यांचे डोळे दिपवून टाकणाऱ्या आहेत आणि या पाठीमागे खंबीर मार्गदर्शन कुणाचे असेल? तर ते ते मातोश्री जिजाऊंचे! जिजाऊंनी केवळ स्वराज्यच उभे केले नाही तर आपल्या मुलांमध्ये प्रचंड आत्मविश्वास आणि संघर्ष करण्याची जिद्द निर्माण केली! छत्रपती शिवबांनी केलेले कार्य हे केवळ शक्तीचे कार्य नसून त्यामागे प्रचंड बुद्धिचातुर्य होते हे लक्षात घ्यावे लागेल. जात-धर्म-पंथ याचा संकुचित विचार कधी कुणाला शिवला नाही. सामान्यातील सामान्य आणि शिवबा समान मानून स्वराज्याची बांधणी माता जिजाऊंनी मोठ्या धीरोदत्तपणे केली आणि घराघरांत जाज्वल्य आत्मविश्वास पेरण्याचे महत्कार्य या मातेने केले! याचाच परिणाम म्हणजे लोक स्वराज्यासाठी स्वतःचा जीव द्यायला तयार झाले! शिवा काशिदांसारख्या अनेकांनी हसत हसत स्वराज्यासाठी बलिदान दिले आणि त्यावर ‘बहुजन हिताय’ शिवबांनी आपल्या राजमुद्रेसह रयतेचे मराठी स्वराज्य संस्थापित केले!
            तसेच आज एक दैदिप्यमान व्यक्तिमत्व,  तेजोमय ब्रह्मचर्य, अमोघ वाणी आणि ज्ञान-ध्यान-साधनेने ओतप्रोत लेखणीच्या सामर्थ्यावर जगाला आपली ओळख निर्माण करणारे नरेंद्र नाथ दत्त म्हणजेच स्वामी विवेकानंद जयंती म्हणजेच राष्ट्रीय युवक दिन! त्यांनी शिकागो जागतिक धर्मपरिषदेत “बंधू-भगिनींनो” शब्दांनी संपूर्ण जगाला भारताच्या “वसुधैव कुटुंबकम” तत्वाची ओळख करून दिली. जेमतेम ३९ वर्ष आयुष्य लाभलेले स्वामीजी म्हणजे “ते चालते ज्ञानाचे बिंब | तयाचे अवयव ते सुखाचे कोंब ||” असे म्हणणे वावगे ठरू नये! रामकृष्ण परमहंस यांच्या गुरुतत्व स्पर्शाने स्वामी म्हणजे अध्यात्मिक-वेदांत दर्शनाने ओतप्रोत व्यक्तिमत्व बनले! नैष्ठिक ब्रह्मचर्य, बलोपासना, ज्ञानसाधना, ध्यान धारणा, आत्मसन्मान, आत्मभान, आत्मविश्वास या सद्गुणांच्या बळावर मनुष्य आकाशाला गवसणी घालू शकतो हे सिद्ध केले. धार्मिक अवडंबर, ब्राह्मण्यवाद, पुरोहीतवाद, धर्माचे बीभत्स प्रदर्शन याला परखड विरोध करतांना “ईश्वर मंदिरात नसून तो माणसामाणसात आहे ही वृत्ती म्हणजेच खरा हिंदू धर्म होय!” असे स्वामीजी प्रतिपादन करत. स्वामीजींनी अजीवन युवकांना प्रेरित केले! “उठा, जागे व्हा. स्वतः उठा आणि इतरांना उठवा. मनुष्यजन्म सुफळ करा आणि आपले ध्येय्य साध्य होईपर्यंत थांबू नका!” हे स्वामीजींचे शब्द म्हणजे तरुणांपासून ते शंभर वर्षाच्या माणसाने जीवनात अंगिकारण्यासारखे आहेत! युवकांमध्ये नित्य स्फुल्लिंग चेतविण्याचे महत्कार्य स्वामीजींनी केले. बलदंड देहयष्टी, दैदिप्यमान-विद्वत्प्रचुर व्यक्तिमत्व, अंगावर भगवे वस्त्र आणि भगवा फेटा परिधान केलेले स्वामीजी म्हणजे दिव्यत्वाची प्रतीती! अल्पायुष्यात जगभर व्याख्याने, प्रचंड लेखन यातून “अध्यात्म-विद्या और भारतीय दर्शन के बिना विश्व अनाथ हो जायेगा” असे प्रतिपादन करून स्वामीजींनी भारताच्या ज्ञान समृद्धीला झळाळी दिली. स्वामी विवेकानंद केवळ संत नव्हते तर ते एक महान देशभक्त, विचारवंत, वक्ता, लेखक आणि मानवप्रेमी व्यक्तिमत्व होते! “शिक्षण म्हणजे ज्यातून विद्यार्थी शारीरिक, मानसिक आणि आत्मिक विकसित झाला पाहिजे. शिक्षणातून चरित्र-चारित्र्य घडले पाहिजे. मन-बुद्धी विकसित होऊन विद्यार्थी आत्मनिर्भर बनला पाहिजे. आचरण-संस्कारसंपन्न शिक्षण गरजेचे आहे. शिक्षक-विद्यार्थी संबंध दृढ असावे. शिक्षक अत्यंत महत्वपूर्ण घटक असून तो आनंदी-सहिष्णू-प्रज्ञावंत-निर्व्यसनी असावा, त्याचा चुंबकीय प्रभाव आपल्या विद्यार्थ्यांवर नित्य राहील. देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी तंत्रशिक्षण आवश्यक आहे. शिक्षणातून जीवनात संघर्ष करण्याची वृत्ती जोपासली जावी.” शिक्षणाविषयी असे मौलिक विचार स्वामीजींनी प्रतिपादन केले. संपूर्ण जीवन केवळ आणि केवळ देशोत्थानासाठी अर्पण केले. स्वामीजींचे जीवन सर्वांसाठी आदर्श, नित्य मार्गदर्शक आहे!
            आज एका मातेची आणि सुपुत्राची जयंती साजरी करतांना केवळ पुष्पहार घालून, वंदन करून चालणार नाही. आजही काळ तेव्हढाच खडतर आहे! नवनवी आव्हाने आपल्यासमोर आ वासून उभी आहेत! पैशापायी माणूस आपले सर्वस्व हरवून बसला आहे. मोबाईल नावाच्या राक्षसाने घरदार गिळंकृत केले आहे! माणसांत माणूस राहिला नाही! माणूस बोलायला तयार नाही! गर्दीत सुद्धा माणूस वेड्यासारखा त्या डबड्यासोबत खेळतोय! एकटाच हसतोय! सगळीकडे वेडेच वेडे! जेवतांना अन कुठेपण मोबाईल! हे चित्र महाभयंकर आहे! आपले आदर्श आईसाहेब जिजाऊ किंवा स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीदिनी आपल्याला काही संकल्प करावे लागतील. लहान मुलांना मोबाईलपासून दूर ठेवावे लागेल! घराघरांत ग्रंथ वाचन अत्यावशक आहे. आई-वडिलांनी घरात सकाळ-सायंकाळ मोबाईल बंद ठेवून प्रार्थना म्हणावी लागेल! निरोगी-आनंदी जीवनासाठी सर्वांनाच व्यायाम-योगा-प्राणायाम-ध्यान करावेच लागेल! मोबाईल ऐवजी  मैदानावर खेळ खेळावे लागतील. घरातील आई-वडिलांनी पुस्तक घेऊन बसावे लागेल, जेणेकरून घरातील इतर त्याचे अनुकरण करतील! असे झाल्यास घराघरांत जिजाऊ आणि त्यानंतर शिवराय आणि स्वामी विवेकानंद जन्माला येतील, अन्यथा आणखी एक जयंतीचा इव्हेंट पूर्ण होऊन तो कॅमेऱ्यात बंदिस्त होईल, बस्स!

प्रा.डॉ.विठ्ठल खंडूजी जायभाये
कै.रमेश वरपूडकर महाविद्यालय, सोनपेठ
जि. परभणी (महाराष्ट्र)
मो. 9158064068
(टीप: लेखक हे व्याख्याता, कवी, किर्तनकार, समीक्षक, योग-प्राणायाम प्रशिक्षक आहेत.)

____________________________________

🪀सर्व महत्वाच्या अपडेट मिळवा Whatsapp वर नंबर सेव्ह करा व लोकनेता न्युज ला जॉईन व्हा 👉 https://join.elokneta.in

About Post Author

error: Content is protected !!