May 9, 2024

भाग २ – स्त्रियांची अब्रू आणि छत्रपती शिवाजी महाराज

लोकनेता न्युज नेटवर्क

     अलीकडच्या दहा वर्षांत सर्वच महापुरुषांच्या जयंत्या-मयंत्या मोठ्या प्रमाणावर साजऱ्या होत आहेत. नक्कीच ही आनंदाची बाब म्हणावी लागेल! जयंती-पुण्यतिथीच्या निमित्ताने दिवंगत महामानवाच्या कार्याचा उहापोह होऊन त्यांचे कार्य सर्वसामान्य लोकांना अवगत होते आहे. खरंच, या अगोदरचा काळ कसा असेल? महात्मा फुल्यांनी १८६९ साली रायगडावरील छत्रपतींची समाधी शोधून काढली आणि पहिली शिवजयंती साजरी केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पोवाड्यातून महाराजांचे दैदिप्यमान कार्य पुनरुज्जीवित केले. आपल्या काव्यातून ज्योतीरावांनी रयतेचा खराखुरा राजा शिवछत्रपती सांगितला. धर्म किंवा जातीच्या अभिनिवेशात शिवराय लोकांना सांगितले नाही.        
            अत्यल्प काळात छत्रपती शिवाजी महाराज लोकांना आपल्या प्राणापेक्षाही प्रिय का वाटू लागले? घरांघरांतील माय-माउली शिवबाला आपला पुत्र, वडील किंवा रक्षणकर्ता, पालनहार का मानू लागली? याची उत्तरे शिवचरित्रात आहेत. बखरकारांनी या बाबी नोंदवून मोठे उपकार केले आहेत असे म्हणणे वावगे ठरू नये. आपल्या राजासाठी रयत प्राणार्पण करायला निघाली याचे कारण म्हणजे हा राजा रयत आपलं कुटुंब मानत होता. रयतेच्या घरची अब्रू ही आपली इज्जत मानत होता. त्यामुळेच घराघरांतून छत्रपतींना सुवासिनी औक्षणातून अनंत आशीर्वाद देत होत्या, मनभरून आशीर्वाद देत होत्या. याचं कारण म्हणजे महाराजांचे शिल आणि चारित्र्य होय! शिवबांनी आपल्या राज्यांत स्त्री अब्रूचे विशेष रक्षण केले. त्या काळात राजाचे नौकर स्त्रियांची इज्जत कवडीमोल मानत, मात्र छत्रपतींनी रयतेची काळजी घेतली. “रयत राजाशी कशी वागते हे राजा रयतेशी कसा वागतो यावरून ठरते. राजा रयतेची एकपट काळजी करू लागला, तर रयत राजाची दसपट काळजी करते.” या लोकन्यायाने शिवराय कार्य करत होते. स्त्रियांच्या अब्रूसंबंधी महाराजांचा दृष्टीकोन सर्वश्रेष्ठ होता. त्याकाळी स्त्रियांच्या अब्रूला किंमत नव्हती. “राजेरजवाडे, राजपुत्र, सरदार, वतनदार, जमीनदार, देशमुख, पाटील यांच्या दृष्टीने गोरगरिबांच्या लेकी-सुना म्हणजे त्यांना हव्या त्या वेळी उपभोगण्याच्या वस्तू होत्या.” दाद कुणाकडे मागायची? ज्यांच्याकडे दाद मागायची तेच अब्रू लुटत होते. यासंबंधाने छत्रपती शिवाजी महाराजांचा कायदा मात्र कठोर होता. रांझ्याच्या पाटलाने गरीब शेतकऱ्याच्या पोरीवर अत्याचार केलेला ऐकल्याबरोबर शिवाजी महाराजांनी त्यास कैद करून तात्काळ पुण्याला आणले आणि त्याचे हात-पाय कलम केले. या कृतीने वतनदार-पाटील-देशमुखांना जबर जरब बसली. जनता शिवाजी महाराजांना “आपल्या इज्जतीचा रक्षणकर्ता” मानू लागली. हाच न्याय महाराजांनी सकुजी गायकवाड यांच्या बाबतीत केला. बेळवाडीच्या किल्ल्याची किल्लेदार सावित्रीबाई देसाई या लढवय्या स्त्रीची सकुजींनी बेअब्रू केल्यामुळे सकुजीचे डोळे काढण्याची शिक्षा केली. त्याचबरोबर कल्याणच्या सुभेदाराची सून दरबारात हजर केली असता, “अशीच आमुची माता असती तर आम्हीही सुंदर झालो असतो,” ऐसे वदले छत्रपती! रयतेच्या मातृ-शिलरक्षणाचे बाळकडू आपल्या मातोश्रीकडून मिळाले होते. याचा परिणाम म्हणजे रयत शिवाजी महाराजांना आपला तारणहार-रक्षणकर्ता मानू लागली. बिनदिक्कतपणे आपली तरुण मुले त्याच्या दिमतीला देऊ लागली.
            आज लोकशाही राज्यांत छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजेशाहीतील न्यायाएवढा तात्काळ आणि कठोर न्याय आहे काय? न्यायाला उशीर करणे म्हणजे न्याय नाकारणे होय. आज शहरात-खेड्यांत रोजच बलात्कार होताहेत. पिडीतेला आणि कुटुंबियांना न्याय मिळत नाही. न्याय देवतेने खरोखरची डोळ्यांवर पट्टी बांधली आहे की काय? असा प्रश्न आज सर्वसामान्य जनतेला पडतोय. अत्याचार करणारा जितका मोठा वतनदार, श्रीमंत, राजकारणी तितकी त्याची लवकर सुटका होत आहे. हे गुन्हेगार हातच शिवजयंतीच्या कार्यक्रमाचे उद्घाटक असतात. त्यांच्या हाताने शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन होत आहे. हे भयंकर आणि जळजळीत वास्तव आहे! सज्जनहो, हे थांबायला हवे! राज्यकर्त्या आणि पोलीस प्रशासनाने छत्रपती शिवरायांची शासन व्यवस्था, न्याय प्रमाण मानून कायद्याच्या कसोटीत गुन्हेगारांना तात्काळ कठोर शासन आणि पीडितांना न्याय द्यायला हवा. यासाठी आपण सार्वांनीच काम करावे लागेल. असा न्याय होणे म्हणजे खरी शिवजयंती साजरी करणे होय! अन्यथा केवळ एक इवेंट! जय हिंद! जय शिवराय!

प्रा.डॉ.विठ्ठल खंडूजी जायभाये
कै.रमेश वरपूडकर महाविद्यालय, सोनपेठ
जि. परभणी (महाराष्ट्र)
मो. 9158064068

(टीप: लेखक हे व्याख्याता, शिवचरित्रकार, कवी, किर्तनकार, समीक्षक, योग-प्राणायाम प्रशिक्षक आहेत.) 

___________________________

🪀सर्व महत्वाच्या अपडेट मिळवा Whatsapp वर नंबर सेव्ह करा व लोकनेता न्युज ला जॉईन व्हा 👉 https://join.elokneta.in/

About Post Author

error: Content is protected !!