महापुरुषांना बंदिस्त करू नका-ह.भ.प.प्रा.डॉ.विठ्ठल जायभाये

लोकनेता न्युज नेटवर्क

सोनपेठ :- सोनपेठ तालुक्यातील शेळगाव (महाविष्णू) येथील अखंड हरिनाम सप्ताहात शिवजयंतीदिनी जायभाये महाराज बोलत होते. मागील अनेक वर्षांपासून शेळगाव महाविष्णू येथे सर्व जाती-धर्मातील युवकांच्या पुढाकाराने आणि बुजूर्गांच्या मार्गदर्शनाखाली डोंगरावरील श्री सोमेश्वर जागृत संस्थानच्या परिसरात अखंड हरिनाम सप्ताह संपन्न होत आहे. यावर्षी सहाव्या दिवसाची किर्तनसेवा शिवजयंतीच्या दिवशी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध शिवव्याख्याते, कवी, प्रबोधनकार ह.भ.प.प्रा.डॉ.विठ्ठल जायभाये यांची संपन्न झाली. “जिंकावा संसार I तेणे नावे तरी शूर II” या जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या अभंगावर कीर्तन निरूपण करतांना छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास त्यांनी कथन केला. शिवाजी महाराजांचे चरित्र, चारित्र्य, धैर्य, शौर्य, चातुर्य इत्यादी अंगाने कर्तृत्व, नेतृत्व सांगतांना वर्तमानकाळ मोठा खडतर असून महापुरुषांना जाती-धर्माच्या रंगात अडकवू नये असे सांगितले. त्याचबरोबर तरुणांनी शिवराय आपल्या जीवनात आदर्श म्हणून उतरवावेत. व्यसनांचा त्याग करा, दारू पिऊ नका, गुटखा-तंबाखू खाऊ नका. व्यसनांनी समाज रसातळाला जात असून लोकांनी वेळीच सावध व्हायची वेळ आली आहे. आज आपण सावध झालो नाही तर काळ याहूनही खडतर येणार आहे. आई-वडिलांनी शिवाजी महाराजांच्याप्रमाणे आपल्या मुला-मुलींवर संस्कार करावे लागतील. असे झाल्यास शिवजयंती आणि अखंड हरिनाम सप्ताहाचे खऱ्या अर्थाने फलित होईल असे प्रतिपादन जायभाये महाराजांनी या प्रसंगी केले. या कीर्तनाला शेळगावातील तमाम भाविक भक्त, अबाल वृद्धांनी मोठ्याप्रमाणावर हजेरी लावली होती. या कीर्तनासाठी मृदंगाचार्य ह.भ.प. श्री ज्ञानराज महाराज हारकाळ, गायनाचार्य ह.भ.प. श्री परमेश्वर काका कदम, ह.भ.प.श्री राजेभाऊ महाराज चांदवडे, ह.भ.प. एकनाथ महाराज कुंभार, ह.भ.प.बबन महाराज कराड, ह.भ.प.हेंडगे महाराज, ह.भ.प.नरहरी महाराज आदी गुणिजन मंडळी उपस्थित होती. कार्यक्रमाची रूपरेषा ह.भ.प.लक्ष्मण महाराज वाघमारे यांनी केली तर संपूर्ण कार्यक्रमाचे श्री संत दर्शन या चॅनेलवरून थेट प्रक्षेपण ह.भ.प.श्री गणेश निरस यांनी केले. शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरती आणि जयघोषाने कार्यक्रमाची सांगता झाली.

_________________________________

🪀सर्व महत्वाच्या अपडेट मिळवा Whatsapp वर नंबर सेव्ह करा व लोकनेता न्युज ला जॉईन व्हा 👉 https://join.elokneta.in/

About Post Author

error: Content is protected !!