May 20, 2024

“वेडा मामु”

लोकनेता न्युज नेटवर्क

        जन्माला येणारी सर्वच माणसे ही शरीराने परिपूर्ण असतातच असे नाही. देवाने प्रत्येकात काही ना काही उणीवा ,चांगलेपणा हा दिलेला असतो . साधू संतांच्या मते पूर्व जन्माच्या पुण्यावरून आपल्याला देह, भोग नशिबी आलेला असतो. आपल्या सुकर्मामुळे रूप ,रंग ,ऐश्वर्य, सुख प्राप्त होते.काहीना व्यंगत्व मिळते. “ज्याच्या त्याच्या हाती आहे कर्तव्याचे माप”.
     मी एकटीच एकांतात बसले होते .सहजच माझ्या मनाने माहेरी भरारी घेतली .माझ्या वडिलांना गेवराई येथे शिक्षकाची मानाची नोकरी जिल्हा परिषद शाळेत होती. तसं वंश परंपरेने माझं माहेर मोहनाळ पण माझा जन्म ज्या गावात झाला, जिथे मी लहानाची मोठी झाली .तिथेच असताना माझं लग्न झालं, मुलं झाली. त्यामुळे मी गेवराईलाच माझं माहेर मनस्वी मानते .मला आठवण आली माझ्या माहेरच्या प्रत्येक जणांची, गोष्टीची. गेवराईतल्या एका एका व्यक्तींला वैयक्तिक मी ओळखते व ते मला तितक्याच प्रेमाने अाक्की या प्रेमळ नावाने बोलतात.हा घरोबाच नाही का?
       प्रत्येक व्यक्तीं ही मला माझीच वाटते व त्यांना मी त्यांची वाटते .”खरंच जीव लावावा लागतो आणि लावून घ्यावा लागतो” हे तितकच खर आहे. मी उघड्या डोळ्याने मनाला पंख लावून सर्वांना भेटायला आठवल आली की गेवराईला जाते . महाभारतातल्या संजय च्या नजरेने सर्व दृश्य पाहते. मीच दोन्ही पात्रे साकारते. सर्वांना भेटत असताना जो आनंद मला मिळतो तो मी शब्दात सांगू शकत नाही. कारण तो अनुभवा लागतो. त्याप्रती तेवढा गोडवा ही मनात असायला हवा नाही का? मी पूर्ण गावात मनसोक्तपणे फिरते. शाळेत, कॉलेजात, घराघरात, मंदिरात सर्व ठिकाणी जाते.सर्वांना बोलते. फार समाधान मिळतं .माझी तिथल्या मातीत नाळ एकरूप झालेली आहे. मला असं वाटतं की जर का मला तिथ नेऊन सोडलं तर मी हसत हसत गावाला आणि गावातील व्यक्तींना पाहून माझं उरलेलं आयुष्य सुखा समाधानाने घालवील.नको संसार आणि संसाराचा हव्यास. एवढं प्रेम मी गेवराईवर आणि गेवराईकरांवर करते हे कटू सत्य आहे. खरंच फारच मोह आहे मला माझ्या माहेरावर कारण ते माझ सर्वस्व आहे.
      हं तर असंच मन भरारी घेत असताना मला लक्ष्मीनारायण मंदिर दिसल. मंदिराच्या ओट्यावर बसणारी एक विकृत व्यक्तिमत्व असलेला व्यक्ती आठवली,दिसली. ज्याला बोलता येत नव्हतं. हातानेच तो इशारे करून सर्वच बोलून जात होता. खरंच समाजाचे नियम ही काही औरच असतात ना “माणसाने माणसाप्रमाणे राहिल्यासच त्याला समाज माणूस समजताे अन्यथा वेडा “.
      माझ्या लहानपणाची गोष्ट आठवते आम्ही ब्राम्हण (भट्ट)गल्लीत राहत होतोत.त्या ठिकाणी अनेक चिमण्यांची घरटी होती .चिमण्यांच्या घरट्यातून जर का एखाद्या चिमणीचं पिल्लू खाली पडलं आणि आम्ही जर त्या पिल्लाला हात लावण्याची धडपड केली तर तेथील वयस्कर ब्राह्मण स्त्रिया आम्हाला म्हणत “अरे लेकरानो त्या पिल्याला हात लावू नका. नाहीतर त्यांचे आई वडील व इतर चिमण्याही त्यां पिल्लाला त्यांच्या घरट्यात घेणार नाहीत.” खरंच तसं त्या करतात का ?आणि त्याप्रमाणेच हा समाजही व्यग व्यक्तीला समाजबाह्य टाकतो !असं व्हायला नकोय .ते पिल्लू ही आणि तो मामूही त्यांच्याच जातीचे अंश होते ना!तर मग अस का?अंतर मन हे प्रतेकाच दुखतं पण बाह्य मन अहंकाराने आवर घालत. त्या व्यक्तीला वेडामामू ही उपाधी गाववाल्यांनी बहाल केली होती .त्याने ती हसत मुखाने स्वीकारली होती. गल्लीतील स्ञीया त्याला उरलेलं अन्न ,वस्त्र देत असे. निवारा मात्र मंदिराचा कोपरा असलेला ओटाच होता. त्याचं ते वेड विश्व त्यातच तो मशगूल होता. तेच त्याचं सर्वस्व होतं. त्याला कपड्यांमध्ये कोट घालायला फार आवडत होत. पूर्वी श्रीमंत माणसे कोट घालायची. त्यामध्ये अट्टल हे प्रसिद्ध त्याकाळचे श्रीमंत घराणे होते. त्यांचेच लक्ष्मीनारायणचे मंदिर होते. सुंदर,मोहक असं रमणीय मंदिर आहे .वेड्या मामु रोज तिथल्या वास्तव करणार्या आलिशान वाड्यातील व्यक्तीना कोटात पाहत होता. त्यांच राजेशाही राहणीमान पाहून त्यालाही कोट घालून राजा व्हावस वाटत होत . तो येता जाता गयावया करून म्हणत मलाही तुमच्यासारखा कोट द्या ना. विनीत अट्टाहास तो दररोज हातानेच खू़ुणवून करत असे. इतरांच्या मानाने अट्टल घराण्याचा पेहराव हा वेगळा आहे हे त्या वेड्यामामूने ओळखले होते मग त्याला आपण वेड कसं म्हणावं.
       आट्टलाचे पूर्वज काकाजी त्यांचे जूने झालेले कोट वेडया मामूला देत.त्यांना कमीपणा वाटत नव्हता कारण अती श्रीमंत माणसे ही मनाने देखील श्रीमंत,दयावान असतात .त्यांना श्रीमंतीचा कधीही गर्व नसतो. ते अशाच असाह्य व्यक्तीतच देव पाहतात.” जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा” ही उक्ती त्यांना लागू पडते. म्हणूनच” त्यांच्या घरी लक्ष्मी पाणी भरते ‘असं म्हणतात. ते घराणे प्रत्येक व्यक्तीला आदरान.मानान बोलतात कारण माझ त्यांच्या घरी लहानपणी येण जाण होत. पंडीत नावाची त्याची नात माझ्या वडिलांकडे ट्युशनला येत होती आणि त्या घराण्यातली सर्वही माझ्या वडिलाकडे ट्युशनला येत होते. त्यामुळे त्याच्या आमच्यात एक प्रकारचा कौटुंबिक गोडवा होता. मी त्यांना अगदी जवळून पाहिलेलं आहे.
वेड्या मामूला ज्यावेळेस कोट भेटला त्या वेळेला त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला .त्याच्या चेहऱ्यावर , डोळ्यात एक वेगळच तेज चमकू लागलं एखाद्या राजाने किल्ला जिंकल्यावर जो स्वर्गीय आंनद,शान,मान त्याला मिळतो त्याप्रमाणे त्याची अवस्था झाली होती. गडबडीने त्याने तो कोट अंगातल्या शर्टावर परिधान केला .जवळ दोन पॅंटी होत्या .एक पॅन्ट अंगार होती दुसरी पण लगेच त्यांनी पॅंटीवर पॅन्ट घातली. पायात काळा जाड बूट होता. बूट डबल घातला आला असता तर तोही त्यांनी डबल घातला असता. मग काय बूटा, सूटात, कोटात वेडा मामू अगदी जेंटलमॅन दिसू लागला .अवकाळी मुलांनी त्याला एक मोठी राऊंडची कॅप दिली. ती घातल्यास तर त्याच्या रूपात आणखीनच भर पडली “राजू बन गया जेंटलमॅन “प्रमाणे. अख्ख गेवराईच साम्राज्य जस काही त्याला मिळाल्यागत वाटल .त्याची शान त्याच्या नजरेत वाढली. आणि लोकांचा तो एक चर्चेचा विषय झाला. आज वेड्यामामूला पाहिले का? नाही. अहो आट्टलच्या काकाजीने त्याला एक जुना कोट दिलाय. तो घालून मामू कसा दिमाखात आलाय. जा जरा जाऊन पहा आणि जो तो त्याला पाहण्यासाठी हळूहळू कोणत्या ना कोणत्या बहाण्याने तिथून जात येत होता. लोकांची वर्दळ त्याला दिसत होती. येत जात राहणाऱ्या वाकुन सॅल्यूट करायचा. त्याला कंटाळा कधीच येत नव्हता. त्याला ही कळाल होत लोक मलाच पाहायला येत आहेत. तो जसा गेवराईचा मालकच झाला होता आणि प्रत्येक येणाऱ्या जाणाऱ्या माणसास खूणवून सांगू लागला. बघा बघा मी कसा कोट घातलाय. मला आट्टलजीनी कोट दिलाय. कुणी खाकरून खुणवत , कोणी हळूच मान हालवत, कोणी हाताचा इशारा करत.लोकाला न दिसण्याच्या आत पटकन निघून जात कारण कमीपणा वाटत. त्याच्याशी बोलताना़ कुणी पाहील तर पागल समजतील अशी भिती बोलनार्याना वाटे. इशारे माञ दि बेस्टचे करून निघून जात होते.ते पाहून त्याच्या अंगावर मुठभर मास आल्यागत त्याला वाटत होतं. तो प्रेम,भावाचा भुकेला होता.
        मग काय पूर्ण गावात साहेबाची स्वारी फेरफटका मारायला निघाली .सूटबूटात, बुटाच्या दोर्या कधी आयुष्यभर बांधल्या नव्हत्या. त्या बिचार्‍या त्याच्या पायाच्या तालावर नाचत होत्या. साहेबाचा कोट गुडघ्याच्या खाली होता.मापाचा जो नव्हता.पँन्ट तर जमीनीला झाडत चलायची .शर्टाची विन माञ केलेली अर्धी आत, अर्धी बाहेर .भलेही पँनटीला चैन नसायची चैनेतून शर्ट माञ बाहेर यायच. शर्टच्या भाईचे कधीही बटन लावलेले नसायचे. शर्टचे बटण माञ वर खाली लावलेली असायचे असा हा वेडा मामू सगळ्या गावाचा मामू गावाला नमस्कार करत करत पुढे जात होता. क्या चल रहा मामू अस कुणी खुणवल की मामूची छाती इतभर फुगायची. पण त्याच्या नमस्कार ला कोणी उत्तर दिल नाही की तो हिरमूसलेल्या चेहऱ्यावर बळजबरीच हास्य आणून तो हार न मानता आणखीन दुसर्या व्यक्तीला रामराम करत पुढे जात असे . वयस्कर,समजदार,माणुसकीचे बोटावर मोजता येणारे लोक माञ त्याच्या नमस्काराला नमस्कार करत.मग माञ त्याला विलक्षण आंनद होत. अशा प्रकारे त्याची स्वारी पुढे पुढे जात. निवडणूक जिंकल्या गत हसर्या मुखाने अख्या गावाला वळसा देऊन त्या मंदिराच्या कोपऱ्यात येऊन तो स्थानस्तं होई.
       वेडा मामू जिथे बसलेला असायचा तिथे आम्ही बच्चे कंपनी हळूहळू चोरागत डब्या पावलाने जाऊन त्याला मोठ्या कुतूहलाने पहात असत .आमच्यातलाच कुणीतरी मोठ्या आवाजात जोरात ओरडत” वेडामामू ये वेडामामू” मग तो उगीचच मुक अभिनय करत आम्हाला म्हणत येऊ का म्हणून दोन पावले चालत आमच्याकडे येत. त्याला तसं करण्यात आंनद वाटायचा.पण आमची मात्र घाबरगुंडी उडायची आम्हाला जितक्या वेगाने घराकडे पळता येईल तितक्या वेगात आम्ही वाऱ्यासारखे पळत सुटत. पळता पळता कुणी पायात पाय अडकून धप्प करून पडत. चक्क गुडघे फुटून जात .तरीही न रडता भीतीपोटी पुन्हा लगबगिनी मागे न पाहता स्वतःला सावरत उठून पुन्हा घर गाठायचं आणि जोरात दार आढळून कडी लावून दाराला पाठ देऊन उभे राहायचं .झालेल्या प्रंचड आवाजामुळे आई पळतच दाराकडे यायची .काय झालं? दार का आदळलं! का लावलं? आम्ही भेदरलेल्या नजरेने तिला खुणवत हळू बोल,आवाज करू नकोस ,गप्प बस ,वेडा मामू यायला आहे .आई म्हणत असं का? येऊ दे तुला देऊन टाकते बिचार्याला लेकरं बाळ नाहीत असं म्हटलं की बालमनाला ते खरंच वाटायचं आणि आम्ही रडत बसायचं .मग आई मात्र हया गोष्टीने ब्लॅकमेल आम्हाला करायची .गप्प बसा साबण लावून हात पाय धुवून पटकन अभ्यासाला बसा नाहीतर दार उघडून देते त्याला .आम्ही लगेच म्हणत नको नको म्हणून पटकन हात पाय धुवून रडक तोंड साफ करून अभ्यासाला बसत .रात्री आम्ही तिघ भावंड गोंधळ करत असलो की आई म्हणत तुम्ही पटकन झोपता की नाही सांगा .की वेड्या मामुला बोलवू का? अस म्हणलं की आम्ही एका पास मिनिटात लाईट बंद करून नख शिखांत पांघरून घेऊन तिघही झोपी जात .आम्हीच काय सर्व गावातली लेकर त्याला भिंत.सर्व माता हाच फार्मूला वापरत.
      बालमन खरंच किती निरागस अल्लड असतं नाही का कुणी घाबरावल की घाबरत, रडवलं की रडत, हसवलं की हसत , अजब लीलाचे भाव भगवंताने मानवी बालदेहास दिले आहेत. जसं दाबलं तसं कोवळे मन दबत म्हणूनच चांगले वाईट संस्कार हे बालपणीच मुलांवर पडत असतात .मोठे झाल्यावर त्याचा काही एक उपयोग नसतो कारण मॉडेल पण वाकणार नाही अशी अवस्था मोठेपणाची असते कारण मन हे निब्बर आणि निडर झालेल असतं .तेव्हा ऐकायला कोणीच तैयार नसतं.
     आम्ही लहानाचे मोठे झालो. कुणाचे लग्न झाले. लेकरं झाले. पण वेडा मामू जसा आम्ही बालपणी पाहिला होता अगदी तसाच मरू पर्यंत दिसत होता. कारण त्याचे केस काळे, दात पांढरे वयानं तो जरी वाढला होता तरी म्हातारपणाने त्याला स्पर्श केला नव्हता .देवानेच त्याला हे तारुण्याच वरदान मनसोक्त दोन्ही हातांनी दिलेलं होत.
खरंच त्याचा तो बालीश भावसागर आठवल्यास मन अस्वस्थ होतं, भरून येत. एखाद्या वस्तूची आपल्याला गरज नसते पण ती वस्तू तिथे नाही दिसली तर आपण अस्वस्थ होतोत तशीच आवस्था मामू प्रती होती. त्या बिचाऱ्या मामूच काय चुकलं होतं त्याला जसा देह देवाने दिला त्यातच तो सुखी ,समाधानी राहून अगदी आनंदी जीवन जगत होता. येणाऱ्या प्रत्येक पाहटेचे हसत मुखाने स्वागत करत होता. त्याच्या चेहऱ्यावर कधी निराशा, दुःख दिसलच नाही .एक जगण्याची नवीन उमीद सतत त्याच्याकडून हारणाऱ्या माणसाने घेण्याजोक्त व्यक्तिमत्व त्याच होतं. दिवसा जे खाऊन उरलेलं असायच ते दररोज रात्री कुत्र्याला टाकत होता .कुत्रे पण त्यांचे सच्चे मित्र झाले होते. ते नेहमी त्याच्या अवतीभोवती त्याची राखण करत होते. त्याची ती अनमोल संपत्ती होती. तो रस्त्याचा खरा राजा होता कारण झोपायला जमीनी लगतचा रस्ता.पांघरायला आकाश होतं. अंगातले कपडे एवढे नखशिखात होते की त्याला कशाचीच गरज भासत नव्हती. थंडीच्या दिवसात तो मिळालेल्या इतर कपड्यांमध्ये तोंड खूपसून झोपत होता. कपडे देणाऱ्याचे अगदी आनंदाने कपडे घालत होता .रात्री सर्व गाव झोपल्यावर एक तरी चक्कर गावभर मारून येत होता. सोबतीला कुत्रे रक्षक होते. ज्याप्रमाणे एखादी बैलगाडी चालत असताना तिच्या खाली कुत्रा चालत असतो. त्याला असं वाटतं की तोच त्या बैलगाडीच ओझ पाठीवर घेऊन चालत आहे. मामूला ही तसंच वाटायचं पूर्ण गावाची जिम्मेदारी ,गावाचं रक्षण त्याच्यावरच आहे. त्याच्या मनी तसात भाव होता .कुत्रा हा खाल्लेल्या अन्नाला जागणारा प्रामाणिक प्राणी आहे .त्या मुक्का प्राण्याला मुक्काची भाषा नक्कीच कळत असेल. दिवसा हिंस्र दिसणारे कुत्रे रात्री त्याच्या अंगा खांद्यावर खेळत होती.त्यांची साथ त्यांनी तो मरू पर्यत सोडली नाही .
एकदा त्यांनी हट्ट करून काकाजीला खुर्ची बसायला मागितली काकाजीने एक जुनी लाकडाची खुर्ची त्याला दिली मग त्या खुर्चीवर पायावर पाय ठेऊन येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्तीकडे पाहात ,हासत, बसलेला दिसायचा. काय शान वाढली याची असे शब्द सहज लोकांच्या तोंडातूनं निघून जायचे.
        प्रत्येक रात्रीला मामू चंद्राकडे पहात होता .कधी हसत तर कधी चंद्राशी गप्पा मारत ,तर कधी चांदण्याना बोटाने मोजल्यागत बोट हालवत हास्य मुद्रेतच निद्रस्त होत होता.तो त्याचा दररोजचाच छंद होता. प्रत्येकाला कोणी ना कोणी होतं पण बिचारा मामू एकटाच होता त्याला साथ निसर्गातल्याच अनमोल ठेवांची.
         गावात मा.पवाराची पिच्चरची टाँकीज होती.नवीन पिच्चर लागला म्हणला की रिक्षात त्या पिच्चरच पोष्टर गावभर बाँडबाज्या सोबत फिरवल जायच.लोकांना माहीत व्हावा की पिक्चर कुठला लागला आहे आणि त्या पोस्टरला घेऊन रिक्षात बसणारा दुसरा तिसरा कोणी व्यक्ती नसून मामूच असायचा. मग काय मामूची शान बँड बाजा पुढे मामू रिक्षात आणि लोकांना बोट दाखवून एका हाताने अ हं हा लागला पिक्चर इशारे करून म्हणत होता या या. त्याला अति खुशी वाटायची .काही लोकं पोस्टकडं पाहायचं सोडून मामूच्या शानेवर, इशाऱ्यावरच फिदा होत होते.पवाराकडूुन त्याला खायला,ल्यायला नेहमी भेटत होत.त्यांनी पण त्याचा कधी तिरस्कार केला नाही.त्यांचे जिम्मेदारीच काम मामू जबाबदारीने पार पाडू शकतो त्यांना विश्वास होता. कारण ते जाणून होते की तो वेडा नाही.
बर्याच वेळेस लोक पेपर वाचताना मामुनी मारकाईने पाहिलेले असायचे .मग रस्त्याने चालत असताना एखाद्याला पेपर मागायचा.ज्याचा पेपर वाचून झालेला असल्यास तो व्यक्ती त्याला पेपर देऊन टाकायचा .मग मात्र तो त्या पेपरला एवढं जपून रस्त्याने चलायचा जस काय त्याला अनमोल वस्तू भेटली असल्यागत जपून आणत आणि लक्ष्मीनारायण मंदिराच्या ओट्यावर त्याच्या खुर्चीत येऊन बसायचा आणि हळुवारपणे पेपर उघडून एखाद्या जेंटलमॅन प्रमाणे पायावर पाय ठेवून,दोन्ही हातात पेपर धरून वाचल्याची एक्शन करायचा मध्येच बोट पेपरवर फिरवायचा,मान हालवायचा, हसायचा. जसं काही त्याला सर्व समजलच,वाचता येत असल्यागत त्याचे ते लोभनिय हावभाव चालायचे .येणारे जाणारे तर थांबून त्याच्या तो अभिनय पाहत असे .महत्त्वाचे कामे असणारा देखील पाच मी. थांबून ते दृश्य पाहात असे कारण तेवढी त्याच्यात माणसांना खिळऊन ठेवण्याची, आकर्षित करण्याची कला त्याच्याकडे होती.
       लहान लेकरू जसे झोपेत स्मीथ्य हास्य करत, रडत, फुंदत,दचकत अशा अनेक लीला दाखवत निरागसपणे झोपलेल असत.चेहऱ्यावरचे ते मोहक भाव आपल्याला पहावेसे वाटतात.त्यांच्या हावभावा सारख आपण ही तसे भाव नकळत करण्याचा प्रयत्न करतो पण असफल होतोत. असा मनवा आहे की डोंबारनीने सहा महिने बाललीला शिकण्याचा प्रयत्न केला होता तरी पण तिला तशा बाललिला करता आल्या नाहीत. जी तारेवर स्वतःचा देह उभा करू शकते पण भाव चेहर्यावर आणु शकत नाही.देवानेच बाल रूपाला दिलेले दैवी देणगी आहे . ते अनमोल अद्वितीय एक एक क्षण नजर कैद करावेसे वाटतात.
      अगदी तीच अवस्था बऱ्याच वेळेला मी त्या मामूची पाहिलेली आहे. जेव्हा आम्ही रात्री गावावरून उशिरा आल्यानंतर गल्लीतून घराकडे जात असताना तो नक्कीच जागा असेल ह्या आशेने नजर त्याच्याकडे जात होती तर तो खरंच जागा असे. सर्व गाव शांत निद्रेत झोपलेल असायचं पण मामू चंद्राशी बोलताना दिसायचा तो इतका त्यात समरस होत होता की आमच्या येण्याच्या आवाजाने त्याला कधी बांधाच झाली नाही .आणि अशाच एका शांत एकांत रात्री त्याची प्राणज्योत चंद्राच्या शीतल मधुर किरणात विलीन झाली.एक हासरा चैतन्यमय देह इहलोक सोडून परलोकात गेला होता . देव नक्कीच त्याला एक चांगला मानवी देह देईल कारण तो निष्पाप होता पापाच्या लवलेशाने त्याला स्पर्श देखील केला नव्हता.
      दुसऱ्या दिवशी ऊन पडलं तरी वेडा मामू आणखीन कसा उठला नाही म्हणून अट्टलच्या नोकरांनी त्याला हलवून पाहिले तर त्याची प्राणज्योत मावळली हे लक्षात आले .मग एकच वार्ता पूर्ण गावभर वार्या सारखी पसरली की वेडामामू मरून गेला ,वेडा मामू मरण पावला. का कोणास ठाऊक पण सर्वजण कोणीही मरण पावल्यावरच मरणार्या व्यक्तीच्या गुणाची स्तुती का करतात?ती स्तुती तो जिवंत असताना केली तर आंनदाने एखाद साल तो व्यक्ति जास्त जगेल व मरण यातनेच्या वेळी तो नक्कीच सुखात मरेल. याची जाण का लोकांना होत नाही हे कळतच नाही.
       सर्वजण मनस्वी हळहळले. इतकी वर्ष ज्यांनी त्याचा नकळतच तिरस्कार केलेला होता तेही शेवटचं वेड्या मामूला पाहण्यासाठी लक्ष्मीनारायण मंदिराकडे आले. आणि पाहता पाहता अख्खा गाव गोळा झाला. सर्वानी मिळून त्याला लावारीस लाश म्हणून न जाळता गावातलं एक मनमोजी व्यक्ती, ह्रदयस्त असलेलं व्यक्तीमत्व म्हणून सार्वजनिक ठिकाणी त्याचा अंत्यविधी मोठ्या थाटात संपन्न केला. आणि ज्या कपड्यात ,बुटात ,कोटात त्याचा जिव होता ते सर्व कपडे त्याच्यासोबत जाळून त्याच्यातच एकरूप झाले. म्हणायला वेडा पण राजा सारख्या शानेत जगला आणि राजा सारखा सुचा बुटात मेला. विशेष म्हणजे त्याच्या सोबतीचे जे कुत्रे होते ते पण त्याच्या अंत्ययात्रेत चालताना लोकांच्या नजरेला पडले त्याही मुक्या प्राण्यांना कळालं होतं की आपल्याला सोडून आपला अन्नदाता न सांगताच निघून जात आहे. त्याला शेवटचं डोळे भरून पाहण्यासाठी ते सुद्धा स्मशान भूमी पर्यंत येऊन परत फिरले. दुःखी अंतकरणाने, जड पावलाने गेवराईकर वेडया मामूचे गुणगान, स्तुती करत सर्वानी शेवट गोड केला व आपापल्या घरी परतले.
       वेडा मामू हा जातीने मुस्लिम होता.बर्याच लोकांना तो मरू पर्यतही माहीत नव्हत .आता ही कदाचीत कुणाला माहीत नसेल.कारण तो जातीय प्रश्न गहण विषय जाणून घ्यायला त्याच्या मासूमीयतने लोकांच्या मनाला मान्यता दिली नव्हती. हया वरून तिथल्या लोकांचे मनही किती मोठ्ठी,प्रेमळ होती हे दिसून येत.तो मामू आहे म्हणजे मामा.मग मामा बद्दल संशय कोणी घेतला नाही.तो मुस्लिम लोकांसोबत कधीच राहिला नाही. तो हिंदू लोकांसोबतच राहिला त्यांच्यातच रमला. त्यांला हिंदूंनीच मान,सन्मान दिला .खायला, प्यायला, राहिला जागा दिली आणि वैशिष्ट्य म्हणजे तो मुस्लिम असून हिंदूंच्या मंदिराचा आसरा त्याला भेटला होता. देवाच्या दरबारात ना कोणी गरिब श्रीमंत. उच्च, निच्च,ना जात,धर्म, भेदाभेद नाही सर्व धर्म समभाव म्हणूनच भगवंत सर्वापैक्षा दि ग्रेट आहे .सर्व भगवंताची लेकरेआहेत.जात धर्म हे ज्याच्या त्याच्या व्यवसायावरून मनुष्याने पाडलेले जातीय वर्ग,वर्ण आहेत.

       वेडा मामू हा प्रत्यक्षात वेडा नव्हता कारण त्याच्या चांगुल गुणांनी त्याने सर्वांच्या हृदयात आपलं स्थान निर्माण केलं होतं. सर्वाना आपलंसं केलेलं होतं .तर मग आपण सर्वजण वेडे ,मुक्के नसताना का एकमेका प्रती प्रेम ,आदर, सन्मान करत नाहीत.तो वेडा नव्हता आपणच वेडे आहोत. वेडा मेला पण त्याचं नाव आणखीनही दोन पिढ्यापर्यंत चालूच आहे .यातच त्या वेड्याचा मोठेपणा, त्याने मिळालेला मान आणि त्याची ती शान आहे .जो देहरूपाने मेला पण कीर्ती रुपीने आजही सर्वांच्या स्मरणात, ओठावर आहे हे त्यांनी कमवलेली न संपणारी खरी कमाई आहे. आपण हे मान्य केलेच पाहिजे. शेवटी एकच वाक्य येत अशी” पाखरे येती आणि स्मृती ठेवूनी जाती”

शब्दाकंन
डॉ. सुरेखा डोंगरे

_________________________________

🪀सर्व महत्वाच्या अपडेट मिळवा Whatsapp वर नंबर सेव्ह करा व लोकनेता न्युज ला जॉईन व्हा 👉 https://join.elokneta.in/

About Post Author

error: Content is protected !!