May 9, 2024

प्रखर देशभक्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर !

This get from this site or source

लोकनेता न्युज नेटवर्क

       अठराव्या शतकात इमॅन्युएल काण्ट या जर्मन तत्ववेत्याने, “कोणत्याही स्वतंत्र राष्ट्रात जेव्हा व्यक्तिस्वातंत्र्याची योग्य पाठराखण होऊ लागते, तेव्हाच ते राष्ट्र खऱ्या अर्थाने स्वतंत्र बनते” अशी राष्ट्रवादाची व्याख्या करून राष्ट्रवाद संकल्पना स्पष्ट केली. शिवाय जागतिक स्तरावर विचारवंतांनी राष्ट्रवाद संकल्पनेच्या विविध व्याख्या केल्या आहेत. भारतीय राष्ट्रवादाची सुरुवात एकदम अलीकडच्या काळातली आहे. त्याचे कारण म्हणजे भारत देश हा विविध राजेशाही सत्तांनी ज्याच्या त्याच्या राज्यापुरत्या अस्मिता जागृत ठेवून होता. या खंडप्रायतेमुळेच इंग्रजांनी ‘फोडा आणि राज्य करा’ या धूर्त नीतीने भारतावर दिडशे वर्षे राज्य केले. विसाव्या शतकात शिक्षित लोकांना ‘राष्ट्र’ संकल्पना माहित झाली आणि भारताला राष्ट्रवाद कळला. भारत हा एकसंध देश असावा अशी देशभक्तीची भावना ब्रिटीश सत्ता काळात खऱ्या अर्थाने रुजली गेली. 
            याच अनुषंगाने आधुनिक भारताचे अध्वर्यू आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे भारतीय राष्ट्रवाद-देशभक्ती संबंधी प्रखर-निष्ठावंत विचार स्वातंत्र्यपूर्व आणि नंतरच्या काळात देशाला तारक ठरले. देशभक्ती आणि राष्ट्रवाद अनुषंगाने डॉ.आंबेडकरांनी भारतीय लोकशाहीला सर्वकाळ प्रभावित केले आहे. बाबासाहेबांची देशभक्ती आणि राष्ट्रवाद किती प्रखर होता(?) या विषयी नरहर कुरुंदकर लिहितात, “आमच्या स्वातंत्र्य आंदोलनाने आधुनिक राष्ट्रवाद निर्माण केला आहे. तो संविधानात ग्रंथित आहे. याचा अर्थ भारतीयत्व स्वातंत्र्यापूर्वीपासूनच अस्तित्वात होते म्हणून तर आपण स्वातंत्र्याची आकांक्षा धरू शकलो, स्वतंत्र भारताची राज्यघटना तयार करू शकलो आणि ती राज्यघटना लिहिण्यासाठी मनुवादी भारतीयांनी कोणाची निवड केली? तर, ज्यांच्यावर प्रतिक्रांतिवाद्यांनी शतकानुशतके सामाजिक अन्याय केला त्या समाजाचे नेते व प्रतिनिधी असणाऱ्या व अन्यायासाठी जबाबदार असणाऱ्या ‘मनुस्मृती’चे दहन करणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ! म्हणूनच ‘एका हातात राज्यघटना व दुसऱ्या हातात मनुस्मृती असे चालणार नाही,’ ही बाबासाहेबांची घोषणा भारतीयत्वाची आधारशिला बनली आहे.” म्हणजे राज्यघटना लिखाण करण्यापर्यंतचा डॉ.आंबेडकरांचा प्रवास किती काठीनप्राय होता (?), जातीयतेचे चटके देवून इथल्या बुरसटलेल्या व्यवस्थेने त्यांना जाळायचेच शिल्लक ठेवले असतांनासुद्धा बाबासाहेबांच्या हृदयातील राष्ट्रप्रेम आणि देशांतील शेवटचा वंचित-शोषित जीव कसा सुखी होईल(?) याचा अहोरात्र विचार म्हणजे त्यांचा खरा राष्ट्रवाद !
            ब्रिटिशांनी भारतीयांना मूर्ख बनवले. इथे जात, धर्म, पंथ आणि वंशाच्या स्वार्थी अस्मिता राज्य करत होत्या. राष्ट्र, राष्ट्रप्रेम, एकजूट, एकसंध देश ह्या राष्ट्रवादी संकल्पना विचारवंत, क्रांतिकारी महापुरुषांनी भारतीयांच्या मनामनात रुजविल्या आणि मग भारत एक ‘आसेतु हिमाचल’ राष्ट्र आहे अशा एकजुटीच्या भावनेचे वारे देशभर वाहू लागले. वंदे मातरम!, भारत माता कि जय!, जय हिंद! सारखे नारे देशभर घुमू लागले! या देशभक्तीच्या महान कार्यात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा वाटा सिंहाचा आहे! डॉ.आंबेडकरांच्या मते ‘राष्ट्रवाद’ संकल्पनेला अनेक पैलू असून देशकाल परिस्थितीनुसार अनेक परिमाणे आहेत. फुले, आगरकर आणि आंबेडकर यांचा ‘विवेकनिष्ठ राष्ट्रवाद’ भारत देशाचा अंत:प्रवाही झाला हे विशेष! बाबासाहेबांना भारतीय समाज, इतिहास, धर्म, कला, संस्कृती यांचा सखोल अभ्यास होता, म्हणूनच, “केवळ भौगोलिक आकार असलेला देश म्हणजे राष्ट्र नव्हे, समान भाषा, वंश, श्रद्धा, अस्मिता म्हणजे राष्ट्र नव्हे. उलट राष्ट्र ही एक वस्तुनिष्ठ समूह भावना आहे. ती सद्सद्विवेकशक्तीची भावना आहे” हे बाबासाहेबांचे विचार वाचल्यावर त्यांचा प्रगल्भ राष्ट्रवाद समोर येतो. मानवी समूहातील एकात्मतेची, आपलेपणाची भावना म्हणजे राष्ट्रवाद! विविध धर्म, भाषा, श्रद्धा जपून हा देश माझा आहे आणि मी या देशाचा आहे! अशी सदैव धमन्यातून वाहणारी तेजोमय सळसळ म्हणजे राष्ट्रवाद!          
            डॉ.आंबेडकरांनी प्रगल्भ आणि प्रखर देशभक्ती, राष्ट्रवाद संकल्पना मांडतांना सर्वंकष शोषणन्मुक्ती केंद्रस्थानी होती. शोषित-वंचित समूह शोषणमुक्ती शिवाय राष्ट्रीय प्रवाहात सामील होणार नाहीत. जोपर्यंत त्यांना हे राष्ट्र माझे आहे, मला समानतेने वागणूक देते हे पटणार नाही तो पर्यंत ते लोक भारतीय स्वातंत्र्य चळवळीत समरस होणार नाहीत, परिणामी बाबासाहेब सामाजिक, आर्थिक स्वातंत्र्याबरोबरच धार्मिक समता-स्वातंत्र्यासाठी आग्रही होते. असहिष्णुता, वंश, जात, धर्म, पंथ अस्मितेने लोकांमध्ये राष्ट्रप्रेम-राष्ट्रभावना कशा जागृत होतील? असे बुद्धीप्रामाण्यावादी, विवेकी प्रश्न उभे करून लोकांना राष्ट्रवादासंबंधी जागृत केले. कालबाह्य संस्कृती, परंपरा, अतिरंजित गौरव, अविवेकी-एकांगी-कट्टरता देशाला नेहमी मारक असते. यासाठी महात्मा ज्योतीराव फुले यांच्या ‘सार्वजनिक सत्यधर्म’ ग्रंथातील “या बळीस्थानातील एकंदर शुद्रातीशुद्रांसह भिल्ल, कोळी वगैरे लोक विद्वान होऊन विचार करण्यालायक होईतो, ते सर्व सारखे एकमय लोक झाल्याशिवाय भारत राष्ट्र (नेशन) होऊ शकत नाही” असा सामाताधीष्टीत आणि प्रगल्भ राष्ट्रवाद मांडला. देश स्वतंत्र झाल्यावर बाबासाहेब कायदा मंत्री असतांना हैदराबादचा निजाम स्वतंत्र रहायच्या हालचाली करत होता, त्याने बाबासाहेबांना युनोमध्ये दाद मागण्यासाठी वकीलपत्र द्यायचे ठरवले होते, परंतु निजामाची ती मागणी धुडकावून लावत बाबासाहेबांनी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि संरक्षणमंत्री सरदार पटेल यांना समजावून सांगून निजामावर ‘मिलिटरी’ पाठवली, त्याला ‘पोलीस एक्शन’ नाव दिले आणि निजामाला शरणांगती पत्करायला भाग पाडले आणि मग मराठवाडा स्वातंत्र्याच्या एक वर्ष एक महिना दोन दिवसांनी म्हणजे १७ सप्टेंबर १९४८ रोजी खऱ्या अर्थाने स्वतंत्र झाला! हा बाबासाहेबांचा खरा राष्ट्रवाद आणि प्रखर देशभक्ती!
            सांप्रतकाळी तरुण आणि देश वाशियांनी आपल्यामध्ये प्रखर देशभक्ती, सामाजिक ऐक्य, धर्म सहिष्णुता इत्यादी मुलभूत-दूरदृष्टी संकल्पना रुजविणे गरजेचे आहे. कोणतीही कट्टरता ही राष्ट्र आणि एकसंध राष्ट्रभावनेला मारक असते याचे देशातील सर्वपक्षीय राजकारणी ते सामान्य माणूस यांनी नित्य भान ठेवले पाहिजे. आपला देश जगात महासत्ता म्हणून उदयास येतांना धार्मिकता किंवा कट्टरता जर डोके बाहेर काढत असेल तर ती धोक्याची घंटा आहे! ही राष्ट्र आणि राष्ट्रवाद या भावनेची प्रतारणा आहे. इथे भारतीय नागरिकाला प्रकर्षाने याची जाणीव झाली पाहिजे की; मी हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन, बौद्ध, शिख, इसाई नसून प्रथम भारतीय आहे! हा देश माझा आहे! इथे मी, माझं कुटुंब, माझा धर्म, माझी संपत्ती सुरक्षित असून वेळप्रसंगी, आपत्तीच्यावेळी या देशासाठी शूर-विरांसारखे बलिदान द्यायला, माझे सर्वस्व अर्पण करायला मी तयार आहे! ही राष्ट्रभावना सतत तेवत राहिली पाहिजे! यासाठी आपण सर्वजण मिळून प्रार्थना करूयात की; मी कुणाचाच जात, धर्म, वंश, पंथ यावरुन द्वेष करणार नाही. आपण सारे, सदैव भारतीय आहोत याचे भान ठेवीन! हा मुलभूत विचार समाजामध्ये रुजला की; मग भारत देश महासत्ता होऊन दैदिप्यमान शिखरावर जाईल! हेच अलौकिक स्वप्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी पहिले होते! चला तर मग, डॉ.आंबेडकरांचे देशभक्ती-राष्ट्रवादाचे हे स्वप्न पूर्ण करून त्यांच्या जयंतीनिमित त्यांना विनम्र अभिवादन करूयात ! जय हिंद ! जय भारत ! जय भीम ! 

प्रा.डॉ.विठ्ठल खंडूजी जायभाये
कै.रमेश वरपूडकर महाविद्यालय, सोनपेठ
जि. परभणी (महाराष्ट्र)
मो. 9158064068
(टीप: लेखक हे व्याख्याता, कवी, किर्तनकार, समीक्षक, योग-प्राणायाम प्रशिक्षक आहेत.)

_____________

🪀सर्व महत्वाच्या अपडेट मिळवा Whatsapp वर नंबर सेव्ह करा व लोकनेता न्युज ला जॉईन व्हा 👉 https://join.elokneta.in/

About Post Author

error: Content is protected !!