May 9, 2024

“बुद्ध-फुले-शाहू-आंबेडकरांच्या अनुयायांनी साजरा केला बुद्ध जयंती उत्सव”

"आज जगाला युद्धाची नव्हे तर बुद्धाची गरज " - प्रा अरुण बुंदेले

लोकनेता न्युज नेटवर्क

अमरावती :- उपेक्षित समाज महासंघ, कै.मैनाबाई बाबारावजी बुंदेले स्मृती प्रतिष्ठान व बुद्ध-फुले-शाहू -आंबेडकरांच्या अनुयायांनी आयोजित केलेली बुद्ध धम्माचे संस्थापक तथागत सिद्धार्थ गौतम यांची जयंती दि.5 मे 2023 रोजी शिवटेकडीच्या पायथ्याशी उत्साहात संपन्न झाली.

        कार्यक्रमाचे अध्यक्ष समाजभूषण प्रा.श्रीकृष्ण बनसोड (अध्यक्ष,उपेक्षित समाज महासंघ ),प्रमुख वक्ते समाजप्रबोधनकर्ते प्रा.अरुण बुंदेले (अध्यक्ष, कै.मैनाबाई बाबारावजी बुंदेले स्मृती प्रतिष्ठान)तर प्रमुख अतिथी माजी नगरसेवक व महानायक संघटनेचे अध्यक्ष सुरेश मेश्राम,भीमशक्ती संघटनेचे पंकज मेश्राम,सुनील रामटेके,आदिवासी नेते डॉ.शिवलाल पवार,यशवंत राजाराम गायकवाड,गौतम मनोहर,सुधीर बोके,दीपक आमले,सुमंत इंगोले,गोवर्धन हरडे,रवींद्र पाटील होते. अध्यक्ष,प्रमुख वक्ते व प्रमुख अतिथी यांच्या हस्ते तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पण करुन अभिवादन केले.

     सामूहिक बुद्धवंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली .अभंगकार प्रा.अरुण बुंदेले यांनी स्वरचित ” तथागत गौतम बुद्ध ” या स्वरचित वंदनगीताचे व अभंगाचे सुमधुर आवाजात गायन केले. अध्यक्षीय भाषणात सत्यशोधक प्रा.श्रीकृष्ण बनसोड यांनी ” तथागत भगवान बुद्धांनी जगाला जगा आणि जगू द्या हा मानवतावादी विचार दिल्याचे सांगून आजच्या जाती धर्माच्या यादवीतून देशासाठी व भोगवादी बनलेल्या मानवासाठी भगवान बुद्धांच्या प्रज्ञा,शील,करुणा,प्रेम, वात्सल्य,अहिंसा या तत्त्वांची गरज असल्याचे प्रतिपादन केले.”

   कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते अभंगकार प्रा.अरुण बुंदेले यांनी ,”बुद्ध हे नाव नाही तर ज्ञानाची उपाधी आहे.आकाशा एवढा प्रचंड ज्ञानी असा बुद्ध शब्दाचा अर्थ आहे आणि ही उपाधी सिद्धार्थ गौतम बुद्धांनी स्वप्रयत्नांनी मिळविली आहे. त्यांनी स्थापन केलेला बौद्ध धम्म हा आशिया खंडात मुख्य धर्म असून सर्व खंडातील देशांमध्ये बौद्ध अनुयायी खूप मोठ्या प्रमाणात आहेत.बुद्ध धम्माच्या मानवतावादी,विज्ञानवादी, समतावादी व शांततावादी तत्त्वज्ञानाची गरज असल्यामुळे आज जगाला युद्धाची नव्हे तर बुद्धाची गरज असल्याचे प्रतिपादन केले.”

प्रमुख अतिथी महानायक संघटनेचे अध्यक्ष श्री सुरेश मेश्राम (माजी नगरसेवक ) यांनी ,”तथागत गौतम बुद्धांनी सामाजिक,बौद्धिक, आर्थिक स्वातंत्र्याचा पुरस्कार करून माणसांमध्ये समानता निर्माण केली.लोकशाहीची विचारसरणी असलेल्या तथागत गौतम बुद्धांनी विश्वाला शांतीचा संदेश दिला.” असे विचार व्यक्त केले.
याप्रसंगी श्री महेंद्र हरणे यांनी धम्म गीताचे गायन केले. कविवर्य श्री गौतम मनोहर यांनी आपल्या काव्यातून गौतम बुद्धांना अभिवादन केले.सर्वश्री अरुण बनारसे,गंगाधर सरदार,विनोद मेश्राम,बबनराव तांबे,अनिल माहोरे,प्रवीण सरोदे,भीमराव लांडगे,रवींद्र इंगळे,यशवंत गायकवाड,चरणदास नंदागवळी,विकी शेषराव तिडके यांनी “तथागत गौतम बुद्धांची शिकवण “या विषयावर विचार व्यक्त केले.

      याप्रसंगी बुद्ध – फुले – शाहू- आंबेडकर चळवळीतील समता सैनिक श्री सुरेश मेश्राम व श्री सुरेश तिडके यांचा उपेक्षित समाज महासंघाच्या वतीने भावपूर्ण सत्कार करण्यात आला. जयंती उत्सवाचे संचालन श्री महेंद्र हरणे तर आभार श्री सिद्धार्थ गोंडाने यांनी मानले. याप्रसंगी खालील ठरावांचे प्रा.श्रीकृष्ण बनसोड व प्रा.अरुण बुंदेले यांनी वाचन करून ते एकमताने पारित करण्यात आले . १ ) महात्मा फुले लिखित शेतकऱ्यांचा असूड व गुलामगिरी तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या भारतीय संविधान शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करून ते इतर विषयांसोबत शिकवण्यात यावे .२ ) संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात महात्मा फुले अध्यासन केंद्र सुरू करण्यात यावे . ३ )संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात श्री संत गुरु रविदास महाराज अध्यासन केंद्र सुरू करण्यात यावे . ४ )अमरावतीच्या गर्ल्स हायस्कूलला ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे नाव देण्यात यावे.

    तथागत गौतम बुद्ध जयंती उत्सवाला सर्वश्री व्यंकटराव खोब्रागडे,कामगार नेते श्रीकृष्णदास माहोरे,रामकुमार खैरे,तेजलाल अग्रवाल, इंजि.गोहात्रे प्रा.अब्दुल रजवी,यशवंत कुलकर्णी,सविता इंगळे,ममता पंढरी,शारदा कलाने, छाया मोहोड,उमा इंगळे यांच्या सह सर्वच जाती धर्मातील समता सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

_____________

🪀सर्व महत्वाच्या अपडेट मिळवा Whatsapp वर नंबर सेव्ह करा व लोकनेता न्युज ला जॉईन व्हा 👉 https://join.elokneta.in/

About Post Author

error: Content is protected !!