May 9, 2024

भाग ८ – छत्रपती शिवाजी महाराज आणि बेगडी शिवप्रेम

लोकनेता न्युज नेटवर्क

        महापुरुषांना व्यवस्थितपणे वाचून त्यांच्या जीवनाचे विवेकपूर्ण-अभ्यासपूर्ण-तटस्थ विश्लेषण झाले पाहिजे. केवळ धर्म-रंग-जात-वर्ण-भावना आदी चष्म्यातून महापुरुषांचे अवलोकन झाल्यास त्यांचा खरा इतिहास झाकोळलेलाच राहण्याची भीती आहे. त्यासाठी वर्तमानातील तमाम उच्च शिक्षित मंडळींनी सातत्याने वाचन-चिंतन करून लोकांसमोर हे महापुरुष आणावे लागतील. अशा दहा लेखांनी आणि माझ्यासारख्या केवळ एका व्यक्तीने हे शिवधनुष्य पेलणे दुरापास्त आहे. मागील सात भागात छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या संबंधाने विविध विषयांवर विश्लेषण करतांना अनेक तरुण, अभ्यासू, लेखक, प्रकाशक आदि मंडळींचे बोलणे अथवा मिडियावर संवाद झाले. अनेकांनी लिहित्या हातांना बळ दिले. हे श्रेय विविध वर्तमानपत्रांचे संपादक-सहसंपादक यांना जाते. काही मित्रांनी लेख वाचण्यासाठी मुद्दाम मागवून घेतले. काहींनी यावर पुस्तक काढण्याची सूचना केली. हे सर्व पाहून-ऐकून आपण लिहिण्याचा योग्य निर्णय होता याचे समाधान झाले. ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या असून काही लोक वाचत आहेत याचा मनस्वी आनंद झाला, परंतु तरुणांनी वाचून प्रतीक्रिया दिल्या नाहीत. हे सदर लिहिण्याचे लक्ष तरुण, वाईट सवयींनी ग्रस्त आणि जात-धर्म आदींच्या कट्टर आवेशाने झपाटलेल्या लोकांना छत्रपती शिवराय सांगणे हा असला तरी उच्च शिक्षित लोकांनी आपली मरगळ झटकून या कामाला लागावे यासाठी आहे, आणि तो सातत्याने असणार आहे.
            आज मिडियाने फार मोठे बदल घडवून आणलेत. त्यातील बरेच बदल मानवासाठी निश्चितच हिताचे नाहीत. प्रिंट मिडिया, इलेक्ट्रॉनिक मिडिया आणि आता न्यू मिडीयाने हाहाकार माजवला आहे. न्यू मिडीयाने झपाट्याने क्रांती घडवून मागील ८०० वर्षांत जे झाले नाही ते बदल या २० वर्षात झाले. प्रचंड सामाजिक बदल घडून आले. दुर्दैवाने सामाजिक मूल्ये बदलायला नको होती, परंतु ती सुद्धा बदलली. माणसे आधुनिक कपडे घालून पारंपारिक विचार जपत आहेत. त्यातल्या त्यात OTT प्लॅटफॉर्मने तर कहरच केलाय. सगळीकडे अनियंत्रित पिढी निर्माण झाली आहे. लोक वेड्यासारखे केवळ फॉरवर्ड रोगाने ग्रस्त आहेत. चिंतन, वाचन, लेखन, मनन, संवाद बंद झाले आहे. ही मोठी भयंकर बाब आहे! आज महापुरुषांच्या चरित्र-विचारांची समाजाला नितांत गरज असतांना केवळ हातात महागडा मोबाईल, भारीचे कपडे, तोंडात तंबाखू-गुटखा टाकून छत्रपती शिवाजी महाराजांचे अनुयायी नाही होता येणार! प्रौढ लोक सुद्धा बेताल वागायला-बोलायला लागलेत. जातीय कट्टरतेचे भूत लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवते आहे. हे थांबणे गरजेचे आहे. स्वतंत्र विचार करून आणि महापुरुष वाचून त्यांचे अवलोकन-अवलंबन करायला हवे. यात आता नारी शक्तीने सहभागी व्हायला हवे. उच्च शिक्षित मुली आणि महिलांनी समाजसुधारणेची धुरा स्वतःच्या खांद्यावर घ्यायची वेळ आली आहे. जिजाऊ आईसाहेब, सावित्रीबाई फुले, अहिल्यादेवी होळकर, रमामाई आंबेडकर यांचा वसा-वारसा चालवताना आपल्या भोवताल बिघडत चाललेल्या पिढीला वाचवायला हवे.
            महापुरुष हे नाचून नाही तर वाचून घ्यावे लागतील! केवळ घोषणा, मिरवणुकीने, हवेत झेंडे आणि पेहराव करून शिवजयंती साजरी होणार नाही. राज्यकर्त्या लोकांनी आपले काम व्यवस्थितपणे समजून घ्यावे आणि त्याचा योग्य प्रसार-प्रचार करावा. असे झाल्यास महापुरुषांच्या जयंती-पुण्यातीथीचे कार्यक्रम सर्वसमावेशक होतील. तेंव्हा, माझी तमाम शिवप्रेमी मंडळींना कळकळीची विनंती आहे की, कृपया, दारू पिऊन महापुरुषांची जयंती साजरी करू नका! व्यसनांचा त्याग करा. तरुणांनी मोबाईलवर गेम खेळण्याऐवजी मैदानात उतरून खेळ खेळावेत. मन-मस्तक-शरीर बलदंड करावे आणि मगच महाराजांच्या जयंतीचे शिलेदार व्हावे! असे झाल्यास निश्चितच घराघरातील आई-वडील सुखावतील! घरात संवाद प्रस्थापित होण्यासाठी सकाळ-संध्याकाळ काहीतास मोबाईलपासून दूर राहून सामूहिक प्रार्थना आणि आपापल्या घरीच एकवेळचे सामुहिक भोजन करावे, जेणेकरून कौटुंबिक एकोप्याची, प्रेम-जिव्हाळा-आपुलकीची भावना मनामनात रुजायला लागेल! संवाद सुरु होतील! जेवण करतांना टीव्ही-मोबाईल बंद असेल. असे झाल्यास घरात नवचैतन्य येईल! छत्रपती शिवाजी महाराजांचे अस्तित्व घराघरात जाणवायला लागेल, बेगडीपणा गळून पडेल आणि घरोघर खरी शिवजयंती साजरी होईल! जय हिंद! जय शिवराय!

प्रा.डॉ.विठ्ठल खंडूजी जायभाये
कै.रमेश वरपूडकर महाविद्यालय, सोनपेठ
जि. परभणी (महाराष्ट्र)
मो. 9158064068

(टीप: लेखक हे व्याख्याता, शिवचरित्रकार, कवी, किर्तनकार, समीक्षक, योग-प्राणायाम प्रशिक्षक आहेत.) 

__________________________

🪀सर्व महत्वाच्या अपडेट मिळवा Whatsapp वर नंबर सेव्ह करा व लोकनेता न्युज ला जॉईन व्हा 👉 https://join.elokneta.in/

About Post Author

error: Content is protected !!