May 9, 2024

भाग ९ – छत्रपती शिवाजी महाराज परत आले तर…?

लोकनेता न्युज नेटवर्क

      महापुरुषांनंतर त्यांच्या कार्य-कर्तृत्वाचा जयघोष केला जातो! त्या व्यक्ती आदर्श होतात. तसेच काही लोक भावनिक होऊन “परत या, परत या, राजे तुम्ही परत या!” अशा घोषणा देतात. परंतु भावनेने पोट भरत नसते. काही गोष्टी केवळ बोलण्यासाठीच असतात, त्यापैकी ही एक गोष्ट! अशी आव्हाने करून महापुरुष परत येत नसतात, आणि कल्पना करा, खरंच छत्रपती शिवाजी महाराज परत आले तर काय होईल? मोठे जिकरीचे प्रसंग उभे राहतील. आपण गृहीत धरू की, साधारणतः पंचवीस वर्षांचे छत्रपती शिवाजी महाराज जर आज अचानक आपल्यामध्ये प्रकट झाले तर काय काय होईल? ही मोठी मजेशीर गोष्ट असेल! लोक आश्चर्यचकित होतील! काहींना मनोमन आनंद होईल, तर बऱ्याच लोकांना अनंत अडचणी निर्माण होतील!
            महाराज आल्याबरोबर सवंगडी, सोबती शोधतील! त्यांनी उभारलेली शहरे त्यांना दिसणार नाहीत. महाराजांना पाहून तरुणांना काही काळ आश्चर्य होईल! महाराजांच्या भोवताल जो तो महाराजांसोबत सेल्फी काढायची घाई करेल! प्रचंड गर्दी पाहून ‘काय चालले आहे?’ याचा महाराजांना काहींच अंदाज येणार नाही. सेल्फीच्या नादात महाराजांना कुणी निवास-जेवण बाबतीत विचारेल का? परंतु एखादा गरीब माणूस येवून महाराजांना आपल्या घरी घेऊन जाईल! “बोल बोलता वाटे सोपे” या तुकोक्तीप्रमाणे महाराजांची व्यवस्था आपल्याकडून होईल का? महाराज राजे आहेत! त्यांना आल्याबरोबर आपल्याला त्यांचा हुद्दा बहाल करावा लागेल! हे सगळेच मोठे आव्हानात्मक असेल. महाराज जिथेही जातील, तरुणांना भेटतील त्यावेळी तरुणांना काही प्रश्न विचारतील. तरुणांना आपल्या मोबाईलपासून सुटका मिळेल का? मोबाईल सोडून तरुण महाराजांच्या सोबत जातील का?
            त्यानंतर महाराज स्वराज्य शोधण्याचा प्रयत्न करतील. महाराजांना त्यांच्या अनुरूप मानासन्मानाचे पद कोण देईल? इथे सगळेच पक्ष आपापले अस्तित्व टिकवण्याचा आटापिटा करत असतांना अचानक छत्रपती शिवाजी महाराज आलेले पाहून त्यांच्यासमोर ते अवाक होतील! काय करावे आणि काय नाही? गहन समस्या निर्माण होईल! भ्रष्ट, व्यसनी, व्यभिचारी, स्वार्थी सत्ताधाऱ्यांना महाराज आलेले पचतील का? आल्याबरोबर महाराज कुठे जातील? महाराज सरळ सामान्य रयतेमध्ये जातील. प्रचंड गर्दी-समस्या पाहून महाराज अचंबित होतील. पिडीत, शोषित, गरीब आपली कैफियत महाराजांकडे मांडतील. महाराज भावनिक होतील! आपल्या अष्टप्रधान मंडळाला आदेश देण्याच्या आवेशात असतांना लक्षात येईल की; इथली बेगडी लोकशाही मुठभर धनदांडग्या चोरांच्या दावणीला बांधली असून हे चोरच साव असल्याचा आव आणून दिवसाढवळ्या लोकशाहीचे लचके तोडत आहेत. अनेक पिढ्यांची सत्ता यांच्याचकडे असून यांनी कोणतीही लोकोपयोगी कामे केली नाहीत हे पाहून महाराज व्यथित होतील! सामान्य रयतेमधून उठून महाराज ताडताड विधानभवनाकडे निघतील! मंत्रालय आणि विधानभवन पाहून महाराजांना आनंद होईल! पण ते विधानभवनसुद्धा महाराजांना पाहून रडायला लागेल! इथे सामान्य माणसांचे प्रश्न केवळ चर्चिले जातात, मात्र त्याच्यावर अंमल होत नाही. इथे शेतकऱ्यांच्या मालाच्या भावाची केवळ फोलपट चर्चा होते, भाव काही मिळत नाही! करोडोंची उलाढाल होणारे मंत्रालय नावाचे कुरण पाहून महाराज मनातून व्यथित होतील! मंत्रालयाच्या पायरीवर बसून महाराज ढसाढसा रडतील! मी रयतेचे राज्य निर्माण केले! जात-पात-धर्म भेद केला नाही! शेतकरी सुखी केला! स्त्रीची अब्रू सिरसावंद्य मानली! आई-वडिलांची आजीवन सेवा केली! जीवाला जीव देणारी माणसं उभी केलीं! असं असतांना लोकशाहीत ही हुकुमशाही कशी काय? महाराज ताड्कन उठतील आणि आपले राज्य निर्माण करण्याची प्रतिज्ञा करतील, परंतु कुणीतरी पक्षप्रमुख महाराजांच्या हातात आपल्या पक्षाची सूत्रे सोपविल का?
            असो, असे एक ना अनेक प्रश्न उभे राहतील. तेंव्हा, सज्जनहो, गेलेली माणसं पुन्हा परत येत नसतात. त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा वसा-वाण घेऊनच आपल्याला पुढे जावे लागेल! आपल्या जीवनात, वागण्या, बोलण्यात, कार्यात छत्रपती शिवाजी महाराज आणावे लागतील! असे होणे महाराज पुन्हा येणे होय! हीच खरी शिवजयंती! जय हिंद! जय शिवराय!

प्रा.डॉ.विठ्ठल खंडूजी जायभाये
कै.रमेश वरपूडकर महाविद्यालय, सोनपेठ
जि. परभणी (महाराष्ट्र)
मो. 9158064068

(टीप: लेखक हे व्याख्याता, शिवचरित्रकार, कवी, किर्तनकार, समीक्षक, योग-प्राणायाम प्रशिक्षक आहेत.) 

__________________________

🪀सर्व महत्वाच्या अपडेट मिळवा Whatsapp वर नंबर सेव्ह करा व लोकनेता न्युज ला जॉईन व्हा 👉 https://join.elokneta.in/

About Post Author

error: Content is protected !!