May 9, 2024

भाग १० – शिवजन्मोत्सव: अखंड प्रेरणादायी सोहळा!

लोकनेता न्युज नेटवर्क

        शिवजन्मोत्सव! अखंड प्रेरणादायी दैदिप्यमान सोहळा! ज्या राजाचे नाव सरळ वाचले असता रोमरोमांत प्रचंड उर्जा संचारते आणि हेच नाव उलट जरी वाचले तरी ते नाव सरळ “जिवाशी” येऊन भिडते! सामान्य माणसाच्या हृदयात स्थान निर्माण करणारा आणि सामन्यांची जीवापाड काळजी घेणारा जगातील एकमेवाद्वितीय लोकराजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज! तपस्वीता, तेजस्विता आणि तत्परता या तारुण्याच्या तेजोमय विशेषणांनी वलयांकित नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज! आज्ञाधारक सुपुत्र, सामान्य रयतेचे छत्र म्हणजे शिवाजी महाराज! धैर्यवान, शोर्यवान, कीर्तिवंत, कार्यकुशलतेचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे केवळ आणि केवळ शिवाजी राजेच! अखंड विश्वाच्या इतिहासांत अत्यंत कमी वयात मोठे स्वप्न उराशी बाळगून स्वतःचे कोणतेही भक्कम सैन्यबळ नसतांना एवढेमोठे स्वराज्य उभारणारा एकमेव तरुण राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज! शत्रूंच्या गोटात स्वतः घुसून शत्रूला नामोहरम करणारा, वेळप्रसंगी शत्रूचे पोट फाडणारा असा आमचा एकमेवाद्वितीय शूरवीर शिवछत्रपती! शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या मुलांना एकत्र करून आपल्या जीवाला जीव देणारी सामान्य माणसं असामान्य कर्तृत्वाने घडवणारा महान सम्राट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज!
            साधारणतः १५-१६ वर्षाचा युवक एका असीम ध्येयाने झपाटला. आई-वडिलांकडून आपल्या पूर्वजांचा इतिहास जाणून घेतला. आईने आपल्या मुलाला जीवन किती खडतर आहे? आपल्या मुलाने काय करायला हवे? त्याचे लक्ष काय असायला हवे? आपले मित्र कोण आणि शत्रू कोण? याची समज आणि मूलगामी संस्कार करून बाल शिवबाचे चरित्र घडवले! आपल्यावरील संस्काराचे ऋण फेडण्याचे कार्य अत्यंत कमी वयात करायला प्रारंभ केला. कमी वयात बाल शिवबांना मातोश्रींनी आपल्या घरातील सर्व गोष्टींची जाण करून दिली. त्यांचे ध्येय्य त्यांना ठरवायला संधी निर्माण केलीं. याचा परिणाम असा झाला की; लहान वयातच त्यांना     
शुचित्वं त्यागिता शौर्यं सामान्यं सुखदुःखयोः। दाक्षिण्यं चानुरक्तिश्च सत्यता च सुहृद्गुणाः ॥
या प्रमाणे शुचित्व, त्याग, शौर्य, सामान्य लोकांचे सुख-दु:खे, दक्षता, प्रेम, सत्य आदि सद्गुण अंगी लावून घेतले. कमी वयात महाराजांचे चरित्र आणि चारित्र्य घडले. त्यांच्यासमोरील अनेक प्रसंगांनी त्यांना दूरदर्शी बनवले. जेमतेम सोळा वर्षे  वयाचे असतांना महाराजांनी मोठ्या हिकमतीने आणि शौर्याने तोरणा गड घेतला आणि स्वराज्याचे तोरण बांधले. त्यानंतर महाराजांची घोडदौड थांबलीच नाही. दऱ्या-खोऱ्यातील अठरापगड जातीतीतील शूर, लढवय्ये, निधड्या छातीच्या तरुणांचे संघटन उभे केले. जीवाला जीव देणारी माणसं उभी केली. लढायला तयार झाली. यवनांच्या दडपशाहीने सामान्य रयत त्रस्त झाली होती. शेतातील धान्य आणि घरातील माय-माऊलीची इज्जत असुरक्षित होती. सामान्य माणूस भयभीत झाला होता. ही सगळी परिस्थती महाराजांनी जवळून पहिली. लोकांचे अश्रू पुसण्याचे आणि त्यांच्यात आत्मबल निर्माण करण्याचे महत्कार्य महाराजांनी केले. आपल्या माणसाचे आपले स्वराज्य उभे रहावे अशी रयतेची इच्छा महाराजांनी पूर्ण करण्याचे ठरवले. त्यासाठी अनेकावर अनेक मोठमोठ्या संकटांना त्यांना सामोरे जावे लागले. पन्हाळगडाचा वेढा, अफझलखान प्रसंग, आग्रा येथील बंदिवास अशा एक ना अनेक घटनांनी महाराजांचे जीवन तावून सुलाखून निघाले. अनेकवेळा महाराजांना शत्रूचे बलाबल पाहून तह करावे लागेल. वाटाघाटी करणे भाग पडले, प्रसंगी माघार घ्यावी लागली मात्र आपल्या ध्येय्यापासून महाराज तसूभरही विचलित झाले नाहीत. काळ मोठा खडतर होता. कडेकोट वर्णव्यवस्था असतांना राज्याभिषेक करण्याचे धाडस महाराजांच्या अंगी आले याचे कारण म्हणजे महाराजांच्या पाठीशी असलेले सर्वसामान्य लोकांचे भक्कम पाठबळ! महाराजांनी मोठे संकल्प केले आणि त्या संकल्पांना सिद्धीस नेण्यासाठी अहोरात्र परिश्रम केले. या कार्यात जीवाला जीव देणारी माणसे महाराजांसोबत उभी राहिली. जीवा महाला, तानाजी मालुसरे, शिवा काशीद, बाजीप्रभू देशपांडे, नेताजी पालकर, यसाजी कंक आदि नरवीर तरुणांनी महाराजांच्या जीवाला जीव देऊन स्वराज्य उभे करायला तयार केले.
            आज सगळीकडे शिवजन्मोत्सव सोहळा मोठ्या जल्लोषात संपन्न होत आहे! छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वसामान्य माणसांचे मानदंड आहेत. त्यांच्या महान जीवनाचा आदर्श आपल्यासमोर उभा आहे. देशाला आज या सर्वच महापुरुषांच्या कार्य-कर्तृत्वाची नितांत गरज आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य आणि त्यांची “प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता  शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते” ही शिवमुद्रा सर्वकाही कथन करते. याच अनुषंगाने महाराजांचा पोवाडा लिहितांना महात्मा ज्योतीराव फुले लिहितात,
भिडस्त भारी । साबडा घरीं ॥ प्रिय मधुरी । भाषण करी ॥
मोठा विचारी । वर्चड करी ॥ झटून भारी । कल्याण करी ॥
आपासोयरीं। ठेवी पदरीं ॥ लाडावरी । रागावे भारी ॥
हे वजनदार वर्णन एकूण आणि वाचून आज आपण सावध व्हावे आणि महाराजांचा दैदिप्यमान इतिहास आपल्या जीवनी उतरवावा लागेल.
            आज तरुणाई सगळीकडे शिवाजी महाराजांचा जयघोष करत आहे, ही मोठीं आनंदाची बाब आहे! असे असले तरी वर्तमान मोठा खडतर दिसतोय. तमाम तरुणाईला व्यसनाने विळखा घातला आहे. नुकुताच मिसरूड फुटलेला तरुण दारू पितोय, गुटखा खात आहे. तो मोबाईलच्या आहारी गेलाय. मुलींच्या तुलनेत मुले जास्तच वाया गेले आहेत. मुलींचे यशस्वी होण्याचे प्रमाण मुलांपेक्षा अधिक आहे. उद्याचे होणारे देशाचे नागरिक जर आज असे अनियंत्रितपणे वागायला-जगायला लागले तर उद्या देश कुणाच्या हातात जाईल? ही खूप मोठी धोक्याची सुचना आहे. तेंव्हा, आपण वेळीच सावध व्हायची वेळ येऊन ठेपली आहे. सगळीकडे शिवजयंतीचा सोहळा संपन्न होतांना तरुणाई जर आवाक्याबाहेर जाऊन वर्तन करायला लागली तर देशाचे काय होणार? वेळ अजून गेली नाही. इथल्या पालकांनी जागे होऊन आपल्या मुलांवर नियंत्रण ठेवावे लागेल. या पिढीवर मूलगामी संस्कार करावे लागतील. असे झाले तरच शिवजयंती सोहळा साजरे करणे योग्य राहील. तेंव्हा, चला तरुणानो, पालकांनो, सावध होऊन शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करुया. महाराजांचे धैर्य, शौर्य, राजनीतिज्ञ, कर्तव्यदक्ष, मातृ-पितृभक्त, रयतेचा राजा, शीलवंत, कीर्तिवंत, प्रज्ञावंत, गुणवंत हे सगळे महाराजांचे गुण आपल्या अंगी ठसवावे लागतील. असे झाल्यास खऱ्या अर्थाने हा शिवजन्मोत्सव सोहळा आनंददायी, प्रेरणादायी, सफल होईल, अन्यथा आणखी एक कार्यक्रम, बस्स! जय हिंद! जय शिवराय!

प्रा.डॉ.विठ्ठल खंडूजी जायभाये
कै.रमेश वरपूडकर महाविद्यालय, सोनपेठ
जि. परभणी (महाराष्ट्र)
मो. 9158064068

(टीप: लेखक हे व्याख्याता, शिवचरित्रकार, कवी, किर्तनकार, समीक्षक, योग-प्राणायाम प्रशिक्षक आहेत.) 

__________________________________

🪀सर्व महत्वाच्या अपडेट मिळवा Whatsapp वर नंबर सेव्ह करा व लोकनेता न्युज ला जॉईन व्हा 👉 https://join.elokneta.in/

About Post Author

error: Content is protected !!