May 9, 2024

“कर्मयोगी संत गाडगे बाबा”

This get from this site or source

लोकनेता न्युज नेटवर्क

गाडगे बाबांचा । शिक्षण संदेश ॥
हाची उपदेश । कीर्तनात ॥ १ ॥

खरी सत्यसेवा । दरिद्री लोकांची ॥
सेवा गरिबांची । रात्रंदिन ॥ २ ॥

घर बेघरांना । अन्न भुकेल्यांना ॥
वस्त्र उघड्यांना । दानपुण्य ॥ ३ ॥

स्वच्छता नांदावी । उद्देश सम्यक ॥
कर्मांत दैनिक । सामाजिक ॥ ४ ॥

अंधश्रद्धेतून । मुक्त केले जन ॥
घडविले मन । सत्यनिष्ठ ॥ ५ ॥

गाडगे बाबांचा । माणूसकी धर्म ॥
जनसेवा कर्म । रात्रंदिन ॥ ६ ॥

जन जनार्दन । खरे पांडुरंग ॥
सेवेत श्रीरंग । शोधणारे ॥ ७ ॥

गाडगे नी काठी । सुंदर ते ध्यान ॥
जीवनाचे ज्ञान । कृतीतून ॥ ८ ॥

सामाजिक क्रांती । कीर्तनात केली ॥
विचारात न्हाली । जन मनं ॥ ९ ॥

गाडगे बाबांचा । जीव निरिच्छता ॥
त्याग निस्पृहता । जीवनात ॥ १० ॥

भुकेला जेवण । तहानेला पाणी ॥
मधुर ती वाणी । कीर्तनात ॥ ११ ॥

खराटा गाडगे । बाबांची संपत्ती ॥
कीर्तनात गाती । जनगीत ॥ १२ ॥

तिर्थी अन्नछत्रे । करुनी स्थापन ॥
तीर्थयात्री मन । आनंदित ॥१३॥

पंगुंना औषधी । मुक्यांना अभय ॥
वाटू नये भय । जीवनात ॥ १४॥

गरीब जनांना । भांडे वितरण ॥
स्वतःचे जेवण। खापरात ॥ १५ ॥

दु:खी जनांसाठी । देह झिजवून ॥
संदेश महान । कीर्तनात ॥ १६ ॥

जरीचे कापड । अपंगांना देई ॥
अंगभर घेई। वस्त्र चिंधी॥ १७॥

तत्त्व पुरोगामी । कीर्तनात वाणी ॥
विचार सरणी । क्रांतिकारी॥ १८॥

चालते बोलते । खरे विद्यापीठ ॥
सत्य ज्ञानपीठ । कर्मयोगी ॥ १९ ॥

गाडगे बाबांना। करितो नमन ॥
करांनी वंदन । कोटी कोटी ॥ २०॥

अभंगकार
-प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले
रुक्मिणीनगर,जि.अमरावती 
भ्र.ध्व.:-८०८७७४८६०९

__________________________________

🪀सर्व महत्वाच्या अपडेट मिळवा Whatsapp वर नंबर सेव्ह करा व लोकनेता न्युज ला जॉईन व्हा 👉 https://join.elokneta.in/

About Post Author

error: Content is protected !!