May 20, 2024

पर्यावरण संवर्धन चळवळ लोक चळवळ होणे काळाची गरज – वनश्री जनाबापू मेहेत्रे

लोकनेता न्युज नेटवर्क

देऊळगाव राजा :- मानव आणि पर्यावरण यांचे नाते अतूट आहे.पर्यावरण समृद्ध असले तरच मानवाला तथा इतर सजीवांना सुखाने जगता येते.दिवसेंदिवस होत चाललेल्या पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे वाढते तापमान,रोगराई,विविध प्रदूषणे, अवर्षण,महापुर इत्यादी पर्यावरणीय समस्या निर्माण झाल्या आहेत.त्यामुळे वसुंधरेवरील सजीव सृष्टी धोक्यात आली आहे.विविध पर्यावरणीय समस्यांवर मात करून मानव तथा इतर सजीवांच्या संरक्षण व संवर्धनासाठी पर्यावरण संवर्धन चळवळ लोक चळवळ होणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ पर्यावरण प्रेमी वनश्री जनाबापू मेहेत्रे यांनी केले.
    नारायणराव नागरे महाविद्यालय दुसरबीडच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे आठ दिवसीय श्रमसंस्कार शिबिर महाविद्यालयाचे दत्तक ग्राम पिंपळगाव कुडा येथे पार पडले.सर्वप्रथम कार्यक्रमास उपस्थित प्रमुख मान्यवर वनश्री जनाबापू मेहेत्रे,लोकजागर परिवाराचे प्रवीण गीते,बुलढाणा अर्बन परिवाराचे ज्ञानेश्वर देशमाने,पत्रकार भगवान नागरे,प्रा.दीपक देशमाने,प्रा. गणेश घुगे,प्रा.सत्यम सर,प्रा.महेश सर,प्रा.नयना मॅडम,श्री.ढोके सर इत्यादींनी परमपूज्य गाडगेबाबा व परमपूज्य भगवानबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ. दीपक देशमाने यांनी केले तर प्रवीण गीते,ज्ञानेश्वर देशमाने यांनीही समायोजित मार्गदर्शन केले.पुढे बोलताना वनश्री मेहेत्रे म्हणाले की आज मानव स्वतःच्या स्वार्थासाठी वारेमाप वृक्ष कटाई करत आहे ध्वनी,वायू व जलप्रदूषण वाढवत आहे.गाईंच्या कत्तली करत आहे. शेतीमध्ये अतिरिक्त रसायनांचा वापर करत आहे.तर पिकांवर हानिकारक विषारी औषधे फवारल्यामुळे जमीन,अन्नधान्य,भाजीपाला विषारी झाल्याने आरोग्य धोक्यात आले आहे.म्हणून आरोग्य संवर्धनासाठी पर्यावरण संवर्धन होणे नितांत गरजेचे आहे.म्हणूनच उज्वल वर्तमान आणि भविष्यकाळासाठी प्रत्येकाने पर्यावरण पूरक जीवनशैलीचा अंगीकार करून पर्यावरण संवर्धन चळवळीत सहभागी होऊन ही चळवळ लोक चळवळ होणे गरजेचे असल्याचे सांगितले.
     कार्यक्रमाच्या निमित्ताने मेहेत्रे यांनी उपस्थितांना पर्यावरण संवर्धन प्रतिज्ञा दिली तर पिंपळगाव गावचा पिंपळाचा वारसा जपण्यासाठी विद्यार्थ्यांना पिंपळाचे वृक्ष रोपटे भेट स्वरूपात दिले. कार्यक्रमास महाविद्यालयाचे शिबिरार्थी,गावकरी तथा महाविद्यालयाचे प्राध्यापक वृंद उपस्थित होते.

___________________________________

🪀सर्व महत्वाच्या अपडेट मिळवा Whatsapp वर नंबर सेव्ह करा व लोकनेता न्युज ला जॉईन व्हा 👉 https://join.elokneta.in/

About Post Author

error: Content is protected !!