May 9, 2024

पर्यावरण व जलसंवर्धनासाठी प्रत्येकाने आग्रही राहावे…. संत भगवान बाबा महाविद्यालयाच्या एन.एस.एस.शिबीरामध्ये वनश्री जनाबापू मेहेत्रे यांचे प्रतिमादन

लोकनेता न्युज नेटवर्क

     भौतिक सुखासाठी तथा आपल्या स्वार्थासाठी पर्यावरणाला अमानुषपणे ओरबाडणाऱ्या मानवाचे भवितव्य हे निसर्गावर अवलंबून आहे.इथला निसर्ग अर्थात पर्यावरण आणि निसर्गाने दिलेली महान देणगी पाणी,जमीन,वनराई,पशुपक्षी,अनमोल नैसर्गिक संपत्ती जर मानवाने जपली नाही तर मानव जातीसह वसुंधरेचा विनाश अटळ ! म्हणूनच प्रत्येकाने पर्यावरण व जलसंवर्धनासाठी आग्रही राहावे असे प्रतिपादन धरती बचाओ मिशन परिवाराचे सी.एम.डी. वनश्री जनाबापू मेहेत्रे यांनी केले.
       संत भगवान बाबा कला महाविद्यालय सिंदखेड राजाच्या वतीने जलसंवर्धनासाठी युवक ही संकल्पना घेऊन महाविद्यालयाच्या एन.एस.एस.च्या वतीने महाविद्यालयाचे दत्तक ग्राम पळसखेड झाल्टा येथे आठ दिवशीय विशेष श्रमसंस्कार शिबिर आयोजित करण्यात आले होते.
      सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते प.पू.भगवान बाबा,प.पू.गाडगेबाबा व वृक्ष पूजन करण्यात आले.दुपारच्या बौद्धिक सत्रात स्त्रीभ्रूणहत्या एक सामाजिक कलंक या विषयावर बोलताना प्रा.डॉ.संगीता वळसे यांनी स्त्रीभ्रूण हत्या एक सामाजिक कलंक असून लिंगभेद चाचणी न करता बाळाला जन्म घेऊ द्यावा व स्त्री पुरुष समानतेचे तत्त्व प्रत्येकाने पाळण्याचे आवाहन करत लिंग गुणोत्तराचे सामाजिक दुष्परिणाम विशद केले.तर अध्यक्षीय मनोगतात प्रा.डॉ.भीमराव उबाळे यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरण ,स्त्री सन्मान,शिस्त,श्रम,स्वावलंबन व संस्कारांचे महत्त्व विद्यार्थी व उपस्थित गावकऱ्यांना पटवून सांगितले…….
       कार्यक्रमाच्या निमित्ताने वनश्री मेहेत्रे यांनी शिबिरार्थी व गावकऱ्यांना पर्यावरण संवर्धन व जलसंवर्धन प्रतिज्ञा देऊन प्रत्येकाला वया एवढी झाडे लावून त्याच्या संगोपनाचे आवाहन करत महाविद्यालयाला जांभळीचे वृक्ष रोपटे भेट स्वरूपात दिले व शेवटी पर्यावरणाचा जागर करून वातावरण मंत्रमुग्ध केले.
कार्यक्रमाची सुरुवात कु.कोमल राठोड,कु.श्वेता डोईफोडे,कु.आरती जाधव यांच्या स्वागत गीताने झाली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कु.कोमल राठोड हिने केले तर उपस्थितांचे आभार राष्ट्रीय सेवा योजना प्रतिनिधी कृष्णा आघाव यांनी मानले.

     कार्यक्रम प्रसंगी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. सत्यनारायण नागरे,महिला कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.प्रिया बोचे,जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेचे विद्यार्थी व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

_____________

🪀सर्व महत्वाच्या अपडेट मिळवा Whatsapp वर नंबर सेव्ह करा व लोकनेता न्युज ला जॉईन व्हा 👉 https://join.elokneta.in/

About Post Author

error: Content is protected !!