May 8, 2024

बळीराजालाही स्वातंत्र्याच्या 76 व्या वर्षांत तरी स्वातंत्र्य मिळेल का?- प्रा ज्ञानदेव थोरवे

लोकनेता न्यूज नेटवर्क

आष्टी/राजु म्हस्के :- भारतात स्वातंत्र्याचा 76 वा वर्धापन दिन साजरा होत असताना मात्र अद्यापही जगाचा पोशिंदा बळीराजा पारतंत्र्याचे जीवन जगत आहे. त्याचे अनेक बाबतीत स्वातंत्र्य हिरावून घेतले गेले आहे. त्यापासून मुक्तता मिळो अशा भावना शिवसंग्रामचे जिल्हा सरचिटणीस प्रा. ज्ञानदेव थोरवे व शेतकरी वर्गातून व्यक्त केल्या जात आहेत.
         स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाने अनेक क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी केली आहे. एक विकसनशील राष्ट्र म्हणून संपूर्ण जगात भारताकडे आदराने पाहिले जात आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानासह अनेक क्षेत्रात भारताने गगन भरारी घेतली आहे. परंतु शेतकरी व शेती व्यवसायाबाबत राज्यकर्ते कुठे तरी कमी पडत असल्याची खंत व्यक्त केली जात आहे. भारत हा कृषी प्रधान देश आहे. ग्रामीण भागात संपूर्ण अर्थ व्यवस्था ही प्रामुख्याने शेतीवरच अवलंबून असते. असे असताना याकडे दुर्लक्ष करणे भविष्यात धोक्याची घंटा आहे.
          कोरोना महामारीच्या काळात देशाची अर्थ व्यवस्था अडचणीत सापडली असताना फक्त कृषी क्षेत्राने सावरली होती याचाही विसर राज्यकर्त्यांना पडला आहे. स्वातंत्र्याला 76 वर्षे पूर्ण झाली तरीही अनेक अटी व शर्तींमध्ये शेतकर्यांना आडकवून ठेवले गेले आहे. अहोरात्र काबाडकष्ट करून पिकलेल्या मालाला अद्यापही रास्त व किफायतशीर भाव मिळत नाही ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. आजही शेतमालाचे बाजारभाव ठरवण्याचा अधिकार शेतकर्यांना नाही.उत्पादन खर्चावर आधारीत बाजारभाव मिळावा यासाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सातत्याने आंदोलने करावी लागतात हे नक्कीच राज्यकर्त्यांचे कुठेतरी अपयश आहे. कुठेतरी तात्पुरती मलमपट्टी केली जाते, परंतु कायम स्वरूपी तोडगा काढला जात नाही.
         कांद्याला राजकीय पीक समजून कायमच कांदा उत्पादकांवर अन्याय केला जात आहे. वास्तविक पाहता कांदा हे नगदी पीक आहे. यावर ग्रामीण भागात शेतमजूर, छोटे मोठे व्यवसायीक, खतं- औषधे दुकानदार, वाहतूकदार, अडतदार, हमाल, मापारी असे अनेक लोकांचा रोजगाराचा प्रश्न सुटत असतो. तसेच शेतकर्यांच्या मुलांचे शिक्षण, लग्न, घरातील व्यक्तींचे आजारपण, घरदुरूस्ती, कर्जफेड,हे सर्व कांद्यावरच अवलंबून असते.
     कांद्याचे थोडेफार दर वाढले तर शासन लगेच बाजारभाव नियंत्रीत करण्यासाठी तातडीने कार्यवाही करते. परंतु बाजारभाव कोसळलेले असताना कुठलीच उपाय योजना करत नाही ही मोठी शोकांतिका आहे. निसर्गाच्या लहरीपणाचा तर कायमच फटका शेतकर्यांना बसत असतो. त्यामुळे अस्मानी आणि सुलतानी संकटांनी कायमच घेरलेला बळीराजा लवकरच पारतंत्र्यातून मुक्त होऊन स्वातंत्र्य होवो. एवढीच आजच्या स्वातंत्र्यदिना च्या निमीत्ताने शेतकरी नेते तथा शिवसंग्राम चे जिल्हा सरचिटणीस थोरवे यांनी अपेक्षा व्यक्त केली.

__________________________

🪀सर्व महत्वाच्या अपडेट मिळवा Whatsapp वर नंबर सेव्ह करा व लोकनेता न्युज ला जॉईन व्हा 👉 https://join.elokneta.in/

About Post Author

error: Content is protected !!