May 20, 2024

भाग ७ – इतिहास आणि छत्रपती शिवाजी महाराज

लोकनेता न्युज नेटवर्क

    महापुरुष आणि इतिहास हा नित्याचाच कळीचा आणि महत्वपूर्ण विषय! इतिहासकार कोण आहे? तो संशोधक आणि की परदेशी प्रवाशी आहे? इतिहास विश्लेषक किंवा लेखक कोणत्या समूहाचे अथवा धर्माचे प्रतिनिधित्व करतो? हे सगळेच प्रश्न महत्वाचे. आज आपण एकेविसाव्या शतकाच्या पूर्वार्धात असून या काळातील घडणाऱ्या अनेक घटनांवर एकविसाव्या शतकाचा शेवट होणार आहे. त्यासाठी ज्याप्रमाणे भूतकाळात इतिहासकारांवर अनेक आरोप लागले तद्वतच वर्तमानाचा इतिहास आपल्याला मोठ्या जबादारीने लिहावा लागेल.
            शिवाजी महाराजांचा इतिहास मोठा सहज, सोपा परंतु काठीण्यातून गेला आहे! शिवाजी महाराजांचा इतिहास सांगतांना ते क्षत्रिय होते, गोब्राह्मण प्रतिपालक होते हे मुद्दे तेवढे महत्वाचे नाही, जेवढा महाराजांनी रयतेचे राज्य स्थापन करून सामान्यांना आपल्याशी जोडून घेतले. महाराजांचे बहुसंख्य साथीदार सामान्य शेतकरी होते. त्यांचे सोबती हे सरदार, वतनदार, जमीनदार यांची मुजोर पोरे नसून तत्कालीन खालच्या जातींतील गोरगरीब शेतकरी लोक होते. या अनुषंगाने कॉ.पानसरे लिहितात, “ज्या मावळ्यांच्या चिवटपणावर, ज्यांच्या अव्यभिचारी निष्ठेवर आणि असीम त्यागावर शिवाजी अतुलनीय पराक्रम करू शकला ते सर्व मावले म्हणजे सामान्य शेतकरी होते.” महाराजांनी नवनवीन, छोटेमोठे सेनानायक उभे केले. सामान्यातील लोक पराक्रमाने मोठे झाले. तरुण शिवाजी नावाचा पोरगा डोंगर-दऱ्या-खोऱ्यातील बहुजन लोकांच्या वाडी-तांडे-झोपड्यांवर राहू लागला. सामान्यातील लोकांच्या तरुण मुलांच्या वयाचा हा तरुण नक्कीच काहीतरी करून दाखवणार(!) असा आत्मविश्वास लोकांना वाटू लागला. गोरगरीब लोकांच्या घरी राहून त्यांची चटणी भाकर खाणारा हा तरून लोकांना आपल्या कुटुंबातील सदस्य वाटणे साहजिक होते. याचा परिपाक असा झाला की, या तरुणाची लोक वाट पाहू लागले. यातूनच न्हावी जातीतून शिवा काशीद, जीवा महाला, रामोशी जातीचा बहिर्जी नाईक आदि बलुतेदार आणि शेतकरी कुटुंबातील तरुणांनी महाराजांसाठी जीव दिला. “बेरड, रामोशी, आडेकरी वगैरे लोकांना त्यांच्या मगदुराप्रमाणे नौकऱ्या दिल्या” अशी सभासद बखर सांगते. गुन्हेगार जातीतील लोकांना आपल्या प्रशासनात सामील करून सामाजिक सलोखा राखण्याचे महत्कार्य महाराजांनी त्या काळात केले.
            शिवाजी महाराजांचे आरमार हे परंपरागत लोकांकडून न उभारता समुद्राची यथासांग माहिती असणाऱ्या दर्यावर्दी मुसलमानाकडून उभारली गेले. त्यांच्या आरमारात कोळी, सोनकोळी, भंडारी, मुसलमान आदि जातीतील सामान्य लोक होते. “सामान्यांना शिवाजीने मोठे केले आणि मग या सामान्यांनी शिवाजीला मोठे केले आणि मग सर्वांनी मिळून खूप मोठे कार्य केले.” हा इतिहास लोकांना माहीत व्हायला हवा. असं असतांना छत्रपती शिवाजी महाराजांना दैवी, अवतार पुरुष करून त्यांच्या अलौकिक, दैदिप्यमान, महान कार्याला झाकून ठेवण्याचा भावनिक प्रयत्न अनेक इतिहासकारांनी केला. लोकांच्या मनामध्ये देवभोळेपणा आणि चमत्कार पेरून भावनिक करायचे आणि काळी कामे करायची असा सर्रास कार्यक्रम सुरु आहे. भगवा-निळा-पिवळा-हिरवा रंगांत लोक वाटले. बदलत्या काळानुसार नक्कीच हे घातक आहे. महाराजांना “पक्षाप्रमाणे उडता येत होते, शाहिस्तेखानासमोर भिंतीतून प्रगटला” अशी वर्णने इतिहासात आढळतात. हे सारे साफ खोटे आहे. अडाणीपणा आणि इतिहास यातील फरक समजून घ्यावा लागेल.
            विविध राजकीय आणि सामाजिक संघटनांनी शिवाजी महाराजांना भडक-गडद रंगवून भरपूर फायदे करून घेतले. याच बळावर अनेक निवडणुका जिंकल्या! खासदार-आमदार-मुख्यमंत्री पदांपर्यंत याच भावनिक आव्हानाने जाऊन पोहोचले! महाराजांचा देव केला की देश-राज्य लुटायला मोकळे! वर्षातून एकदा भव्य मिरवणूक काढायची, भला मोठा हार घालायचा, भडक-रंजित घोषणा द्यायच्या आणि वर्षभर दारू-गुटखा-वाळू-महसूल चोरी आदि राजरोष धंदे चालू! हे कुठतरी थांबलं पाहिजे. वेळप्रसंगी जयंती झाली नाही झाली तरी चालेल; परंतु इथला माणूस, नौकरदार आणि राज्यकर्ता महाराजांच्या आदर्शांवर चालला पाहिजे. गरीब-श्रीमंत दरी कमी व्हायला हवी. तरुणांनी शिवाजी महाराजांचे खरेखुरे चरित्र अभ्यासून जीवनात शिवराय उतरवायला हवेत! यासाठी अहोरात्र परिश्रम करून आपले ध्येय्य साध्य करायला हवे! असे होणे म्हणजे खऱ्या अर्थाने शिवजयंती साजरी होणे होय! जय हिंद! जय शिवराय!

प्रा.डॉ.विठ्ठल खंडूजी जायभाये
कै.रमेश वरपूडकर महाविद्यालय, सोनपेठ
जि. परभणी (महाराष्ट्र)
मो. 9158064068

(टीप: लेखक हे व्याख्याता, शिवचरित्रकार, कवी, किर्तनकार, समीक्षक, योग-प्राणायाम प्रशिक्षक आहेत.) 

__________________________

🪀सर्व महत्वाच्या अपडेट मिळवा Whatsapp वर नंबर सेव्ह करा व लोकनेता न्युज ला जॉईन व्हा 👉 https://join.elokneta.in/

About Post Author

error: Content is protected !!