May 9, 2024

भाग ६ – हिंदू-मुस्लीम-ब्राह्मण आणि छत्रपती शिवाजी महाराज

लोकनेता न्युज नेटवर्क

     सतरावे शतक मोठे खडतर होते. यवनांचे आक्रमणांनी महाराष्ट्र पुरता नेस्तनाबूद झाला होता. एकीकडे मुस्लीम आक्रमकांनी हिंदुना बळजबरीने धर्मांतरीत केले जात होते. ब्राह्मणेत्तर हिंदू धर्म कट्टरतेमुळे त्रस्त होते. तुकाराम महाराजांना अभंग बुडवायला लावले. धर्माचा पगडा आणि कोणत्याही गोष्टीला लोकमान्यता आवश्यक असते या न्यायाने तत्कालीन लोकांमध्ये “हिंदूधर्म रक्षक राजा” हा विश्वास दृढ होणे आवश्यक होते आणि शिवाजी महाराज त्या काळाचे अपत्य असल्याकारणाने त्यांना हिंदू धर्मावर श्रद्धा-प्रेम असणे यात वावगे ते काय? त्यामुळे त्यांनी आपल्या धर्माचे रक्षण केले असेल तेही बरोबरच आहे. याच्या उलट “इंग्रज आणि मुसलमान भूमिपुत्रांवर अत्याचार करून बळजबरीने धर्मांतर घडवून आणत होते” हे कुठेतरी थांबणे क्रमप्राप्त होते. रयतेचा छळ थांबणे आणि राजाला धर्माने मान्यता देणे गरजेचे असल्याकारणाने महाराज हिंदूधर्म रक्षक होते आणि त्यात वावगे ते काय?  याचा अर्थ असा होत नाही की शिवाजी महाराज इतर सर्वच धर्मांचे द्वेष्टे होते.
            दुर्दैवाने शिवाजी महाराज धर्माच्या रंगाने आवश्यकतेपेक्षा जास्तच रंगविले गेले. “हिंदू धर्म रक्षक, हिंदू पात पातशहा, गोब्राह्मण प्रतिपालक, विष्णूचा-शिवाचा अवतार, भवानी मातेने तलवार दिली” अशा गडद प्रतिमा रंगवल्या गेल्या. यातून ज्यांनी त्यांनी आपले इप्सित साध्य करून घेतले, परंतु “शूर, पराक्रमी, वीर्यवान, धैर्यवान, शक्तिशाली, बलशाली, निर्णयकठोर, कुशल प्रशासक, देशभक्त, थोर मातृ-पितृ भक्त, रक्षण करता, सर्वकाळ युवकांचे प्रेरणास्थान, धर्म सहिष्णू, लढवय्या योद्धा, चारित्र्य संपन्न, चारित्र्यवान, स्त्री शक्ती आणि अब्रू रक्षणकर्ता, दृष्टा राजा, प्रेमळ राजा, कनवाळू राजा, शेतकरी प्रेमी, जीवमात्रांवर प्रेम करणारा राजा, पत्नीला सन्मान देणारा राजा, शत्रूंना क्षमा करणारा राजा, उत्कृष अर्थतज्ञ, उत्कृष्ट राजनीतिज्ञ, कुशल दर्यावर्दी, उत्तम शेतकरी, उत्कृष्ट श्रोता, वारकरी, अभंग रचना करणारा, भजन-कीर्तन ऐकणारा, पिडत-दु:खीतांचा मदतनीस” आदी महाराजांच्या संबंधाने महत्वपूर्ण गोष्टींचे प्रतिपादन होणे अत्यावश्यक होते. महाराजांच्या दैदिप्यमान सद्गुणांचा प्रचार-प्रसार होणे अपेक्षित होते. पोवाडेकार, व्याख्याते, कीर्तनकार यांनी केवळ धर्माच्या अनुषंगाने चरित्र रंगवून खरे शिवाजी महाराज लोकांसमोर आणलेच नाही.
            हिंदूधर्म, मुस्लीम द्वेष आणि मराठा यावर शिवाजी महाराज यशस्वी झाले असते का? तसे असते तर तत्कालीन इतरही हिंदू-मराठे सरदार का यशस्वी झाले नाही? उलट त्यांनी यवनांच्या फौजेला घाबरून त्यांचे मांडलिकत्व स्वीकारले. या उलट बरेच मुसलमान हिंदू धर्म विरोधक नव्हते. “इतिहासात मुस्लीम राज्यकर्त्यांच्या हिंदू धर्माबद्दलच्या सहिष्णू वृत्तीचे अनेक पुरावे उपलब्ध आहेत.” महाराजांना जात-धर्म प्रेम महत्वाचे नसून स्वराज्य स्थापना महत्वाचे होती.
            वर्तमानात छत्रपती शिवाजी महाराज समजून घेतांना आणि त्यांच्या चरित्र-कार्याबद्दल मोठ्या जबाबदारीने बोलले पाहिजे. महाराजांच्या प्रतिमा आणि इतिहास राजकीय लोकांनी आवश्यकतेपेक्षा जास्तच  (गैर)वापर करून घेतला. सगळ्यांचेच पुतना मावशीचे प्रेम उफाळून येत आहे! जात-धर्म-पंथाच्या अनुषंगाने लोकांना भावनिक बनवायचे, मते घ्यायची आणि पाच वर्षे रयत वाऱ्यावर! देशातील अनेक खासदार-आमदार संसदेत अथवा विधानसभेत एक शब्दही बोलत नाहीत. रस्त्याने पायी चालता येत नाही आणि साहेबांच्या वाढदिवसाच्या पोस्टर-फटाक्यांचा खर्च कोटीत! जनता डोळे असून आंधळी झाली आहे. तळी उचलणाऱ्या निर्बुद्ध लोकांचे प्रचंड पिक आले आहे! सगळीकडे दारूडेच दारुडे! मिसरूड न फुटलेला तरुण पिऊन तर्र आणि वरून शिवाजी महाराज की जय! हे चित्र भयंकर आहे! इथले राजकारण्यांनी पिढ्या बरबाद केल्यात, वर महाराजांचे नाव घेऊन मिरवताहेत. वर्धा येथे संपन्न झालेल्या मराठी साहित्य संमेलनात डॉ.अभय बंग यांनी “महाराष्ट्र नाही तर मद्यराष्ट्र!” असा राज्याचा उल्लेख करून सर्वांनाच विचारप्रवण केले आहे! पण लक्षात कोण घेतो? सत्ता, पैसा, जात, धर्म याचा धुमाकूळ सुरूच आहे! सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे, आपण वेळीच सावध होऊन यावर नियंत्रण आणावे लागेल! यासाठी छत्रपतींच्या चरित्रातून जागृतीचे काम सर्वांनाच करावे लागेल. असे होणे म्हणजेच खरी शिवजयंती साजरी करणे होय! जय हिंद! जय शिवराय!

प्रा.डॉ.विठ्ठल खंडूजी जायभाये
कै.रमेश वरपूडकर महाविद्यालय, सोनपेठ
जि. परभणी (महाराष्ट्र)
मो. 9158064068

(टीप: लेखक हे व्याख्याता, शिवचरित्रकार, कवी, किर्तनकार, समीक्षक, योग-प्राणायाम प्रशिक्षक आहेत.) 

________________________

🪀सर्व महत्वाच्या अपडेट मिळवा Whatsapp वर नंबर सेव्ह करा व लोकनेता न्युज ला जॉईन व्हा 👉 https://join.elokneta.in/

About Post Author

error: Content is protected !!