May 8, 2024

वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य साहित्य आघाडी आयोजित वंजारी समाजाचे पहिले राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन नाशिक संमेलन अध्यक्ष खानदेश रत्न प्रा वा ना आंधळे यांचे अध्यक्षीय भाषण

वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य साहित्य आघाडी आयोजित पहिले राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन,नाशिक दि. २५ डिसेंबर २०२२​

लोकनेता न्युज नेटवर्क

     सविनय नमस्कार,
वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य आयोजित पहिल्या राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनात उपस्थित कवी, लेखक, साहित्यिक, पत्रकार तसेच रसिक श्रोते समाज बंधुभगिनींचे संमेलनाचा अध्यक्ष या नात्यानं मी आपणा सर्वांना सविनय नमस्कार करतो. आपले स्वागत करतो.
       मंत्रभूमी ते यंत्रभूमी असा परिचय असणाऱ्या नाशिकमध्ये ज्ञानपीठाच्या पुरस्काराने दैदिप्यमान झालेल्या कुसुमाग्रज नगरीमध्ये व प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पूनित झालेल्या या धरेवर आज दि. २५ डिसेंबर २०२२ रोजी साहित्य आणि समाज या दोन्ही संकल्पना नव्या आयमासह सजग व्हाव्यात म्हणूनच हे देखणे आयोजन.
       क्षत्रिय कुळाची कुलदैवत रेणुकामाता, नवनाथ संपद्रयातील संत आवजीनाथ महाराज, सद्गुरू संत वामनभाऊ महाराज, बहुजन समाजात शिक्षणाची ज्ञानगंगा घराघरात पोहचविणारे आधुनिक भगिरथ राष्ट्रसंत भगवान बाबा, शिक्षणाचं महत्त्व जाणून शिक्षणाचं जाळं निर्माण करणारे स्व.क्रांतीवीर वसंतरावजी नारायणराव नाईक, राज्यातले पहिले मंत्री शंकररावजी राख, पहिले केंद्रीय मंत्री बबनरावजी ढाकणे व वंजारी समाजाची देशभरात ओळख निर्माण करणारे माजी उपमुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय ग्रामविकास मंत्री समाजाचे प्रेरणा स्थान लोकनेते स्व.गोपीनाथरावजी मुंढे साहेब या सर्व समाज वैभवाला मी विनम्र अभिवादन करतो.
       व्यासपीठावर उपस्थित महाराष्ट्र राज्य वंजारी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष, समाज इतिहास अभ्यासक व लेखक आणि प्रबोधनाचे निष्ठावान अधिकारी वंदनीय गणेशजी खाडे साहेब, संमेलनाचे उदघाटक साहित्य तपस्वी विदर्भरत्न जेष्ठ कादंबरीकार वंदनीय बाबारावजी मुसळे, तसेच समारंभाचे प्रमुख अतिथी सिद्धिविनायक मानव कल्याण विकास मिशन नाशिक येथील मा.ह.भ.प. तुळशीदास महाराज गुट्टे, नाशिक येथील सुप्रसिद्ध उद्योगपती बुधाजीराव पानसरे, व्ही.एन.नाईक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.पंढरीनाथ थोरे, मेंबर बार कॉउंसिल ऑफ इंडियाचे मा. जयंत जायभावे, राज्य सरचिटणीस डॉ.लक्षराज सानप, जेष्ठ विचारवंत काकासाहेब खांबाळकार, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड, भाजप शहराध्यक्ष गिरीश पालवे, भटके विमुक्त घुमांतूक परिषदेच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा मा.सौ.कांचनताई खाडे, प्रकाशिका कवयित्री साहित्यिका आघाडी राज्य मार्गदर्शक मा.सौ.लताताई गुठे, केन ग्लोबल इंटरनॅशनल स्कूल नाशिकचे अध्यक्ष मा. ज्ञानोबा केंद्रे, साहित्य आघाडीच्या राज्य सरचिटणीस मा.सिंधुताई दहिफळे, विख्यात वैद्य मा. विजय दहिफळे, साहित्य आघाडीच्या राज्य संघटक मा.सौ.सुषमा सांगळे-वनवे, महिला साहित्य आघाडीच्या अध्यक्षा मा.सौ.शीतलताई नागरे-चोले व महाराष्ट्र शासन उद्योजगता पुरस्कार विजेत्या मा.सौ.आरती मोराळे, प्रा.डॉ. शिवाजीराव हुसे, दामोदर मानकर, मारुती उगले, लक्ष्मण जायभाये, माधुरीताई पालवे, व्यासपीठासमोरील उपस्थित श्रोत्यांमध्ये बसून माझ्या अध्यक्षीय भाषणाची परीक्षक व जिच्यामुळे माझा जीवन व लेखनप्रवास यशस्वी आणि समृद्ध झाला ती माझी अर्धांगिनी सौभाग्यवती रत्नप्रभा आंधळे, ज्यांच्या अथक परिश्रमाचं फलित हे संमेलन, ते म्हणजे स्वागताध्यक्ष आदरणीय प्रशांतराव आंधळे तसेच स्वागत समितीचे सन्माननीय सदस्य सर्वश्री के.के.सानप सर, डॉ.रघुनाथ रा.बोडके, शिवाजीराव वंजारी, दिलीप कुटे, मनोज बुरकुले, एम.डी.बुरकुले, दत्तात्रय का. बेदाडे, ऍड.सौ.प्रतिभा प्र. आंधळे, श्रीमती चंद्रकला साबळे, रमेश आव्हाड, डॉ.मंजुषा दराडे, सारंग दराडे, अभिजित दिघोळे, डॉ.बापूसाहेब नागरगोजे, रणजित आंधळे, बाळासाहेब घुगे, रंगनाथ दरगुळे, ऍड. तानाजी जायभावे, राजेंद्र मुंढे, डॉ.संगीताताई घुगे, दि.बा.मुंढे, सुरेश कालेरु(तेलंगाणा), सूत्रसंचालक अनिल सानप व संदीप ढाकणे, वंजारी पुकारचे दत्ता जायभाये, दै. चालूवार्ता औरंगाबाद चे उपसंपादक मोहन आखाडे, दै.सोमेश्वरसाथीचे बाळासाहेब फड, पत्रकार मोहन शिरसाठ, रामभाऊ आवारे, लोकनेता न्युज चे ज्ञानेश्वर बुधवंत अर्जुन डोमाडे, यांचेसह उपस्थित सर्व मान्यवर जेष्ठ श्रेष्ठ साहित्यिक, नवोदित साहित्यिक बंधूभगिनी, उपस्थित पत्रकार बंधुभगिनी, रसिक श्रोतृवृंद समाज बंधुभगिनींनो. ‘आजि सोनियाचा दिनू। वर्षे अमृताचा घनू’ अशी अवस्था आज आणि आत्ता आपणा सर्वांचीच झालीय. संमेलन तेही आपल्या समाजाच्या बॅनरखाली घ्यावं ही संकल्पना निश्चितच अभिनंदनीय आहे. एकदा टाळ्यांचा प्रचंड गजर महाराष्ट्र राज्याच्या वंजारी महासंघासाठी झाला पाहिजे.
      बंधुभगिनींनो मला अध्यक्षपदाचा मान तोही पहिल्या साहित्य संमेलनाचा वंजारी महासंघाने दिला. हा बहुमान जन्मदात्री आईच्या आशीर्वादा इतकाच मला श्रेष्ठ वाटतोय. हे नम्रपणे नमूद करीत महाराष्ट्र राज्य वंजारी महासंघाचे अध्यक्ष आदरणीय गणेशजी खाडे व महासंघाचे सर्व पदाधिकारी यांच्याविषयी ऋण व्यक्त करतो. त्यांना धन्यवाद देतो.
      साहित्य आणि समाज एका नाण्याच्या दोन बाजू. समाजाची निर्मिती झाली आणि साहित्य निर्माणाची गरज भासू लागली. अर्थात निकोप समाज व्यवस्थेचा कणा म्हणूनच साहित्याला पुढे यावं लागलं. यासाठी मोठा काळ मोजावा लागला हेही तितकंच खरं. हे सगळं मंथन करण्याआधी आपला वंजारी समाज त्याचं भूत, वर्तमान आणि भविष्य यावर भाष्य करणं ते या प्रसंगाच उचित औचित्य मला वाटतं. अर्थात वेळेचं भान ठेवून नेमकेपणानं मी नोंदवलेली माझी निरीक्षणं मांडण्याचा माझा हा सविनय प्रयत्न.
      मित्रहो! वंजारी समाजाचा मूळ पुरुष जमदग्नी व रेणुका मातेपासून आपला समाज जन्माला आला. आपले कुलदैवत शंकरपार्वती आहे. यासंदर्भात वादअपवाद होऊ शकतात. त्यात न जाता समाज आणि समाजाची स्थितीगती यावर भर दिलेला संयुक्तिक होईल. वंजारी समाज हा क्षत्रिय होता. काही अपरिहार्य परिस्थितीमुळे समाजाने जंगलाचा आश्रय घेतला व त्यामुळे जंगलाच्या आश्रयाने गटागटाने राहू लागला. पुढे चालून त्याचे रूपांतर तांड्यामध्ये झाले. ओघानेच पाळीव जनावरे बाळगण्याची वृत्ती आली. त्यामुळे स्थलांतरही वारंवार होऊ लागली. प्रामुख्याने राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि गुजरात इत्यादी राज्यात वंजारी समाज आपापल्या सोयीप्रमाणे स्थायिक झाला. त्या त्या ठिकाणच्या भाषा चालीरिती त्याने स्वीकारल्या. तो स्थानिक लोकांशी इतका एकरूप झाला की त्याचे अस्तित्व त्याची ओळख नाहीशी होते की काय? अशी भीती होती. म्हणून इतिहासाच्या नोंदी तपासणं आजही तितकंच गरजेचं वाटतं.
      रानावनातील हाल अपेष्टा सहन करीत केवळ अंगी असलेल्या धाडसीपणामुळे जवळ असलेले पशुधन सांभाळीत आपल्या पूर्वजांनी व्यापार करण्यावर लक्ष केंद्रित केले. या सर्व कार्यकाळात तो आपले मूळ गोत्रही विसरला. त्यातूनच वनचारी, वनजारी ही एक निराळीच जात निर्माण झाली. वंजारी हे मूळचे अस्सल क्षत्रिय आहेत.
      मित्रहो! प्रस्तुत प्रसंगी खोलात जाऊन अधिक तपशील देणे वेळेच्या मर्यादेमुळे शक्य नाही. पण समाज पाया मांडणही अनिवार्य असल्यामुळे आपण पुढच्या टप्प्याकडे जाऊ या. बंधुभगिनींनो शरीर निकोप असलं तर जगणं सुसह्य होतं आणि समाज निकोप असला तर आयुष्य सुसह्य होतं. अर्थात ही सुसंगतता मन शुद्धीवर आधारलेली असते आणि मनशुद्धीसाठी अध्यात्मासारखे दुसरे कोणतेही रामबाण औषध नाही. आपल्या समाजाचं आध्यात्मिक वैभवही प्रचंड आहे, पण बऱ्याच लोकांना आज वर्तमान स्थितीतही त्यांचा परिचय नाही. हे मात्र क्लेशकारक म्हणावं लागेल. सुमारे साडेतीनशे वर्षापूर्वी वीरगाव ता.अकोले जि.अहमदनगर येथे श्री समर्थ आवजीनाथबाबा या संतांचा जन्म शेतकरी असलेल्या वंजारी दाम्पत्याच्या पोटी झाला. अध्यात्माचे तेज आणि ओढ बाबांना बालपणापासूनच लागली. पुढे श्रीकानिफनाथांच्या अनुग्रहाने आवजीनाथ हे श्री समर्थ आवजीनाथ बाबा झाले. प्रबोधनाची वाट दाखविणारे प्रयत्नवादी व विज्ञानवादी दृष्टी देणारे त्या काळातील या समाजसंताने अंधश्रद्धेतून समाजाला बाहेर काढण्यासाठी महतप्रयास केले. आजच्या तरुणाईला आवजीनाथ बाबा कळावेत यादृष्टीने हा अल्पसा उहापोह.
      यानंतर ते समाजोद्धार करणारे संत श्रेष्ठ परम पूज्य भगवानबाबा यांचे समाज प्रबोधन कार्यही मोठ्या उंचीच आहे. त्यांचं सतत सांगणं होतं. स्वतःच स्वतःचे उद्धारकर्ते बना. दुसऱ्यावर विसंबून राहू नका. स्वावलंबी बना. बाबांना जनसामान्यांच्या हिताची तळमळ होती. त्यांची प्रवचनं आणि कीर्तनं पंचक्रोशीतून होत तेव्हा श्रोते मंत्रमुग्ध होत असत. बाबांच्याही आयुष्यात अनेक चढ उतार आलेत. टिकेला सामोरे जावे लागले. पण हार मानली नाही. जनतेला भक्तीमार्गात आणून जातिभेद, हिंसा यांचेपासून दूर केले. सन १९१९ मध्ये नारायणगड ते पंढरपूर अशी पायी दिंडी सुरू केली. १९२६ला नारायण गडावरून नाथ षष्ठी करीता पैठण दिंडी सुरू केली. बाबांनी १३ वर्ष आळंदीत राहून वेगवेगळ्या शास्त्रांचा अभ्यास केला. अंबेजोगाई येथे तीन वर्षे कठोर तपश्चर्या केली आणि जनजागृतीचा वसा स्वीकारीत त्यांचे समकालीन असलेले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा यांच्याशी चर्चा करून बाबांनी बहुजन समाजोद्धाराचा जणू विडाच उचलला होता. बाबांची शैक्षणिक दृष्टीही पल्लेदार व आयुष्याला समृद्ध करणारी होती. नोकरीसाठी शिकू नका आयुष्य सक्षम करण्यासाठी शिका. हेच त्यांचं सांगणं असायचं. संता मला कठोर सुधारक त्या काळाने ठायीठायी पाहिला. ‘बैसोनी पाण्यावरी I वाचीली ज्ञानेश्वरी’ एवढे आध्यात्मिक बळ असणाऱ्या संताच्या वाट्याला मधल्या काळात उपेक्षाच आली. बाबांची ओळख मराठवाडा, विदर्भाचा काही भाग, नगर, नाशिक जिल्ह्याचा काही वगळता संपूर्ण महाराष्ट्रातल्या वंजारी समाजाला २० ते २५ वर्षांपूर्वी झाली. किती हा करंटेपणा थोडक्यात अध्यात्माचा आणि समाज संतत्वाचा समर्थ पाया असलेला आपला वंजारी समाज ही वंजारी बंधू भगिनींसाठी मोठी गौरवाची बाब आहे. पण आपल्या समाजाच एक दुर्दैव म्हणावे लागेल. संत भगवानबाबांना आम्ही समाज मंदिरात, सप्ताह उत्सवात, जयंती मयंती या कार्यक्रमापुरते मर्यादित करून टाकले. त्यांचा उपदेश, त्यांचे चरित्र, त्यांचे कार्य, त्यांनी दिलेला मार्ग या गोष्टी आम्ही खरंच अनुसरल्या आहेत का? यावर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.
      समाजभान उदासीनता उद्विग्न करणारी असून कितीतरी बाबींमध्ये ती दिसून येते. अजूनही आम्ही स्वतःकडे आणि जगाकडे डोळस पणे पाहत नाहीये. जागतिकीकरण, उदारीकरण, अत्याधुनिक तंत्रज्ञान, कृषीवलात झालेली क्रांती आणि आमचे भविष्य याचा अनुबंध समाजातल्या शेवटच्या माणसापर्यंत पोहचलेला दिसत नाही. मोडकळीस आलेली कुटुंब व्यवस्था, सुशिक्षितांची बेरोजगारी, लग्न संस्कारातील बुरसटलेल्या प्रथा, अजूनही सुरु असलेला हुंडा प्रकार, स्त्रीभ्रूण हत्या, स्त्रीस्वातंत्र्य, ऊसतोड कामगारांचे प्रश्न, व्यसनाधीनता, गुंड आणि झुंडशाहीला बळी पडणं आणि समाजातल्या शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या या बरोबरच आत्मचिंतनातून आत्मनिर्भरतेकडे वाटचाल. या सर्व बाबींचा आम्ही केव्हा विचार करणार आहोत?
       संमेलन म्हणजे तरी काय? ते भरवण्याचा उद्देश तरी काय? साहित्य म्हणजे काय? त्याचा समाजाला उपयोग काय? या महाचर्चेसाठी आणि उद्दिष्टपूर्तीसाठी आजच हे संमेलन. आजच हे विचार मंथन.
‘सामाजिक प्रतिष्ठा’ हा शब्द किंवा ही संकल्पना मानवी जीवनात महत्वाची आहे आपण सर्व जाणतो. अनेकदा प्रसंग परत्वे त्याचा उच्चारही करतो. या प्रतिष्ठेची प्रतिष्ठापना करणाऱ्या असामान्य कर्तृत्वाचा या व्यासपीठावरून गौरवोल्लेख करणं हे आपल्या सर्वांचंच कर्त्यव्य आहे. अर्थात आपणा सर्वांचे कंठमणी समाजरत्न वंदनीय स्व.गोपीनाथरावजी पांडुरंग मुंढे साहेब यांच्या सामाजिक प्रतिष्ठेला हे व्यासपीठ त्रिवार मनाचा मुजरा करीत आहे. राजकारणात, समाजकारणात, विविध व्यासपीठावरून साहेबांविषयी कृतज्ञ भावाने बोललं जातं. याचं कारण मुंढे साहेब एक विचार प्रवाह होते. त्यांनी महाराष्ट्रासह भारताच्या नकाशात वंजारी समाजाला चेहरा दिला. वंजारी जातीला राजकीय आणि सामाजिक प्रतिष्ठा मिळवून दिली. बहुजन समाजाची नेटकी मोट बांधणाऱ्या आपल्या साहेबांनी केवढा संघर्ष केला. किती खस्था खाल्ल्या याचा ही अभ्यास नव्या पिढीने जरूर करावा. टाकीचे घाव सोसल्या शिवाय देवपण येत नाही. मुक्कामपोस्ट नाथ्रा, ता.परळी, जि.बीड येथून वारकरी माळकरी आईवडिलांचे आशिष घेऊन बाहेर पडलेला हा बालक यशाचे एकेक शिखर स्वकर्तृत्वाने, जिद्दचिकाटीने सर करीत दिल्लीच्या तख्तापर्यंत धडक मारतो. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदी, लोकसभेत केंद्रीय ग्रामविकासमंत्रीपदी आणि आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये हा शेतकऱ्याचा मुलगा सन्मान पूर्वक जाऊन बसतो आणि धिटाईने बोलतो. ही समाजाच्या दृष्टीनं अभिमान वाटावा, तो वृद्धिंगत व्हावा अशा या दैदिप्यमान घटना आहेत.
       साहेब अष्टावधानी होते. या देशातली तरुणाई त्यांनी सतत डोळ्यापुढे ठेवली. नुसत्या घोषणा देऊन, डीजे वर नाचून भागणार नाही. तरुण मित्रहो! लक्षात असू द्या साहेबांनी नाचायला शिकवलं नाही तर वाचायला शिकवलंय. मला मान्य आहे; उत्सवप्रियता हा आमच्या संस्कृतीचा एक भाग आहे आणि चैतन्य प्राप्तीसाठी आवश्यकही आहे पण त्याचं विद्रुपीकरण होणार नाही यासाठी आपणच विचार केला पाहिजे. जयंती मयंतीचे औचित्य समाजहितैषी विचारांनी पुढे यावं हा साहेबांचाच विचार होता. कारण साहेबांची सूक्ष्मावलोकी दृष्टी व त्यातून स्वसमाजाचं व बहुजन समाजाचं केलेलं संघटन कुणालाही दुर्लक्षिता येणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, संतश्रेष्ठ वामनभाऊ, संतश्रेष्ठ भगवानबाबा यांच्या विचार धारेतून तयार झालेल्या आमच्या लाडक्या नेत्यानं राजकारणाची दिशाच बदलवून टाकली. निर्भीड व स्पष्टवक्तेपणा, महायुतीचे शिल्पकार, माळी-धनगर-वंजारी या सूत्राचे जनक, सामान्यांचे कैवारी, सभागृहातील अभ्यासू व चिंतनशील व्यक्तिमत्व, जनहितासाठी तुरुंगवास भोगणारा नेता, गुन्हेगारांचा कर्दनकाळ, दलित, भटक्या, आदिवासी, मागासवर्गीय जातीजमातींना विकासाच्या प्रवाहात आणणारा राष्ट्रवत्सल नेता. साहेबांचे हे पैलू आमच्या असंख्य पिढ्यांसाठी प्रेरणेचे झरे झालेले आहेत हे सांगितल्या शिवाय राहवत नाही.
        बंधूभगिनींनो आध्यात्मिक, सामाजिक, शैक्षणिक व राजकीय पटलावर आम्ही बऱ्यापैकी सरशी केलीय. पण आम्हाला शेवटच्या माणसाला सोबत घ्यायचंय. उभारलेल्या पायावर (बेसवर) तुम्हा आम्हाला आणि येणाऱ्या पिढयांना एकेक इमला चढवायचंय. यासाठी साहित्य अर्थात वाङ्मयाचे लेखन, वाचन, चिंतन हे महत्वाचे व आवश्यकही. साहित्याला समाज परिवर्तनाचं मूळ म्हटलं गेलंय. साहित्यानं वेळोवेळी जगात ठिकठिकाणी क्रांती घडवून आणली आहे. साहित्यानं जग सुंदर केलंय. साहित्यानं वेदनेला हलकं केलंय. थोडक्यात साहित्य हे समाज परिवर्तनाचं मोठं साधन आहे माध्यम आहे.
       सभोवताली दृष्टी टाकली असता ठिकठिकाणी विविध जाती, धर्म, पंथ, बोली आणि विचारांचे प्रतिनिधित्व करणारी साहित्य संमेलने साजरी होताना दिसतात. यामधून विचार वैविध्य त्याचा प्रचार आणि प्रसार होताना दिसतो. ही बाब निश्चितच स्वागतार्ह आहे. साहित्य संमेलनांमधून साहित्य आणि माणूसकीचा विचार पुढे आला पाहिजे. सामाजिक न्यायाची अधिष्ठान असलेली स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यांची संगोपन व संवर्धन करण्याची नितांत गरज वर्तमानी असल्याचे दिसून येते. समाजाने त्यातल्या त्यात साहित्यिकांनी सुद्धा लहान-मोठा हा भेदाभेद अमंगळ समजून त्याजला पाहिजे. आज मोठ्या झालेल्यांनी शेवटच्या रांगेत होतो हे विसरू नये हे मला नम्रपणे सांगावेसे वाटते. साऱ्यांनासोबत घेऊन चालल्याने साहित्याचा, मानवी बुद्धीचा, विचारांचा आणि कृतीचा खऱ्या अर्थाने विकास होईल. प्रसंगी वैचारिक मतभेद विसरून माणसंआणि पर्यायाने समाज जोडला गेला पाहिजे. यासाठी समाजातल्या साहित्यिकांनी आपले सृजन समाजसेवेत रुजू करावे हे माझे प्रामाणिक मत आहे.
       लेखकाची लेखन भूमिका ही ठाम असणं गरजेचं आहे. जोपर्यंत आमचं जगणं आणि वागणं सकारात्मक आणि एकजिनसी होणार नाही तोपर्यंत आमच्या लेखन सामग्रीची समीक्षाही शुद्ध होणार नाही याकडेही बारकाईने पाहिलं गेलं पाहिजे. साहित्यात वास्तवभान फार महत्वाचं आणि गरजेचं असतं. कल्पनेवर आधारलेलं साहित्य कापुरासारखं उडून जातं हेही या निमित्ताने नव्या लेखन कर्त्यांनी लक्षात घ्यावं. रंजकप्रधान लिहू नये असं मला अजिबात म्हणायचं नाहीय. रंजकता ही मानवी गरजेचा एक भाग आहे या दृष्टीने हरकत नाही पण आमच्या घराला आग लागलीय आणि आम्ही नुसता देवाचा धावा करू लागलो आणि आग विझेल या आशेने थांबलो तर हाती शेवटी राखच येईल. तेव्हा लेखनभान आणि लेखनदिशा याचा विचार लेखनभविष्याला आकार देणारा ठरत असतो. हे लक्षात घ्या कारण संगणकाच्या या युगात जुने सांगून फारसे साधणार नाही म्हणून ज्ञानाच्या कक्षा रुंदावणे हेही तितकेच अनिवार्य ठरते.
     वर्तमानी जागतिकीकरण, उदारीकरण, खाजकीकरण, अत्याधुनिक तंत्रज्ञान यामुळे खेड्यांसह सर्व स्तरांमध्ये झालेला आमूलाग्र बदल व प्रगतीच्या दिशेने पडणारी आमची पाऊलं हे निश्चितच अभिनंदनीय आहे पण त्याचं वेळी संस्कार आणि संस्कृतीची होणारी पायमल्ली, भ्रष्टाचाराचा भस्मासूर, जिल्हापरिषदेच्या शाळांची वाढत चाललेली दुरावस्था, शेतकऱ्यांच्या वाढत चालेल्या आत्महत्या, कौटुंबिक हिंसाचार, बलात्काराचं वाढतं प्रमाण, विवाहसंस्थेतील घटस्फोटाचं वाढतं प्रमाण, वृद्धपकाळात मायबापांची होणारी वाटणी, अर्धवट ज्ञानापायी वाढीस लागणारी व्यसनाधीनता, चंगळवादाने धारण केलेले हिडीस प्रदर्शन, सोशल मीडियाच्या अनावश्यक वापरातून येणारी विकृती या बाबी चिंताजनक असून समाजाची चौकट खिळखिळी होत चालल्याची भयावहता ही सजग लेखण्यांना अस्वथ करताना दिसून येतेय. वाट्यात येणारे अनुभव, परिस्थिती, त्यासाठीचा संघर्ष ह्यातून आलेलं साहित्य हे अस्सल असतं व ते काळ बदलानंतरही आपली मुद्रा कायम ठेवत असतं अगदी माऊलीच्या पसायदानापासून संत तुकाराम, संत नामदेव, संत जनाबाई, संत मुक्ताबाई, संत चोखामेळा ते अण्णा भाऊ साठेंच्या लेखनापर्यंत नव्हे तर सदानंद देशमुखांच्या बारोमास पर्यंत आणि बाबाराव मुसळेंच्या ‘हाल्या हाल्या दुधू दे’ पर्यंत जाणवणारी अस्सलता वाचकाला अंतर्बाह्य समृद्ध करून जाते.
       स्वबोली व मराठी भाषा यांचंही जतन करण्याची गरज आजच्या घडीला अनिवार्य झालीय. इंटरनेटच्या काळातील तरुणाईला या संदर्भात किती चिंता आणि काळजी असेल मला नाही सांगता येणार पण ही चिंता आणि चिंतन आम्हा साहित्यिकांची जबाबदारी आहे. हे नाकारून चालणार नाही. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून अजूनही शासनाच्या दारवठ्याजवळ ताटकळत उभे रहावे लागते आहे. समूहासमूहाने आयोजित होत असलेल्या साहित्यसंमेलनामधून या संदर्भात गर्जनाही केल्या जातायेत. या गर्जना खंडित होणार नाही या भाषिक जबाबदारीला आम्ही समर्थपणे पेलू असे आजच्या संपन्न होणाऱ्या वंजारी महासंघाच्या मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मी हे अधोरेखित करू इच्छितो.
      साहित्यिक मित्रांनो आपल्या वंजारी समाजाच्या साहित्यिकांकडूनही खूप लिहिलं जातंय ही निश्चितच गौरवी घटना आहे. वृत्तपत्रापासून वाङ्मयीन नियतकालिकांपर्यंत, सोशल मीडियापासून साहित्य संमेलनापर्यंत त्याचं सम्यक दर्शन तुम्ही आम्ही घेत आहोत. तरीही माझ्यासह अजूनही आमच्या लेखन जाणीवा तितक्या समृद्ध होत नाही ही कुठेतरी बोच बोचल्याशिवाय राहत नाही. या संदर्भात एक गोष्ट माझ्या मनात पदमश्री डॉ.भालचंद्र नेमाडे यांचं साहित्य वाचल्यापासून सारखी डोकावतेय ती अशी, वंदनीय डॉ.नेमाडे सरांनी आपल्या लेखनातून खान्देशाचा भूभाग, तेथील परंपरा, तेथील सांस्कृतिक वातावरण, तेथील बोली या साऱ्यांना कवेत घेत लेखन केलंय. पण सरांची ही लेखन संपदा ती त्या भूभागापर्यंत म्हणजे खान्देशापर्यन्त मर्यादित न राहता वैश्विक पातळीपर्यन्त जाऊन पोहचली. ती थेट ज्ञानपीठाची मानकरी झाली. थोडक्यात काय आमच्या साहित्य लेखनात वैश्विक जाणिवांची वानवा अजूनही आहे. ती उणीव आम्हाला भरून काढता येईल का? या दृष्टीनेही विचार मंथन झाले पाहिजे. ‘परंपरेची आस आणि नवतेचा ध्यास’ हे सुभाषित मनावर घेण्याची ही वंजारी समाजाच्या सृजनकारांसाठी आवश्यक बाब आहे असे मला नम्रपणे सांगावेसे वाटते. आणि मित्रहो तेव्हाच वंजारी साहित्य हे मराठी साहित्यातील वंचितांचा हुंकार झाल्याशिवाय राहणार नाही. मराठी इतर प्रवाह त्यात वंजारी साहित्याचे वेगळेपण सिद्ध करण्याची हीच वेळ आहे हे आपण सारेच लक्षात घेऊयात.
    सोशल मीडियाच्या माध्यमातून व आजच्या संमेलनाच्या अनुशंगातून कितीतरी दमदार वंजारी साहित्यिकांच्या लेखन भेटी झाल्या. त्यांच्या लेखन तपाचं आणि साधनेच मन भरून दर्शन झालं. कृतकृत्य झाल्याचं समाधान झालं. त्या समस्त लेखण्यांना प्रस्तुत प्रसंगी संमेलनाचा अध्यक्ष या नात्यानं सन्मानित करावं या कर्तव्य भावनेकडे मी आता जातोय. कथा, कादंबरी,नाटक, कविता, बालसाहित्य, स्त्रीवादी साहित्य, बोलीतलं साहित्य, ललित-वैचारिक साहित्य, प्रवास वर्णनं, चरित्र-आत्मचरित्रामक लेखन, स्फुट लेखन सारं कवेत घेताना माझी दमछाकही झाली हे जरी खरे असले तरी या दमछाकीतून आनंद आणि अभिमानानं उर अक्षरशः भरून आला. समृद्धीनं नटलेलं माझं हे सामाजिक सृजनशिवार मला प्रस्तुत प्रसंगी लिहितं करून गेलं. त्या अनुशंगाने वंजारी सृजनकारांच्या लेखन मूल्यांसह थोडक्यात आढावा.
आपल्या समाजातील पहिले कादंबरीकार आदरणीय दिगंबर गोविंदराव मुंढे यांचं नाव मला तरी अनभिज्ञ होत. या तपस्वी लेखकानं एक नाही दोन नाही नऊ कादंबऱ्यांचं लेखन केलंय ही केवढी मोठी सामाजिक व वाङ्मयीन उपलब्धी आहे एवढेच नाही तर ‘विखुरलेल्या कळ्या’ हा कथासंग्रह व ‘अपराधाची क्षमा’ हे नाटकही त्यांचे नावावर आहे. तीन मोठे साहित्य प्रकार त्यांनी लिलया हाताळल्याचे फार मोठे समाधान समाजाला आहे आणि राहील.
      जाणिवेच्या लेखणीचा अधिकारी या शब्दात ज्यांचा गौरव कुणीही चोखंदळ रसिक वाचकान करावा असं एक नाव अर्थातच आदरणीय सोपान हळमकर. सरांनी सत्यकथा या तोलामोलाच्या मासिकांमधून आपली लेखणी गाजवलीय.
     तर माईलस्टोन म्हणून ज्यांचा नावाचा गौरवोल्लेख महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून आजवर दुमदुमतोय ते आजच्या संमेलनाचे उदघाटक सिद्धहस्थ लेखणीचे मालक नित्यवंदनीय बाबाराव गंगाराम मुसळे यांचे निखळ वाङ्मयीन योगदान संस्मरणीय असे आहे. माध्यमिक शिक्षकाच्या नोकरीत राहून समाजाच्या लोकशाळेपर्यंत लाडका समाजसुपत्र लोकशिक्षक पदापर्यंत आपले कर्तृत्व सिद्ध करतो आणि दहा कादंबऱ्या रसिक मनात अक्षरशः कोरून ठेवतो. त्यांच्या कादंबऱ्यांच्या प्रकाशित होणाऱ्या चार चार आवृत्ती मला कोणत्याही पुरस्कारापेक्षा मोठ्या वाटतात. ‘हाल्या हाल्या दुधू दे’ या कादंबरीने तर रसिक, वाचक, समीक्षक, संशोधक या साऱ्यांना जणू वेडच लावलं. जेष्ठ कादंबरीकार डॉ.आनंद यादव विद्वत समीक्षक द.दी.पुंडे यांनी तिसऱ्या पिढीची कादंबरी म्हणून यथोचित गौरव केल्याचे येथे उपस्थित असणाऱ्या साहित्यिकांना आठवत असावं. वैदर्भी बोलीच सौंदर्य आणि तिची मनविभोर मांडणी हे कसब आणि कौशल्य रसिक कसा विसरू शकेल. या खेरीज तीन कथासंग्रह, एक कवितासंग्रह त्यांच्या नावावर असून अनेक प्रतिष्ठा प्राप्त पुरस्कारांनी त्यांचं साहित्य गौरविलं गेलंय. अनेक विद्यापीठांच्या अभ्यासक्रमातून त्यांच्या कादंबऱ्या अभ्यासल्या जातं असून अनेक साहित्य संशोधकांनी पी.एचडी चे प्रबंध लिहिले आहेत. ग्रामीण जनजीवनाचे, तिथल्या संस्कृतीचे, परस्पर संबंधांचे, कृषी जीवनासह तेथील दारिद्र्याचे, शेतीवर होणाऱ्या ऋतुपरिणामांचे इतके वास्तव चित्रण अभावानेच वाचायला मिळते. त्यांचं मातीतून परत परत उगवणं, मूळापासून शेंड्यापर्यंत वाचकाला सोबत घेऊन जाणं वाचक कधीच विसरणार नाही.अशा दमदार लेखणीचा सन्मान ५८ व्या विदर्भ साहित्य संमेलनातून झाला तो त्यांना संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान देऊन. अशा सारस्वतास मी मनोभावे नमन करतो.
    बंधुभगीनींनो, वंजारी समाजाचं वाङ्मयीन तेज मराठी वाङ्मय प्रांती आजमितीपर्यंत झळकतंय ही सामाजिक श्रीमंती असून या श्रीमंतीचा अधिपती म्हणून मी डॉ.किशोर सानप सरांचा आवर्जून उल्लेख करीन. त्यांची लेखन संपदा विपूल तर आहेच. साहित्य, समीक्षा व संशोधनात त्यांनी केलेली कामगिरी त्यांच्यातल्या आभाळ उंचीचे दर्शन घडविणारे आहे. बुद्धिजीवी व साहित्यप्रेमी आदरणीय सानप सरांना वंजारी समाजातले साहित्यभीष्म या उपाधीने गौरविताना मी पाहिलेय. त्यांचे नावावर तीन कादंबऱ्या, दोन कथासंग्रह, एक काव्यसंग्रह आणि तब्ब्ल सोळा समीक्षा ग्रंथ आहेत. सरांचे समीक्षालेखन हे तत्त्वसापेक्ष आहे. १९९० नंतर साहित्यात आलेली काल सापेक्ष नाविण्यता, लेखकाच्या व्यक्तिमत्वाचा व शैलीचा शोध घेणे या विचार सूत्रांच्या आधारे त्यांनी मराठी साहित्यातील कादंबरीची आणि काव्याचीही समीक्षा केलेली दिसून येते. ते आधुनिकता आणि नैतिकतेच्या अनुबंधाचा गांभीर्याने समग्र ललित आणि वैचारिक समीक्षा लेखनात अचूक मेळ घालतात. सरांच्या तीनही कादंबऱ्यांमधून समकालीन समाजाचे चित्र रेखाटलेले दिसून येते. जगण्याची विजिगीषा वृत्ती त्यातून प्रकट झाल्याचेही दिसून येते. त्यांच्या या अथक साधनेला महाराष्ट्र शासनासह अनेक प्रतिष्ठानांनी वेळोवेळी गौरविले असून तीन राज्यस्तरीय संमेलनाचे अध्यक्षपद भूषविणाऱ्या या समाजसुपुत्राचे योगदान मराठी वाङ्मयीन प्रांतास समृद्ध करणारे निश्चितच आहे.
    मराठवाड्याच्या समृद्ध साहित्यभूमीतून सक्षम कादंबरीकार अर्थातच बाळासाहेब गर्कळ यांच्या लेखानानं माझं लक्ष वेधलं ते त्यांच्या ‘उचल’ या कादंबरीने. प्रस्तुत कादंबरीतून ऊसतोड कामगारांच्या व्यथा मांडताना त्यांची लेखणी शस्त्रासारखी परजलेली दिसते. त्यांचे नावावर तीन कादंबऱ्यांसह ‘बापाच्या कविता’ हा वेगळेपण सिद्ध करणारा काव्यसंग्रह आहे.
     मित्रहो, आपल्या वंजारी समाजातल्या लेकीबाळी आणि भगिनींची लेखन साधना पाहू जाता त्यांनी सावित्रीमाईंच्या विचारांची पारायणेच केलेली दिसून येतात. उच्च विद्याविभूषित तर त्या आहेतच शिवाय त्यांचं सृजनातून समर्थपणे व्यक्त होणं जणू समाजाची सांस्कृतिक कमान उंचावल्या सारखं मला सातत्याने मला वाटत आहे. त्यातलं पहिलं नाव आहे मुंबईच्या सौ.लताताई गुठे. समर्थ कवयित्री, लेखिका, संपादिका आणीन प्रकाशिका या सर्व भूमिकांमधून ताईंचा आजवरचा झालेला लेखनप्रवास थक्क करणारा आहे. एकूण वीस पुस्तकांचे लेखन करणाऱ्या या माऊलीनं दोनशेपेक्षा जास्त पुस्तकांचे प्रकाशन करून नव्या पिढीला सातत्याने लिहितं ठेवलंय. शिवाय ‘मोहक युरोपप्रवास’ हे प्रवासवर्णन व ‘मनामना दार उघड’ हे वैचारिक लेखन ताईंचा लेखन परीघ दर्शवितात. अक्षरमात्रांमध्ये छंदोबद्ध लेखन करणाऱ्या या कवयित्रीनं नऊ कवितासंग्रहाचं लेखन योगदान दिलंय. ४७ पेक्षा जास्त राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्काराच्या मानकरी असलेल्या लताताई वंजारी महासंघाच्या कार्यकारणी सदस्य म्हणूनही महाराष्ट्र प्रांताची साहित्य धुरा अगदी कर्तव्य कठोरतेने सांभाळताहेत. आजच्या संमलेनासाठी सुद्धा त्यांचं योगदान संस्मरणीय आहे. 
     यानंतर संशोधन आणि लेखन या क्षेत्रात आपल्या लेखणीचा दबदबा निर्माण करणाऱ्या नांदेड येथील विद्वत प्राध्यापिका भगिनी सौ.संगिता गणपतराव घुगे यांचे नावावर साहित्य व समाज या अनुषंगाने एकूण सात समीक्षात्मक ग्रंथ असून कथा, कविता आणि ललित लेखानातही त्यांनी आपली स्वतंत्र लेखनमुद्रा ताकदीनं गिरवलीय. त्यामुळे अनेक पुरस्कारांच्यात्याही मानकरी झालेल्या आहेत.
        डॉ. द्वारका सुदाम गीते-मुंडे हिंदी विषयाच्या प्राध्यापिका असल्यानं त्यांचं सृजन अर्थातच बहुप्रांतीय झालं. विद्वत संशोधिका, हिंदी तसेच मराठी कवयित्री म्हणून त्यांची लेखन वाटचाल व मिळालेलं यश अभिनंदनीय आहे. ‘युवा पिढीच्या चरित्रात्मक घडणीसाठी साहित्याचं नेमकं योगदान काय?’ या विषयावरचं त्यांचं लेखन समाजभविष्याला आकार देणार झालंय. कथा, कविता, ललित, वैचारिक ही साहित्य संपदा ह्या भगिनींच्या नावे आहे.
      वैचारिक लेखनानं समाजोद्धाराची तळमळ नोंदविणाऱ्या श्रीमती सिंधुताई दहिफळे यांच्या साहित्यातून व व्याख्यानातून त्यांनी दिलेलं समाज भान अधोरेखित करण्यासारखं आहे. त्यांच्या शैलीदार व्याख्यानांमुळे अनेक सभासंमेलनातून त्यांनी मोठमोठी पदं भूषविली आहेत. गझल, अष्टाक्षरी, मुक्तछंद, अशा विविध काव्यप्रकारातून त्यांची कविता महाराष्ट्राच्या दशदिशेत जाऊन पोहचल्या आहेत. त्यांच्या या अथक लेखन परिश्रमाला राज्यस्तरातून जवळपास ६७ पुरस्कारांनी आतापर्यंत मानवंदना दिलीय.

     सौ.अलकनंदाताई घुगे-आंधळे या शिक्षिका असलेल्या स्त्रीवादी लेखिकेने आपल्या लेखनातून सामाजिक दुःखाला फोडलेली वाचा, अन्यायाला चोप देणारे धारिष्ट्य, स्त्री आत्मभानाचा केलेला जागर निश्चितच स्पृहणीय आहे. आशय आणि विषयाला उचित न्याय देणाऱ्या त्यांच्या कथा-कविता, लालित्यपूर्ण लेखन व रसग्रहण विशेष नोंद घेण्यासारखे आहे.
      सातारा जिल्ह्यातून मायणी ह्या खेड्यातून लेखन करणाऱ्या हाडाच्या शिक्षिका सौ.रंजनाताई सानप यांचं लेखन सामर्थ्यही वाचक समीक्षकांच्या डोळ्याचं पारणं फेडणारं आहे. त्यांच्या ‘आकांत’ ह्या शीर्षकाच्या कादंबरीतून असंख्य संकटांना तोंड देणाऱ्या धीरोदात्त स्त्रीची रंगवलेली व्यथाग्रस्त कहाणी समस्त स्त्रीजातीला जिद्दीने पुढे जाण्यासाठी प्रेरणास्रोत व्हावी ह्या धाटणीची झालेली आहे. ताईंचे दोन काव्यसंग्रह, एक कथासंग्रह व लघुनाटिका या लेखनासह लेक वाचवा अभियानात त्यांचा सहभाग त्यांच्यातल्या आदर्श शिक्षिकेचा चेहरा जगासमोर आणणारा आहे. अनेक पुरस्कारांच्या मानकरी असलेल्या या भगिनीचा लेखनप्रवास शिक्षिका ते लोकशिक्षिका असा झालेला दिसून येतो.

    राजकीय,सामाजिक व साहित्यिक या तीनही वाटेवरून सक्षम प्रवास करणाऱ्या आपल्या समाजाच्या धीरोदात्त नेत्या व विद्वत लेखिका सन्माननीय उषाताई दराडे यांचं कथालेखन विश्व वाङ्मयीन मूल्याधिष्टित असून शब्दालय सारख्या चळवळीच्या अंकातून त्यांच्या लेखनाला मानाचं पान मिळालंय.

तर सुषमा सांगळे-वणवे या भगिनीचा लेखन प्रपंच संवेदनशील कवयित्री म्हणूनही त्या ख्यातकीर्त आहे. त्यांच्या लेखन, शिक्षण व समाज कार्याचा गौरव म्हणून महाराष्ट्र शासनाने त्यांना राज्य पुरस्कार देऊन गौरविले आहे.    
    डॉ.शीतल नागरे-चोले, सौ.जना नागरगोजे, सौ.वंदना केंद्रे, सौ.अलका सानप, सौ.सुरेखा डोंगरे, सुरेखाताई खेडकर, मनीषाताई बढे, सत्यभामाताई जाधवर, कु.कल्याणी घुगे, कु.सानिका खेडकर, शीतलताई संखे, सुमनताई आव्हाड, सुलभाताई मुंढे, सुनीताताई सांगळे, छायाताई जायभाये वाघ, श्रीमती छायाताई खेडकर, विद्याताई लटपटे, छायाताई गीते यांचेही लेखन योगदान लक्षवेधी असून या भगिनींचा लेखनप्रवास भविष्यातल्या लेखनकर्त्या भगिनींना प्रेरणास्रोत म्हणून कामी येईल हा माझा ठाम विश्वास आहे.
             बालमन आणि बालपण ज्यांचे स्वास होऊन पुस्तकांच्या पानोपानी रुजलं आणि बालकांच्या अंगोपांगी मनोसोक्त नाचलं अशा बालसाहित्याचे स्वतंत्र दमदार दालन आपल्या सृजनाने उभारणाऱ्या कवी एकनाथ आव्हाड यांचं नाव वंजारी समाज आणि समाजेतर रसिक अभ्यासकांना पुरते ठाऊक आहे. करील रंजन जो मुलांचे जडेल नाते प्रभूशी तयाचे या उक्तीचे सारतत्व आव्हाड गुरुजींच्या लेखनामधून कुणाही वाचकाला दिसावं. लहानग्यांसाठी कथा लेखन, कथाकथन, कविता लेखन, चरित्र लेखन, काव्यकोडी अशा विविध प्रकारांना त्यांनी समर्थपणे साकारलंय. त्यांच्या लेखनाला बालभारती पाठ्यपुस्तकातून स्थान मिळाले असून बालसाहित्य संमेलनाध्यक्षासह महाराष्ट्र शासनाच्या पुरस्कारांनी त्यांचे लेखन गौरविले गेले आहे.
    वंजारी समाजातून वाङ्मय क्षेत्रात मराठवाडा व विदर्भ हे भूभाग अग्रणी राहिलेले दिसतात. मराठवाड्यातले लातूर येथले मित्रवर्य प्रा.डॉ.भास्कर बडे व विदर्भांतून अकोला येथील मित्रवर्य प्रा.डॉ.शिवाजीराव नागरे या मित्रद्वयांनी त्यांच्या लेखनाने उभ्या महाराष्ट्र प्रांती आपली मुद्रा अमीट तर केलीच पण त्यांच्या लेखन सौष्ठवाने माझ्याही मनात एक मोठं घर केलंय हे जाहीरपणे बोलताना मला मनस्वी आनंद होतोय. डॉ.बडे म्हणजे बहुआयामी व्यक्तिमत्व त्यांचा लेखन आलेख पाहताना हा माणूस शब्दशिवार सोबत घेऊनच चालतो फिरतो की काय असे वाटून जाते. कादंबरी,कथा,कविता,बालकादंबरी,लघुचरित्र,वैचारिक लेखन, मुलाखत लेखन या प्रकारात त्यांची ग्रंथसंपदा असून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातून त्यांना सन्मानपूर्वक निमंत्रित साहित्यिक कवी म्हणून बोलावले गेले आहे. अनेक पुरस्कारांचे मानकरी असलेले डॉ.बडे एक विद्वत संशोधक, निस्पृह समीक्षक व प्रतिभा संपन्न कवी तथा कथालेखक म्हणून समाजाला त्यांचा नेहमीच अभिमान राहील. विदर्भरत्न म्हणून ज्यांचा गौरव समाजाने करावा व ह्या व्यासपीठानेही करावा असे संत साहित्याचे साक्षेपी समीक्षक व गाढे अभ्यासक आदरणीय प्रा.डॉ.शिवाजीराव नागरे यांनी संत साहित्यात केलेले संशोधन कार्य हे एक मैलाचा दगड असून त्यांचे नावावर वैविध्याने नटलेले व वाङ्मयीन तेजाने डोळे दिपवणारे सहा ग्रंथ असून मराठवाडा विद्यापीठाच्या एम.ए च्या अभ्यासक्रमात त्यांच्या लेखनास मानाचे स्थान लाभलेले आहे.
        साहित्य, संशोधन आणि समीक्षा या तीनही प्रकारांना यथोचित न्याय देणारे मराठी साहित्यातले व वंजारी साहित्यिकांमधले एक मोठे नाव प्राचार्य.डॉ.सुभाष शेकडे. साडेतीन ते चार दशकांपासून सातत्याने श्वासात साहित्य पेरणाऱ्या डॉ.शेकडे सरांनी लोकसाहित्यात भरीव कामगिरी केलेली असून ‘भलरी’, ‘आतमध्ये कीर्तन’ ही लोकसाहित्याची दोन पुस्तके प्रकाशित आहेत. ‘हाणला कोयता झालो मास्तर’ या शीर्षकाचे त्यांनी लिहिलेले आत्मकथन रसिक, वाचक, अभ्यासक, संशोधक यांनी विशेषत्वाने गौरविले आहे. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या डॉ.शेकडे यांचे लेखन मूळं ग्रामगंधाने चिंब भिजलेली दिसतात. कवी कुंजविहारी यांच्या कवितेवरील त्यांचे चिंतन विशेष लक्षणीय आहे. ‘झोका’ हा त्यांचा कथासंग्रह व स्त्रीगीतांचं त्यांनी केलेलं संकलन त्यांच्या लेखन वाटांचा निर्देश करणारे आहेत.
      कविता आणि कादंबरी लेखन क्षेत्रात आपली स्वतंत्र वाट आणि ओळख निर्माण करणारे नव्या पिढीचे दमदार साहित्यिक म्हणून डॉ.कैलास दौंड यांचे नाव सर्वोतोमुखी आहे. जागतिकीकरणाच्या आगमनानंतर कोलमडलेल्या कृषी व्यवस्थेतील चित्रण, भटक्या तांड्यातील अगतिक जीवन, ग्रामीण कुटुंब व्यवस्था आणि ग्रामीण स्त्रीजीवन, ऊसतोड कामगारांच्या व्यथा यांचं प्रभावी व प्रत्ययकारी दर्शन त्यांच्या लेखन विषयातून होताना दिसतं. त्यांच्या कादंबऱ्या विविध विद्यापीठात अभ्यासक्रमात असून त्यांचे काव्यसंग्रह महाराष्ट्रातील विद्यापीठासह कर्नाटक विद्यापीठात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमात आहेत. याशिवाय संशोधनाच्या अंगाने केलेले लेखनही लक्षवेधी आहे. कथा, बालकथा या वाङ्मय प्रकारात त्यांचे भरीव कार्य आहे. नव्या ताकदीचा कसलेला कादंबरीकार व दर्जेदार कवित्वाचा धनी म्हणून अनेक राज्यस्तरीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा त्यांना मान मिळालेला आहे. डॉ.दौंड यांच्या साहित्य लेखनाने मराठी वाङ्मय क्षेत्री मोलाची भर पडलेली दिसते.
         मित्रहो, समाजातील अनेक हिरे,मोती, माणके आपल्या लेखन कर्तृत्वाने संपूर्ण महाराष्ट्र पादाक्रांत करीत आहे. ज्या दिव्यातून आपला समाज पुढे येतोय, आलाय ते दिव्यच त्याला आकार देतंय. अशाच काही हिऱ्यांचा परिचय मी कर्त्यव्य भावनेने आपणासमोर मांडतोय. नाशिकच्या पावनभूमीत कुसुमाग्रजांच्या छत्रछायेत ज्यांचं बालपण रांगल ते कवी विवेक उगलमुगले. अंतर्बाह्य कवितेनं हा झपाटलेला कवी आपल्या सृजनाची हळवी स्पंदनं बालकांच्या अंगाखांद्यावर लिलया खेळवतो. या कवीनं चार बालकविता संग्रहाच दमदार योगदान मराठी वाङ्मयाच्या दालनात समर्थपणे उभं केलंय. नुकताच ‘ओन्ली फॉर चिल्ड्रेन’ या बालकाव्यसंग्रहास महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळालाय. समाजाच्या शिरपेचात आपल्या लेखन कर्तृत्वाचा तुरा खोवणाऱ्या कवी विवेक उगलमुगले यांनी जाणत्या रसिकांसाठी सुद्धा सहा काव्यसंग्रहाचे लेखन केले असून एक व्यक्ती चित्र संग्रह त्यांच्या नावावर आहे. वृत्तपत्रातील स्फुटलेखनाच्या बाबतीत त्यांनी आपला विशेष ठसा उमटवलेला आहे. राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे दोनदा अध्यक्षपद भूषवणाऱ्या या संवेदनशील कवीचा लेखन परीघ दैदिप्यमान आहे.
        साहित्य लेखन क्षेत्रासोबतच चित्रपट व दूरदर्शन मालिका या कला क्षेत्रातही आपल्या लेखन कर्तृत्वाने घवघवीत यश मिळवणारे प्रा.रामदास केदार उदगीरकर यांनी कथा, बालकथा, बालकादंबरी, कविता, गाणी, वात्रटिका आणि समीक्षाप्रांती आपली मोहर गडद केलेली दिसून येते. चार मराठी चित्रपटांसाठी पटकथा लेखन, लावणी लेखन करीत ते अनेक पुरस्कारांचे मानकरी ठरलेले आहे.
     सातत्याने नवनव्या लेखन प्रवाहाला सामोरे जातं त्यांना कवेत घेण्याचे यशस्वी धारिष्ट्य करणारे औरंगाबाद येथील प्राचार्य डॉ.रामकिशन दहिफळे यांचं संशोधन कार्य विपुल असून त्यानीं पाच पुस्तकांचे केलेले संपादन त्यांच्या वैचारिक लेखन अंगाचं सम्यक असं दर्शन घडवून जाते. परिवर्तनवादी साहित्याच्या संकल्पना व स्वरूप या मांडणीत त्यांच्या चिंतन खुणा वाचक अभ्यासकास विचार प्रवृत्त करतात. त्यांच्यातल्या साहित्य मीमांसकाने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर सादर केलेले सत्तर शोधनिबंध व त्यांना मिळालेले भरगच्च पुरस्कार या बाबी समाजाला निश्चितच भूषणावह आहेत.
      आजचा हा मूर्तिमंत देखणा सोहळा ज्या बांधिलकीतून साकार होतोय त्या बांधिलकीचे अग्रणी अर्थात वंजारी समाज इतिहास अभ्यासक, लेखक, बालसंस्कार शिबीर, अध्यात्मिक मार्गदर्शक तथा महाराष्ट्र राज्य वंजारी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष माननीय गणेशजी खाडे यांचं वैचारिक व अध्यात्मिक चिंतन, लेखन समाजहितैषी असून वर्तमानासह येणाऱ्या समाज पिढयांना दिशादर्शक असेच आहे. समाजसंत समर्थ आवजीनाथ बाबा, संतश्रेष्ठ वामनभाऊ महाराज राष्ट्रसंत भगवानबाबा यांच्या जीवनचरित्राचे सम्यक दर्शन घडविणारे तसेच वर्तमानस्थिती भान जपणारे व भविष्याला प्रकाशमान करणारे खाडे सरांचे लेखन निश्चितच संदर्भमूल्य जपणारे आहेत. त्यांच्या लेखनातून सूक्ष्मावलोकी दृष्टी व पल्लेदार दूरदृष्टी या दोहोंचे व्यामिश्र दर्शन त्यांचे लेख वाचताना होते. त्यांची समाजनिष्ठा व साहित्यनिष्ठा भवताल सजग करून जाण्यात कमालीच्या यशस्वी झालेल्या आहेत. लेखन कौशल्या इतकेच त्यांच्या अंगी असलेले संघटन कौशल्य म्हणूनच आज ही समृद्ध मांदियाळी या पावननगरीत एका छताखाली आलेली आहे.
साहित्य प्रवाहात कृतिरूप राहून साहित्य चळवळीला बळ देणारे कन्नड येथील प्रा.डॉ.शिवाजी हुसे यांचे वाङ्मयीन कर्तृत्व मराठवाडा विद्यापीठ कार्यक्षेत्रासह संपूर्ण महाराष्ट्राला परिचित झालेले आहे. डॉ.हुसे यांच्या लेखनाचा विषयबिंदू माणूस राहिलाय. त्यांचे नावावर तीन काव्यसंग्रह, दोन चरित्रात्मक ग्रंथ, सहा संपादित पुस्तकं असा दस्तऐवज असून ‘तिफण’ या वाङ्मयीन अंकाचे सातत्याने केलेले संपादन व प्रकाशन असंख्य लेखन कर्त्यांना प्रेरणास्रोत बनून राहिले आहे. ‘मातीमाता, मातीदाता, मातीविधाता’ हा हुंकार त्यांच्या कवितेतून मोठ्या कृतज्ञ भावाने येताना दिसतो. काव्य महोत्सवासारखे प्रतिवर्षी होणारे राज्यस्तरीय काव्य संमेलन हे त्यांच्यातल्या काव्य निष्ठेचे प्रमाण म्हणावे लागेल.
      खान्देशी ग्रामगंधाला आपल्या सृजनातून अक्षर करणारा कवी मनोहर ना. आंधळे. गेल्या पंचवीस वर्षाच्या साहित्यसाधनेतून अष्टाक्षरी ग्येय काव्य, गझल, रुबाई, अभंग, ओवी, मुक्तछंद या काव्यप्रकारातून मनसोक्त मुशाफिरी करणाऱ्या या कवीच्या कविता अनेक निखळ वाङ्मयीन मासिकातून प्रकाशित होत आलेल्या असून महाराष्ट्रासह कर्नाटक राज्य शालेय पाठ्यपुस्तकातून व उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या पदवी स्तरापर्यंत अभ्यासक्रमात आहेत. खान्देशाची साहित्य पताका महाराष्ट्र प्रांती लावण्यात त्यांच्या सृजनाला कमालीचे यश प्राप्त झाले आहे. ‘कवितेचा मळा। आंधळेंचा गळा’ ही बिरुदावली सार्थ करणारे मनोहर ना. आंधळे हे प्रभावी व प्रवाही वक्ते म्हणूनही ख्यातकीर्त आहेत. त्यांचे नावावर ‘डोळ्यात कालचे पाणी’, ‘लेकी तुझ्यासाठी’, ‘सौरभ’ हे काव्यसंग्रह असून समीक्षा व ललितलेखनातही वृत्तपत्राच्या पुरवण्यांमधून त्यांनी आपली लेखन चुणूक दाखवली आहे. किशोर मासिकांमधून येणाऱ्या त्यांच्या बालकविता अभ्यासक रसिकांकडून गौरविल्या गेल्या आहेत. 
     मित्रहो! साहित्य, समाज आणि संस्कृती या तीनही अंगान आपल्या समाजातील प्रतिभा संपन्न कवी कवयित्रींची चाललेली अविरत लेखन साधना पाहून समाज समृद्धीचा आनंद भरभरून मिळतोय. माझ्या वंजारी समाजाची संपूर्ण मानवता धर्माविषयीची कृतज्ञता ऋणाईतता त्यांच्या लेखनातून ठायीठायी दिसून येते. असे हरीभक्त परायण ऍड.दत्तात्रय महाराज आंधळे यांच्या संतसाहित्याच्या व्यासंगाला आणि भागवत धर्म प्रचाराला मी मनोभावे नमन करतो. कीर्तनाबरोबरच संतांच्या साहित्याचा चिकित्सक अभ्यास, संशोधन व मीमांसा करीत श्रीसंत जगमित्र, नागाचरित्र, आद्यकवी मुकुंदराज एक शोधवाट जाणिवेच्या कळा यांचे यथोचित दर्शन महाराष्ट्राला व्हावे या अनुषंगाने त्यांचे लेखन प्रयत्न स्तुत्य आहे. ज्ञानदेवांची गुरुगीता, ज्ञानेश्वरी अनुभवावी ही कथा, सार्थविवेक सिंधू या ग्रंथाचे प्रकाशन त्यांनी केलेले आहे. त्यांच्या ग्रंथ साधनेला विद्यापीठीय अभ्यासक्रमातून संदर्भ ग्रंथाचे मोल प्राप्त झालेले असून त्यांना आंतरराष्ट्रीय साहित्यरत्न पुरस्काराने गौरविण्यात आलेले आहे.
    प्राचीन ते अर्वाचीन या सर्व कालखंडाकडे व साहित्यप्रवाहाकडे समाजातले लेखनकर्ते जाणिवेचा वेध घेताना दिसून येतात. शिवचरित्रकार डॉ.अशोक बांगर हे नाव तितकंच भारदस्त आहे. पत्रकारीतेत पी.एचडी करणाऱ्या बांगर सरांनी संत, महंत, युगपुरुष व इतिहासातील शूरवीरांवर भाष्य करीत आपल्या लेखनाने संपूर्ण महाराष्ट्र ढवळून काढलाय. एकूण नऊ पुस्तके त्यांच्या नावावर असून त्यांच्या प्रबोधन कार्याचा गौरव तमाम महाराष्ट्राने वेळोवेळी पुरस्कार देऊन केलाय.
      किती लिहावं यापेक्षा कसं लिहावं याची पूर्ती जाणं असलेल्या नव्वोदोत्तर काळातले कवी डॉ.राजेंद्र दुर्योधन मुंढे यांचा निखळ वाङ्मयीन नियत कालिकांमधून झालेला लेखनप्रवास त्यांच्या लेखन मुद्रा निदर्शक आहे. या जाणत्या कवीच्या नावावर पाच पुस्तके असून संपादन, संशोधन, शोधनिबंध लेखन, अनुवाद, समीक्षा, स्फुटलेखन, वैचारिक लेखन, कविता लेखन ही लेखन समृद्धी दिसून येते.
     प्रा.डॉ.विठ्ठल खंडोजी जायभाये यांनीही समाज व संस्कृती संवर्धनासाठी लेखन आणि व्याख्याने यातून चांगलाच पाठपुरावा केलेला दिसून येतो. तर प्रा.डॉ.शंकर शिवाजी मुंडे यांनी कादंबरी, लोककथा व शोधनिबंधातून आपली सिद्धी सर्वश्रुत केलेली दिसून येते. अनंत कराड या प्रज्ञावंताने मराठी वाङ्मयात आपले संपन्न व समृद्ध अवकाश स्थापित केले असून अनेक संमेलनामधून त्यांचा होणारा सन्माननीय सहभाग त्यांच्या लेखन कर्तृत्वाचे प्रमाण म्हणावे लागेल. नव्या ताकदीचा तरुण कवी आपल्या कवितेला सातासमुद्रा पार घेऊन जातो व विश्वप्रियता मिळवतो ते शिक्षक कवी गणेश आघाव यांची ‘पोरी शाळेला निघाल्या’ या कवितेचा जगातील ३२ भाषेत झालेला अनुवाद समाजाला निश्चितच भूषणावह आहे. त्यांचे नावावर चार कवितासंग्रह असून दोन कथासंग्रह ही साहित्य संपदा आहे. याच पिढीतील आणखी एक नजरेत भरणार नाव म्हणजे संदीप रामनाथ ढाकणे हे बहुआयामी व्यक्तिमत्व ही आपली ओळख त्यांनी समाज मनात निर्माण केलेली आहे. कविता, कथा, ललित या अंगानं त्यांचं लेखन बहरतं गेलेलं असून उत्कृष्ट सूत्रसंचलन व महाराष्ट्रभर संपन्न होणारी व्याख्याने यामुळे रसिक मनावर त्यांनी चांगलेच अधिराज्य केलेले दिसते.
      बालाजी उद्धवराव मुंडे या कवीनं अभंग, वात्रटिका, हायकू, मुक्तछंद आणि गझल हे कवितेतले प्रकार लिलया हाताळून परखड पत्रकारीतेतही आपला लौकिक व वृत्तपत्रातून केलेले स्तंभ लेखन वाचक मनाची तृप्ती करणारा आहे.
      वृत्तपत्र उघडलं की वाचायला मिळणारे ‘आजचा रट्टा’ हे सदर आपल्या सृजन कौशल्याने साकारणारे शीघ्रकवी द.ल.वारे व्यवसायाने शिक्षक आणि रट्ट्यातून जपलेली निर्भीडता निश्चितच अभिनंदनीय आहे.
मनोज सूर्यकांत वराडे यांनी गझल या वाङ्मय प्रकाराच्या यशदायी लेखनाने संपूर्ण महाराष्ट्राच्या मनीअंतरी आपली स्थान निश्चती केली आहे.
      नागनाथ बडे यांच्याही लेखणीने ग्रामगंधाचा वसा घेतला असून त्यांनी कविता, प्रौढांसाठी कथा आणि बालगाणी या लेखनप्रकारातून यशस्वी लेखन प्रवास केलाय.
     डॉ.राजेंद्र घुले, अनंत मुंडे, चंद्रकांत धस, शिवा कराड, ओमकेश चाटे, युवाकवी दत्तात्रय खुळे, नारायण खेडकर, अंबादास केदार, राजकुमार मोरगे, अर्जुन डोमाडे, प्रा.बिभीषण चाटे, शिवाजी राघोजी कायंदे, अशोक गुठे सलेगावकर, संतराम कऱ्हाड, ज्ञानेश्वर जाधवर, पद्माकर दराडे, संजय तिडके, रघुनाथ घुगे, दत्तराव घुगे, रमेश आव्हाड, अनिल कापसे, प्रशांत कापसे, विकास नवाळे, कमलेश डोमाडे, सतीश दराडे, शिवाजीराव सानप, लक्षराज सानप, नागेश कांगणे, विश्वनाथ सोनुने, संजय खाडे, गोरख पालवे, गजानन दराडे, वैजनाथ गीते-पारकर, छायाताई जायभाये, वंदनाताई केंद्रे-बांगर, मारोती मुंडे, कल्पनाताई कल्याण घुगे, डॉ. मछिंद्र नागरे, युवराज वायबसे, सतीश कराड, या सर्व प्रतिभावंतांनी वंजारी समाजाचे वाङ्मयीन दालन आपापल्या परीनं समृद्ध करण्यात मोलाचा वाटा दिलेला असून त्यांच्या योगदानाचे समाजाला नित्य भूषण राहील.
    हा सर्व वंजारी साहित्य व वंजारी साहित्यिक प्रपंच मांडत असताना काही नावं सुटण्याची शक्यता मी नाकारत नाही. प्रत्येकाचं वाङ्मयीन कार्य अमोघ आहे. धरसोड झाली असल्यास मला क्षमा करावी. समाज हा आई समान असतो अशा या समाजरुपी आईसमोर शेवटी मी लहानच. असो.
जाता जाता काही महत्वाच्या नोंदी जबाबदारीने मांडाव्याशा वाटतात. एका दिवसात दहा कविता लिहिणारे कवी अजिबात होऊ नका. महिन्याकाठी पुरस्कार मिळविणारेही होऊ नका. अनुकरणाच्या फेऱ्यातून बाहेर येऊन स्वतःची ओळख निर्माण करा. लेखन सिद्धी प्राप्त झाल्याशिवाय पुस्तकप्रसिद्धी टाळा. कसदार लेखनकर्ता ह्यास पुनर्जन्माचे भाग्य लाभते हे कायम लक्षात असू द्या.
     बंधुभगिनींनो मराठी साहित्य संमेलने ही आपली सांस्कृतिक तीर्थक्षेत्रे आहेत. या तीर्थक्षेत्री येणारे लहानमोठे लेखन तपस्वी आपल्या अंतरीच्या धाव्यांना वाट मोकळी करून देतात, त्या सर्व धाव्यांचं कौतुक करणं गरजेचं आहे. नोंद घेऊन अशा व्यासपीठावरून षट्कर्णी करणं हेही तितकंच महत्वाचं आणि म्हणूनच समाजाचे पहिले संमेलन असल्याकारणाने हा लेखाजोखा मांडणं मला गरजेचं वाटलं. तसेच सदर संमेलनाचे आयोजन समाज मने व प्रतिभा संवादी राहून नवे आणि कसदार जन्माला यावे या भूमिकेने आणि भावनेने केलेले आहे. इथे उपस्थित साहित्यिकांमध्ये आभाळ कवेत घेण्याचे सामर्थ्य निश्चितपणे आहे. त्यांनी नवोदितांसाठी दिशादर्शकाची भूमिका घेऊन यथोचित मार्गदर्शन करावे व समृद्ध सर्जक पिढीचे शिलेदार व्हावे. नवोदितांनी सिद्धीचा साठा होईपर्यंत लिहितं राहावे, खूप वाचावे, पाहावे, अनुभवावे आणि नंतरच लिहावे. हा मार्ग चांगल्या लेखनाचा मार्ग असून भाराभार पुस्तके काढणारे व सांख्यिक दृष्ट्या डोळे दिपवणाऱ्या लेखनाच्या आहारी जाऊ नये असे मला प्रामाणिकपणे व नम्रपणे सांगावेसे वाटते. बोलीभाषांचे व मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन या जबाबदारीचे भानही आम्ही लेखनकर्त्यांनी ठेऊन त्या अनुषंगाने प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे. साहित्यातला मानवतावाद हा आपल्या कृतीतून ठायीठायी दिसेल यासाठी कटिबद्ध होऊ या. आपण सारे लहानमोठे संमेलनाला ऐतिहासिकतेचे बळ देऊ या. जय भगवान.

प्रा. वा. ना. आंधळे
संमेलनाध्यक्ष
पहिले राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन,नाशिक
वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य साहित्य आघाडी
स्थळ: रावसाहेब थोरात सभागृह, गंगापूर रोड, नाशिक
दि. २५ डिसेंबर २०२२ (भ्र. ७७५८०५६८७७)

About Post Author

error: Content is protected !!