May 17, 2024

विज्ञानवादी दृष्टीचे द्रष्टे संत भगवान बाबा सानप – प्रा.वा. ना.आंधळे

लोकनेता न्युज नेटवर्क

जळगाव :- बहुजन समाजात शिक्षणाची ज्ञानगंगा घराघरात पोहचविणारे आधुनिक भगीरथ तथा राष्ट्रसंत वै.भगवान बाबा यांनी कीर्तनाच्या माध्यमातून केलेले प्रबोधन समाजोद्धाराकामी आले.त्यांच्या वैज्ञानिक दृष्टीने तत्कालीन समाजाला अंधश्रद्धेतून बाहेर पडता आले.अशा जनसामान्यांच्या हिताची तळमळ जपणाऱ्या बाबांच्या विचार वैभवाची पूजा करण्याचे आवाहन सुप्रसिद्ध कवी तथा व्याख्याते प्रा.वा. ना.आंधळे यांनी केले.काल दि.७ जानेवारी २०२३ रोजी एरंडोल येथे समस्त वंजारी समाजाने आयोजित केलेल्या राष्ट्रसंत वै. भगवान बाबा सानप यांच्या पुण्यतिथी समारंभ प्रसंगी ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी एरंडोल पारोळा तालुक्याचे आमदार चिमणराव पाटील होते. व्यासपीठावर भाऊसाहेब किशोर काळकर शालीकभाऊ गायकवाड, नगरसेवक विजय पंढरीनाथ महाजन, रवींद्र महाजन राजेंद्र चौधरी रमेश महाजन,राजेंद्र पाटील तसेच एरंडोल वंजारी समाज अध्यक्ष विठ्ठल आंधळे या मान्यवरांची उपस्थिती होती.
      प्रा.आंधळे आपल्या भाषणात पुढे म्हणाले,भगवान बाबा यांनी केलेले प्रबोधन वंजारी समाजपुरतेच होते असे नाही त्यांच्या विचारात आणि वाणीत जगाचे कल्याण साठले होते.संतांना जात नसते.म्हणूनच त्यांचा वर्तमानी होणारा राष्ट्रसंत हा गौरवोल्लेख सार्थ वाटतो.याप्रसंगी राजेंद्र पाटील यांनीही भगवान बाबांचा आयुष्यपट श्रोत्यांपुढे मांडला.आपल्या अध्यक्षीय भाषणात आमदार चिमणराव पाटील यांनी संतांच्या कार्या चा गौरव करीत शिक्षण व ज्ञान समाजाला समृद्ध करीत असते.व ही दृष्टी साधू संत व समाज सुधारकांनी आजवर महाराष्ट्राला भरभरून दिल्याचे आपल्या मनोगतातून नोंदवले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक विठ्ठल आंधळे यांनी केले.सूत्र संचलन अक्षय गडकर यांनी केले.तर आभार प्रदर्शन बबनराव गडकर यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समस्त वंजारी समाज एरंडोलच्या पंच कमिटी च्या पदाधिकाऱ्यांसह सदस्यांनी परिश्रम घेतले.दिंडी , महाप्रसाद व कीर्तनाचे आयोजनही यानिमित्ताने केले होते.

About Post Author

error: Content is protected !!