May 9, 2024

भाग १ – जननिष्ठा आणि छत्रपती शिवाजी महाराज

लोकनेता न्युज नेटवर्क

       काळ सर्वसाक्षी आहे! सर्वच गोष्टींवर काळ हे सर्वोत्तम औषध! त्यातच अनेक महापुरुष येतात आणि आपल्या अलौकिक कार्यकर्तृत्वाने काळावर आपली चिरकाल मोहर उमटवून जातात! ही माणसं कालजयी होतात! त्यांच्या वर्तमानापेक्षा सांप्रतकाळी ही कालजयी माणसं एक वेगळंच, भारावलेलं वातावरण निर्माण करतात! याच अनुषंगाने आजपासून बरोबर दहाव्या दिवशी म्हणजे १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या जल्लोषात साजरी केली जाईल! हा दैदिप्यमान सोहळा मोठ्या उत्साह-अभिमानाने साजरा होईल! “छत्रपती शिवाजी महाराज कि जय!” असा एकच जयघोष होईल! सगळा आसमंत दुमदुमून-उजळून जाईल!  
            हे सगळं एकीकडे सुरु असतांना दुसरीकडे “खरंच आपल्याला शिवराय समजलेत काय?” हा प्रश्न सुद्धा सतावतो आहे. महापुरुष केवळ मिरवायची गोष्ट नसून त्यांचे कार्य आणि विचार आपल्या जीवनात मूरवायची गरज असते. सतराव्या शतकांत महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांची राजेशाही व्यवस्था असतांना देखील महाराज अपरिमित जननिष्ठा कसे मिळवू शकले? राजा आणि त्याच्या नौकरावरून सर्वसमान्यांचा विश्वास उडालेला असतांना लोकांनी शिवाजी महाराजांना राजा म्हणून का स्वाकारले असेल? जगाच्या इतिहासात एवढ्या कमी काळात आणि कमी वयात जनसामान्यांच्या मनामनात शिवाजी महाराज आपले अस्तित्व कसे निर्माण करू शकले? याचे उत्तर म्हणजे महाराजांनी सामान्य माणसाला हे राज्य रयतेचे असून राज्यातील शेवटचा माणूस सुरक्षित ठेवण्याचा विश्वास निर्माण केला. या संदर्भाने कॉ.गोविंद पानसरे आपल्या ‘शिवाजी कोण होता?’ ग्रंथात संदर्भ देतात, “शिवाजीचे राज्य आले आणि एकदम बदल झाला. राजा आणि रयत यांचा संबंध आला. राजा रयतेला दिसू लागला, भेटू लागला, त्यांची विचारपूस करू लागला, त्यांचा छळ होऊ नये म्हणून दक्ष राहू लागला. त्यांना मदत हवी म्हणून राज्य चालवू लागला. शिवाजी जहागीरदार-देशमुख-वतनदार-पाटील-कुलकर्णी यांच्या बेलगाम व्यवहाराला लगाम घालू लागला. वतनदार हे मालक नाहीत तर राज्याचे नौकर आहेत, असे सांगू लागला. रयतेला दाद मागण्याचे धाडस आले. मुजोर वतनदारांना जरब बसून त्यांना कठोर शिक्षा होऊ लागली.” याचा परिपाक म्हणजे पन्हाळगडाला सिद्धी जोहर-फाजलखान यांच्या वेढ्यात रयतेच्या राजाचा जीव धोक्यात असतांना एक गरीब न्हावी शिवा काशीदने नकली शिवाजी महाराज होऊन हसत हसत शत्रूच्या तलवारीने खतम झाला. आपल्या जीवापेक्षा आपला राजा जगला पाहिजे! रयतेचे राज्य उभे राहिले पाहिजे! या तळमळीने रयतेतील सामान्यांनी आपले प्राणार्पण केले!
            आज आपण लोकशाहीचा अमृतमहोत्सव साजरा होतांना सामन्यांचा इथल्या राज्यकर्त्यांवर छत्रपती शिवाजी महाराजांएवढा विश्वास आहे का? आज एखाद्या आमदार, खासदार अथवा मंत्र्यासाठी एखादा नागरिकतरी आपला जीव देईल का? या प्रश्नांची उत्तरे ‘नाही’ अशीच येतील. लोकशाही आणि राजेशाहीत हा फरक का? याचे कारण म्हणजे सांप्रतकाळी इथल्या राज्यकर्त्यांनी रयतेचे सुख कधी पहिलेच नाही. मुठभर राजकर्त्यांनी करोडोंची माया, वर्षानुवर्षे सत्तास्थाने केंद्रित करून देश आणि राज्याला दिवसाढवळ्या राजरोसपणे लुटले असून अजूनही बिनदिक्कतपणे लुटत आहेत. आज लाखो उच्चशिक्षित तरुणांच्या हाताला काम नाही. महागाई गगनाला भिडली आहे. शेतमालाला भाव नसल्यामुळे शेतकरी गळफास जवळ करतोय. एकीकडे असे भयावह चित्र असतांना दुसरीकडे आपण जात-धर्म-रंगाचा अभिनिवेश दाखवून जर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करत असू, तर ती अंतर्मनाला स्वीकारार्ह असेल काय? परंतु अजून सगळे संपले नाही. अजूनही सर्वांनी वेळीच सावध होऊन जनसामान्यांचे मुलभूत प्रश्न समजून घेऊन कार्य करायची वेळ आली आहे. देश यशोशिखरावर नेण्यासाठी माणसे कुठून आणणार? त्यासाठी इथल्या राज्यकर्त्यांनी, श्रीमंतांनी, नौकरदारांनी जनसामान्यांचा सर्वोतोपरी विचार करून देश पुढे घेऊन जावा लागेल! शिवाजी महाराज आदर्श मानून सार्वांना तसे वागावे लागेल. जननिष्ठा आणि राजनिष्ठा हातात हात घालून गुण्यागोविंदाने नांदायला हव्यात! असे होणे म्हणजे खऱ्या अर्थाने विद्यमान लोकशाहीमध्ये शिवशाही अवतरेल आणि तेंव्हाच खरी शिवजयंती साजरी होईल! जय हिंद! जय शिवराय!

प्रा.डॉ.विठ्ठल खंडूजी जायभाये
कै.रमेश वरपूडकर महाविद्यालय, सोनपेठ
जि. परभणी (महाराष्ट्र)
मो. 9158064068


(टीप: लेखक हे व्याख्याता, शिवचरित्रकार, कवी, किर्तनकार, समीक्षक, योग-प्राणायाम प्रशिक्षक आहेत.)

About Post Author

error: Content is protected !!