May 20, 2024

किनगावराजात महिलांचा पाण्यासाठी टाहो, रिकाम्या घागर घेऊन महिला ग्रामपंचायत कार्यालयासमोर

लोकनेता न्युज नेटवर्क

किनगाव राजा :- गत दीड महिन्यांपासून नळाला पाणी नसल्यामुळे हतबल झालेल्या किनगावराजातील महिलांनी रिकामी घागर घेऊन ग्रामपंचायत कार्यालयासमोर निदर्शने करून टाहो फोडला.

       ‘काहीही करा पण आम्हाला पाणी उपलब्ध करून द्या’ अशी मागणी करीत संपूर्ण गावातून रिकामे हंडे डोक्यावर घेऊन डफडे वाजवत येथील १० ते १५ महिलांनी किनगावराजा ग्रामपंचायतच्या गेटजवळ सकाळी ९.३० च्या सुमारास ठिय्या मांडला होता.जोपर्यंत सरपंच,ग्रामविकास अधिकारी आमचे म्हणणे ऐकूण घेत नाही तो पर्यंत आम्ही गेटसमोरून हलणार नाही व ग्रामपंचायत कार्यालयाचे कुलूप उघडू देणार नाही असा पावित्रा आंदोलनात आलेल्या बहुसंख्य महिलांनी घेतला होता.यावेळी ग्रामपंचायत कार्यालय उघडण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांनाही महिलांनी परत पाठवले.सकाळी सुमारे ११.३० वाजेपर्यंत सदर महिला ग्रामपंचायतच्या कार्यालयासमोर बसून होत्या परंतु ग्रामपंचायतचे कुणीही पदाधिकारी त्यांची व्यथा ऐकून घेण्याकरिता फिरकले नसल्याने महिलांचा संताप अनावर झाला होता.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे किनगावराजा पं.स.सर्कल प्रमुख सचिन मांटे यांनी जिल्हाधिकारी डॉ.तुंभोड यांना फोन करून महिलांची समस्या सांगितली असता तुंभोड यांनी याबाबत सविस्तर अर्ज करण्याचे सांगितले.

चौकटीत :- गत दीड महिन्यापासून सुमारे ७ हजार लोकसंख्या असणाऱ्या किनगावराजाच्या ग्रामस्थांना भयंकर अशा पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून ग्रामस्थांच्या समस्येसंदर्भात विरोधी सदस्यही निस्तेज असल्याचे यावेळी दिसून येत आहे.

प्रतिक्रिया ,सरपंच किनगावराजा :- ग्रामपंचायतीने शासनदरबारी ४० हजार रुपये पाणी कर भरून, प्रशासनास तब्बल तीन वेळेस वारंवार निवेदने देऊन,पाणी पुरवठा उपअभियंत्याशी वेळोवेळी संपर्कही साधतांना आंदोलनाचा इशाराही दिला आहे.परंतु तरीही समस्या दूर न झाल्याने गावातील महिलांचा उद्रेक होऊन आंदोलन झाले.

_____________

🪀सर्व महत्वाच्या अपडेट मिळवा Whatsapp वर नंबर सेव्ह करा व लोकनेता न्युज ला जॉईन व्हा 👉 https://join.elokneta.in/

About Post Author

error: Content is protected !!