May 9, 2024

आंबा लिंबोनीच्या खाली कविता रंगोनिया गेली…..!

लोकनेता न्युज नेटवर्क

नागझरी :- बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यात असलेल्या या एका छोट्याशा खेड्याच्या शिवारात पण हिवरा आश्रम पासून हाकेच्या अंतरावर चिखली – मेहकर राज्य महामार्गावर चार दोन शेतकऱ्यांनी शेतीकामासाठी वसवलेल्या तेवढ्याच कुडाच्या कोठ्यांची एक नगण्य वसती अन् रात्रंदिवस ढेकळामातीत कष्टाची कामे करताना हातापायांना भेगा पडलेल्या खंगलेल्या देहांची तेवढीच कुटुंबे असलेल्या या काळ्या मायच्या लेकरांपैकीच एका जेमतेम शिकलेल्या भूमीपुत्राने आपल्या भेगाळलेल्या बोटांत पुन्हा एकदा




लेखणी पकडून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी कालखंडात सुध्दा वाट्याला आलेली लक्तरे धुळखात पडलेल्या फाटक्या वह्यांच्या पानावर जेव्हा आकस्मिक उतरविण्यास सुरूवात केली तेव्हा त्याच्या बोलक्या पण आजवर कोंडमारा झालेल्या वेदनांनी फोडलेला टाहो, त्याच्या आग ओकणाऱ्या कवितांच्या रूपाने केव्हा बाहेर पडला हे त्यालाही कळले नाही….. मात्र त्याच्या अंगार भरल्या शब्दांनी त्याला स्वत:ला माहीत व्हायच्या आत साऱ्या महाराष्ट्राला त्याची ओळख करून दिली…..





अशा त्या कवी मित्राने अर्थात शतृघ्न कुसुंबे यांनी आपल्या आईवडिलांच्या स्मृती प्रित्यर्थ आठवणीचा हिंदोळा या मथळ्याखाली त्यांच्या त्या झोपडीवजा घराच्या प्रांगणालाच लागून असलेल्या शेतीच्या धुऱ्यावरील आंबा-लिंबोणीच्या झाडांच्या गर्द सावलीत ग्रीष्म कालीन वनराई काव्य संमेलन आयोजित करून एक आगळावेगळा आणि आकर्षक सोहळा दि.२३-०४-२०२३ रोजी घडवून आणला व असा कार्यक्रम येथून पुढे दरवर्षी घेण्याचा मानसही व्यक्त केला. कु.पल्लवी नामक छोट्या मुलीच्या हस्ते कुसुंबे यांच्या आईवडिलांच्या प्रतिमेला पुष्पार्पण करून संमेलनाचे उदघाटन करण्यात आले. तसेच या प्रसंगी वाडेकर फिल्म सोसायटी, बुलढाणा चा पुरस्कार मिळाल्याबद्दल शतृघ्न कुसुंबे तथा त्यांची पत्नी सौ. रंजनाबाई कुसुंबे यांचा सपत्नीक सत्कार ज्येष्ठ कवी कथाकार बबन महामुने तथा त्यांची पत्नी सौ.मंगला महामुने यांच्या हस्ते तर रफीक कुरेशी सर मेहकर यांनाही वाडेकर फिल्म सोसायटी बुलढाणा चा




पुरस्कार मिळाल्याबद्दल, तसेच पुस्तक तथा गझल संग्रहाच्या प्रकाशनासाठी अनुक्रमे संदीप गवई सर मेहकर व ज्येष्ठ कवी पत्रकार शिवप्रसाद थट्टे हिवरा आश्रम यांचा, त्याच बरोबर पुणे येथील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे हा पुरस्कार एका छोट्याशा खेड्यातील पोलीस पाटील असलेल्या ज्येष्ठ कवयित्री विद्याताई सरपाते यांच्या ‘सोनं मातीतलं वाचताना ‘ या काव्यसंग्रहास मिळाल्याबद्दल त्यांचा तथा ‘ राष्ट्र रत्न ‘ पुरस्कार पुणे, मिळाल्या प्रित्यर्थ प्रा. पंढरीनाथ शेळके हिवरा आश्रम यांचा सपत्नीक आणि शाहीर मनोहर पवार चिखली यांना ‘ जिल्हा कला भूषण ‘ पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा, तसेच अमेरिकन विद्यापीठाकडून सामाजिक कार्यास्तव मानद डॉक्टरेट मिळाल्याबद्दल ॲड. विजयकुमार कस्तुरे यांच्यासह ईतर मान्यवरांचाही सत्कार शाल व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला.




 

तसेच या कवी संमेलनात बबन महामुने, शेळके गुरूजी, विद्याताई सरपाते, प्रा.आर. डी. पवार, शिवप्रसाद थुट्टे, प्रा.अभिमन्यु मगर, डॉ.ज्ञानेश्वर गाडे, शरद वानखेडे, गणेश राऊत, संदीप गवई, रफीक कुरेशी, मनोहर पवार, ॲड. कस्तुरे, व ईतर बऱ्याच कवी मित्रांनी आपल्या रचना सादर करून तर अतिशय सुरेख असे सुत्रसंचालन करून प्रा. सुभाष मगर यांनी भर दुपारच्या वातावरणात वेगळाच रंग भरला. याप्रसंगी मा. भाकडे मॅडम यांनी या कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. तसेच सर्व मान्यवर कविंचाही गुलाब पुष्प तथा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी शेळके ताई, मंगला महामुने तथा रंजना कुसुंबे, नंदाबाई कुसुंबे,यमुनाबाई शिकारे यांच्या सह परिसरातील बरीच महिला पुरुष मंडळी उपस्थित होती.




_____________

🪀सर्व महत्वाच्या अपडेट मिळवा Whatsapp वर नंबर सेव्ह करा व लोकनेता न्युज ला जॉईन व्हा 👉 https://join.elokneta.in/

About Post Author

error: Content is protected !!