May 19, 2024

पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या हत्येचा खामगाव प्रेस क्लब कडून निषेध

हल्लेखोरावर कठोर कारवाई करा : उपविभागीय अधिकारी यांना निवेदन

लोकनेता न्युज नेटवर्क

खामगाव :- रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या हत्येचा खामगाव प्रेस क्लब खामगावकडून जाहीर निषेध करण्यात आला. यासंदर्भात उपविभागीय अधिकारी यांना आज दि.१० फेब्रुवारी रोजी निवेदन देवून हल्लेखोरावर कठोर कारवाई करावी तसेच पत्रकारांची होणारी मुस्कटदाबी थांबवावी अशी मागणी करण्यात आली.
निवेदनामध्ये नमुद आहे की, सभ्य आणि सुसंस्कृत महाराष्ट्रात भूमिका घेऊन पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांचा आवाज कायमचा बंद केला जातो, पत्रकारांवर हल्ले करून किंवा त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न होताना दिसतोय, पत्रकार संरक्षण कायदा आहे मात्र या कलमाखाली गुन्हे दाखल करायलाही टाळाटाळ केली जाते. त्यामुळे महाराष्ट्रात निर्धोकपणे काम करणे पत्रकारांना कठीण झाले आहे. या घटना सातत्यानं वाढत असल्याने पत्रकारांमध्ये भितीची भावना निर्माण होत आहे.
महानगर टाईम्सचे राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारीसे हे सोमवारी कोदवली येथील पेट्रोल पंपातून आपल्या दुचाकीमध्ये पेट्रोल भरून बाहेर पडत असताना भरधाव वेगाने येणाऱ्या महिंद्रा थार गाडीने त्यांच्या गाडीला धडक दिली. अपघात इतका भीषण होता की, शशिकांत वारीसे गंभीर जखमी होवून त्यांचा मृत्यू झाला. मात्र हा अपघात नसून घातपात आहे हे उघडच आहे. शशिकांतने ज्याच्या विरोधात बातमी प्रसिध्द केली ते कारचालक पंढरीनाथ आंबेरकर होते. सकाळी पंढरीनाथ आंबेरकर याच्या विरोधात बातमी लागते आणि त्याच व्यक्तीची कार वारीसे यांच्या गाडीला जोरदार धडक देते, त्यात वारिशे यांचा दुर्दैवी मृत्यू होतो हा केवळ योगायोग नसून कट रचून केलेला हा खूनच आहे. या घटनेचा आम्ही सर्व पत्रकार तीव्र शब्दात निषेध करीत आहोत. तसेच आरोपीवर कठोर कारवाई करून, या खटल्याची सुनावणी फास्टट्रॅक (जलदगती न्यायालयामार्फत) कोर्टामार्फत व्हावी आणि राज्यात पत्रकार संरक्षण कायद्याची कठोर अंमलबजावणी व्हावी अशी आमची मागणी आहे. पत्रकारांचा विविध पध्दतीने आवाज बंद करण्याचा होत असलेला प्रयत्न पुरोगामी महाराष्ट्राला शोभा देणारा नाही.. वारंवार पत्रकारांवर होणारे हल्ले, त्यांच्यावर दाखल केले जाणारे खोटे गुन्हे थांबले नाहीत तर राज्यातील पत्रकारांना उग्र आंदोलन करावे लागेल असा इशारा आम्ही या निवेदनाच्या माध्यमातून देत आहोत. राज्यात गेल्या दहा दिवसात पत्रकारांचा आवाज बंद करण्याच्या किमान आठ घटना घडल्या आहेत. हत्या झालेले पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा तसेच पत्रकारांना मुक्तपणे आपले काम करण्यासारखे वातावरण तयार करण्याची सरकारची जबाबदारी आहे. त्यादृष्टीनं भविष्यात प्रयत्न व्हावेत अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन देताना खामगाव प्रेस क्लब खामागवचे अध्यक्ष किशोरआप्पा भोसले, सचिव अनिल खोडके, सतीषआप्पा दुडे, फारूख सर, धनंजय वाजपे, योगेश हजारे, शरद देशमुख, नितेश मानकर, अनुप गवळी, राहुल खंडारे, किशोर होगे, नाना हिवराळे, संभाजीराव टाले, मोहन हिवाळे, मनोज नगरनाईक, शेख सलीम, महेश देशमुख, कुणाल देशपांडे, संतोष धुरंधर, विनोद भोकरे, मुबारक खान, आनंद गायगोळ, गणेश पानझाडे, महेंद्र बनसोड, सुमित पवार, आकाश पाटील, सचिन बहुरूपी, विनायक देशमुख, हेमंत जाधव, मोनु शर्मा, सिध्दांत उंबरकार यांच्यासह खामगाव प्रेस क्लबचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

____________________________________

🪀सर्व महत्वाच्या अपडेट मिळवा Whatsapp वर नंबर सेव्ह करा व लोकनेता न्युज ला जॉईन व्हा 👉 https://join.elokneta.in/

About Post Author

error: Content is protected !!