May 9, 2024

भाग ३ – शेतकरी आणि छत्रपती शिवाजी महाराज

लोकनेता न्युज नेटवर्क

एखादा महापुरुष निवर्तल्या नंतरसुद्धा त्याची महती कायम का राहते? ती महती दिवसेंदिवस का वाढतेय? छत्रपती शिवाजी महाराज जाऊन चारशे वर्षे झाली तरीही महाराज जनसामान्यांच्या हृदयावर नित्य विराजमान आहेत! राजेशाहीतील एक राजा लोकशाहीच्या पंचाहत्तरीत आपल्या दैदिप्यमान कार्याने राज्यकर्त्यांचे डोळे दिपवून टाकतोय! असे का? याची उत्तरे महाराजांच्या लोकोपयोगी कार्यात मिळतील. पुणे प्रांतावरून पातशाह्यांनी गाढवाचा नांगर फिरवला होता. राज्याचे सैन्य शेतकऱ्याच्या उभ्या पिकांतून जायचे. पिकाचे अतोनात नुकसान व्हायचे. दुसरीकडे कुलकर्णी-पाटील-जहागीरदार-वतनदार-देशपांडे शेतमालाच्या तीनपट कर वसूल करत. निसर्गाच्या अनियमिततेने मेटाकुटीला आलेला कास्तकार जीवघेण्या करामुळे भयभीत झाला होता. शिवाजी महाराजांनी हे सगळं भीषण वास्तव जवळून पाहिलं, अनुभवलं होतं.
            शिवकाळात शेतकऱ्यांची विशेष काळजी घेऊन शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळू लागला. “उधवस्त झालेली गावे शिवाजीने कौलनामे घेऊन पुन्हा वसवली. नव्याने जमीन कसायला येणाऱ्यांना बी-बियाणे देऊन व औतफाट्यास मदत करून शेती कसायला प्रोत्साहन दिले. नवीन लागवडीस आणलेल्या जमिनींना सुरुवातीची ४-५ वर्षे महसूल सुद्धा कमी ठेवला.” अशी सभासद बखर सांगते. मन मानेल तसा कर वसूल करण्याचा शिरस्ता मोडून काढला. जमिनी मोजल्या. महसूल निश्चित केला. दुष्काळात महसूल माफ करून शेतकऱ्याला मदत केली. “उत्पन्नाचा आजमास पाहून रयतेवर कर बसवावा. जुलूम असा कोणावर करू नये. अशी अधिकाऱ्यांस सक्त ताकीद दिली. वतनदार व जमीनदारांची अव्यवस्था महाराजांनी पार मोडून काढली. रयतेकडून वसुली कामासाठी अधिकारी नेमून दिले.” जमीनदार-मिरासदार यांच्या कचाट्यातून रयत साफ सुटली. रयत सुखी झाली. “रयतेस गुलाम करणाऱ्या ह्या देशमुख-देशपांडे वगैरे ग्रामाधिकाऱ्यांचे वाडे, हुडे, कोट पाडून महाराजांनी जमीनदोस्त केले व त्यांना इत:पर असले धंदे करू नयेत, इतर रयतेसारखी साधी घरे बांधून राहावे असा हुकुम सोडला.” यामुळे दिनदुबळ्या, गोरगरीब जनतेला शिवाजी महाराज आपला तारणहार वाटू लागले. त्यांच्याप्रती जनमानसांत विश्वास निर्माण झाला. सर्वसामान्य रयत महाराजांच्या पाठीमागे तटबंदीसारखी उभी ठाकली. तरुणांची फळी निर्माण झाली. सैन्य एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जातांना शिवाजी महाराजांनी, “कोणत्याही सैन्याच्या तुकडीने शेतकऱ्याच्या उभ्या पिकांतून जाता कामा नये. पिकांची नासाडी होता कामा नये” असे सक्त आदेश दिले. मुलाबाळांची, स्त्रियांच्या इभ्रतीची आणि आता पिकांची काळजी घेणारा राजा पाहून रयत मनोमन सुखावली. “हा राजा, हे सैन्य आणि हे राज्य आपले आहे” अशी लोकभावना निर्माण झाली.
            आज घडीला लोकशाही राज्य लोकांना आपले वाटते काय? राजकारणी-कार्यालयीन लोकांवर विश्वास आहे काय? शेतमालाच्या भावाची काळजी घेतली जाते काय? उद्योगधंद्याना रात्रंदिवस वीजपुरवठा आणि शेतकऱ्याला केवळ ६ तास, तोही रात्री १२ ते ६. एकीकडे शेतकरी वीजबिल भरत नाही म्हणून कांगावा करणारे महावितरण धनदांडग्या, राजकारणी, कारखानदारांकडून वीजबिल वसुली करते का? खासदार-आमदार-मंत्र्यांची करोडोंची वीजबिले थकीत असतांना यांना बिचारा बळीराजाच दिसतो का? येनकेनप्रकारे मोडतोड करून कुठल्याही परिस्थितीत सत्ता मिळवून देश लुटून घर कसे भरता येईल? यासाठीच सगळा अट्टहास सुरु आहे. भावनिक आव्हान करून जनतेच्या मुलभूत प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष कसे होईल? यासाठी सगळा खटाटोप चालू आहे. “अंधेर नगरी, चौपट राजा” अवस्था झाली आहे. “एकमेकांना शिव्या देऊ, आपण मिळून वाटून खाऊ” हा राजरोस धंदा सुरु आहे! यामुळे जनतेला राजकारणी-अधिकारी आपले वाटत नाहीत.  
            तेंव्हा, माझी सर्वांनाच कळकळीची विनंती आहे की; आपले आदर्श छत्रपती शिवराय मानून त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून हे राज्य लोकांचे असून त्यांच्या हितासाठी सर्वांनी कार्य केल्यास नक्कीच सामान्य शेतकरी आणि जनता सुखी होईल. त्याचबरोबर लोकांनी आपले मत विकू नये. जात-धर्म पाहून मतदान न करता लोकांची कामे करणारी माणसे निवडून द्यावीत. असे झाल्यास खऱ्या अर्थाने शिवजयंती साजरी होईल! शेतकरी मालाला भाव मिळून सर्वत्र आनंदी वातावरण राहील! बस्स, हीच लिहिण्यामागची तळमळ! जय हिंद! जय शिवराय!

प्रा.डॉ.विठ्ठल खंडूजी जायभाये
कै.रमेश वरपूडकर महाविद्यालय, सोनपेठ
जि. परभणी (महाराष्ट्र)
मो. 9158064068

(टीप: लेखक हे व्याख्याता, शिवचरित्रकार, कवी, किर्तनकार, समीक्षक, योग-प्राणायाम प्रशिक्षक आहेत.) 

___________________________

🪀सर्व महत्वाच्या अपडेट मिळवा Whatsapp वर नंबर सेव्ह करा व लोकनेता न्युज ला जॉईन व्हा 👉 https://join.elokneta.in/

About Post Author

error: Content is protected !!