May 9, 2024

भाग ४ – धर्म आणि छत्रपती शिवाजी महाराज

लोकनेता न्युज नेटवर्क

     कोणताही माणूस त्या त्या काळाचे अपत्य असतो. तत्कालीन कौटुंबिक, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि ऐतिहासिक घडामोडींचा परिणाम त्या त्या व्यक्तिमत्वावर पडत असतो. त्यातूनच त्या व्यक्तीची जडणघडण, विचारसरणी, चरित्र घडत असते. याला छत्रपती शिवाजी महाराज तरी कसे अपवाद ठरतील? शिवकाल, त्यांच्या जन्मापुर्वीचा, जन्मावेळचा आणि नंतरच्या १०-१५ वर्षांचा कालखंड महाराजांच्या जीवनावर दूरगामी प्रभाव पडून त्यांचे चरित्र आपल्यासमोर आहे. आज लोकशाही राज्यांत महाराजांना आपण कोणत्या चष्म्यातून पाहतो? आज महाराजांना धर्माच्या चष्म्यातून पाहतांना ते मुस्लीम धर्मद्वेष्टे आणि हिंदू धर्म रक्षक वाटणे आणि तत्कालीन परिस्थिती असा साधक-बाधक विचार करावा लागेल. वर्तमानात कोणत्याही महापुरुषाला पटकन एखादी बिरुदावली देऊन मर्यादित करणे कितपत उचित राहील (?) याचा सुज्ञ-तज्ञ लोकांनी खोलवर विचार करणे सांप्रतकाळी गरजेचे आहे.  
            शिवाजी महाराजांचे मामा-आजोबा हे यवनांनी खतम केले. भोसले आणि जाधव वैरसुद्धा यवनांमुळेच आले होते. शिवबांच्यावेळी गरोदर आईसाहेबांना जीव धोक्यात घालून खडतर प्रवास करावा लागला. गरोदरपणी यवनांची कैद सोसावी लागली होती. एवढ्या व्यथा-वेदना सोसाव्या लागल्या असतील तर जिजाऊंना यवनांबद्दल प्रेम कसे राहील? मनात वेदनांची प्रचंड खदखद होती. याचा परिपाक म्हणजे जिजाऊंनी शिवबांना याचा बदला घेण्यासाठी आणि रयतेचे राज्य स्थापून लेकी-बाळींची इज्जत रक्षिण्याचे कार्य करण्यास प्रवृत्त केले. हे करतांना शिवाजी महाराजांचे मुख्य शत्रू कोण होते? ते म्हणजे आदिलशाही, मुघलशाही आणि कुतुबशाही. या मुसलमान साताधीशांसोबत संघर्ष म्हणजे अनायासे मुस्लिमांसोबत संघर्ष आलाच. याचा अर्थ सर्वच मुसलमानांसोबत शिवरायांचे वैर होते असा होत नाही.
            यासंबंधाने कॉ.पानसरे लिहितात, “शिवाजी हिंदू होता. शिवाय तो महाराष्ट्रांत जन्माला आला व त्याची कर्मभूमी महाराष्ट्रच होती. यामुळे हिंदूंना शिवाजीसंबंधी अभिमान वाटतो. साहजिक आहे. त्यात गैर असे काही नाही.” स्वतःच्या धर्माचे, प्रदेशाचे मोठेपण तद्वतच “स्वतःच्या धर्मातील नामवंत, कीर्तिवंत, गुणी व थोर इतिहास-पुरुषांच्या प्रकाशात बघणे व मांडणे हा मानवी स्वभाव आहे.” हे साहजिकच आहे, हे झालेही पाहिजे यात कुठलेही दुमत असायला नको! परंतु वर्तमानात जातीय, धार्मिक, भडक आणि कट्टर अभिनिवेश तरुण युवकांच्या मनामध्ये पेरून लोकशाहीच्या पंचाहत्तरीत धार्मिक असहिष्णुता प्रसारित करणे नक्कीच कालसुसंगत नाही. तसा विचार-प्रसार-प्रचार करणे म्हणजे भारतीय राज्यघटनेची पायमल्ली करणे होय. एकीकडे लोकनीष्ठा, स्त्री अब्रू, शेतकरी अनुषंगाने छत्रपती आपण शिताफीने बाजूला करतो आणि धर्माच्या बाबतीत जवळ करतो. हे बेगडी, दुटप्पी वागणे आज निश्चितच लोकशाहीला तारक नाही. शिवाजी महाराज ईश्वर अवतार ठरवणे, भवानी मातेने तलवार दिली म्हणणे म्हणजे महाराजांच्या अंगी असलेले शौर्य-धैर्य-पराक्रम-स्वराज्य निष्ठा नाकारणे होय.
            वर्तमानात या संबंधाने लोकप्रबोधन होणे अगत्याचे आहे. कीर्तनकार, व्याख्याते मंडळींनी मोठ्या आवेशात, टाळ्या मिळण्यासाठी आणि भरभक्कम बिदागीसाठी महाराजांच्या चरित्र-इतिहासाची तोडमोड करू नये. बोलण्यापूर्वी शिवचरित्र, बखरी, महाराजांची पत्रे वाचावीत. केवळ लोकरंजनासाठी महाराजांचे स्वैर चरित्र रंगवू नये. शिवाजी महाराजांना हिंदू-मुसलमान नाही तर रयतेचे राज्य महत्वपूर्ण होते. अनेक हिंदू सरदार यवनांच्या पदरी वतनदार होते आणि त्याउलट अनेक मुसलमान सरदार शिवाजी महाराजांच्या पदरी महत्वपूर्ण हुद्द्यांवर होते. हिंदू मिर्झाराजे जयसिंग हे शहेनशहाच्या पदरी तर दर्यासारंग दौलतखान हा शिवाजी महाराजांचा आरमार प्रमुख होता. मुसलमान सिद्दी हिलाल पुत्रांसह मुसलमानांच्या विरोधात महाराजांकडून लढला. नूरखान बेग हा शिवाजी महाराजांचा सरनौबत होता. यावरून असे लक्षात येते की; शिवाजी महाराजांचा लढा हिंदू विरुद्ध मुसलमान असा असता तर हे घडले असते का?
            तेंव्हा तरुणांनी, तमाम भारतीयांनी छत्रपती नीट समजून घ्यावेत. हिंदू-मुस्लीम धर्मद्वेष पेरण्याचा प्रयत्न करू नये. कमी वयात स्वराज्य स्थापनेचा महान पराक्रम आणि शौर्य-धैर्य अंगी उतरवून छोट्या-मोठ्या संकटांना न जुमानता आपले इप्सित ध्येय्य साध्य करावे! यासाठी सर्वांनी कार्यतत्पर असणे म्हणजे खऱ्या अर्थाने शिवजयंती साजरी करणे होय! जय हिंद! जय शिवराय!

प्रा.डॉ.विठ्ठल खंडूजी जायभाये
कै.रमेश वरपूडकर महाविद्यालय, सोनपेठ
जि. परभणी (महाराष्ट्र)
मो. 9158064068

(टीप: लेखक हे व्याख्याता, शिवचरित्रकार, कवी, किर्तनकार, समीक्षक, योग-प्राणायाम प्रशिक्षक आहेत.) 

________________________

🪀सर्व महत्वाच्या अपडेट मिळवा Whatsapp वर नंबर सेव्ह करा व लोकनेता न्युज ला जॉईन व्हा 👉 https://join.elokneta.in/

About Post Author

error: Content is protected !!