May 9, 2024

भाग ५ – जात आणि छत्रपती शिवाजी महाराज

लोकनेता न्युज नेटवर्क

जात हा भारताला लागलेला आजीवन कर्करोग आहे. “जातीसाठी खावी माती” म्हणून जाणूनबुजून जात जिवंत ठेवली जातेय. यावर भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी “भारतातील जाती” हा संशोधन निबंध लिहून जात हा विषय किती भयंकर आहे हे सांगितले आहे. वर्ण, जाती-पोटजाती किती समाजविघातक, मानवतेला काळीमा फासणाऱ्या आहेत याचे विवेचन केले. “जोपर्यंत भारतातील जाती नष्ट होणार नाहीत तोपर्यंत राष्ट्र म्हणून एकोप्याची भावना देशात रुजणार नाही. त्यामुळे भारतातील जाती हा राष्ट्रीय नाही तर आंतरराष्ट्रीय प्रश्न झाला आहे. भारतावर आर्य, द्रविड, मंगोलियन, सिंथियन, मुघल, फ्रेंच, पोर्तुगीज, डच, इंग्रज यांनी भारतातील विविध प्रदेशांवर आक्रमणे झाली. क्रांती-उत्क्रांती घडून आल्या. वर्णसंकर झाला. कोणतीच जात किंवा वंश शुद्ध राहिला नाही.” असा इतिहास असतांना आज जातीय अभिनिवेश ठासून सांगितले जातात. उच्च शिक्षितसुद्धा ‘आमचीच जात-वंश-धर्म श्रेष्ठ’ अविर्भावात मोठेपण मिरवतात. एवढ्यापुरते ठीक, परंतु दुर्दैवाने लोकांनी ही कीड महापुरुषांना सुद्धा लावली. आज वेगवेगळ्या जातींनी इथले महापुरुष वाटून घेतलेत. तहहयात ज्यांनी जाती निर्मूलनाचे कार्य केले, त्यांना सुद्धा लोकांनी जातींच्या कंपूत बंदिस्त केले. हे मोठे भयंकर आणि हस्यास्पद आहे!
            आज छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा जात, रंग किंवा धर्माच्या कट्टरतेतून पहिले जात आहे. त्यांना जाती-धर्माच्या चौकटीत अडकवले जात आहे. शिवाजी महाराजांनी कोणत्या धर्म-जातीसाठी स्वराज्य उभारले नाही. त्यांना रयत आणि प्राध्यान्याने रयतेचा असलेल्या हिंदू धर्माचे रक्षण करणे हे महत्वपूर्ण उद्दिष्ट होते, परंतु त्याचा अर्थ सांप्रतकाळी लावून हिंदू-मुसलमान धर्मद्वेष पसरवणे असा अजिबात होत नाही. शिवाजी महाराजांचे प्राणपणाने रक्षण केले त्या लोकांनी महाराजांची जात-धर्म पहिला नाही. रयतेच्या अब्रूचे, शेतीचे रक्षण करणारा आपला माणूस हे एकमेव गणित जनमानसाच्या मनीमानसी असल्यामुळेच अठरापगड जातीच्या लोकांना एकत्र करून छत्रपती आपले लोकराज्य उभे करू शकले. शिवाजी महाराजांचे युद्ध कुणाविरुद्ध होते? या संदर्भाने रियासतकार सरदेसाई ‘मराठी रियासत’मध्ये लिहितात, “विजापूरकरांशी युद्ध म्हणजे हिंदू-मुसलमानातील युद्ध नव्हे. अशा प्रकारचे स्वरूप त्या युद्धास येणे शक्य नव्हते. शिवाजींची मोठी अडचण विजापूरकरांच्या ताब्यात गुंतलेली मोठमोठी मराठे सरदार घराणीही होती. त्यांच्या मनात शिवाजीबद्दल आदर किंवा पूज्यबुद्धी नव्हती. मोहिते, मोरे, सावंत, दळवी, सुर्वे, निंबाळकर आदि शेकडो सरदार आरंभापासून कमी-जास्त प्रमाणात शिवाजीच्या विरुद्ध होते.” एवढेच काय “व्यंकोजी भोसले व मंबाजी भोसले हे अगदी जवळचे भाऊबंदही विरोधी होते. आईकडून नातेसंबंध असलेले जगदेवराव जाधव, राथोजी माने हे सुद्धा विरोधी होते” महाराजांचे नातलगच महाराजांच्या विरोधात होते. याशिवाय शाहिस्तेखान जेंव्हा महाराजांवर चालून आला तेंव्हा त्याच्याबरोबर “महाराष्ट्रातील सुखाजी गायकवाड, दिनकरराव काकडे, रंभाजीराव पवार, सर्जेराव घाटगे, कमलोजीराव काकडे, त्र्यंबकराव खंडागळे, कनकोजीराव गाडे” आदि एतद्देशीय मराठे सरदार महाराजांच्या विरोधात उभे ठाकले. यावरून आपण सहजतेने लक्षात घ्यावे ते म्हणजे, सर्वांची आपापल्या वतनावर, संपत्तीवर निष्ठा होता. रयतेचे निर्भय, सुजलाम-सुफलाम राज्य उभे करण्याचा मानस केवळ छत्रपती शिवाजी महाराजांचाच होता.  
            याउलट शिवा काशीद, जीवा महाला, बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे, नेताजी पालकर आदि अठरापगड जातीतील मावळ्यांनी “लाख मेले तरी चालतील, मात्र लाखोंचा पोशिंदा जगला पाहिजे” या न्यायाने जीवाची बाजी लावून इतिहासांत अजरामर झाले. तेंव्हा तमाम शिवप्रेमी वाचकांना माझे नम्र आवाहन आहे, कृपया कोणत्याही महापुरुषाला जाती-धर्माच्या कक्षेत बंदिस्त करू नका. त्या त्या काळातील परिस्थितीनुसार त्या माणसांनी केलेले क्रांतिकारी, दैदिप्यमान कार्य आपल्यासाठी नित्य प्रेरणा राहिले पाहिजे. या महामानवांचा संघर्ष आणि कठीण परिस्थितीत त्यांनी आलेल्या प्रसंगी मोठ्या धीरोदात्तपणे उभे राहून विजय संपादन केला. हे कार्य कोणत्या जाती-धर्मासाठी आदर्श नसते. हे कार्य तमाम मानवकल्याणाकरिता दिपस्तंभ असते! याचे मनोमन भान-जाण ठेवून आणि निर्व्यसनी राहून येणारी शिवजयंती साजरी होणे म्हणजेच छत्रपतींना खरा मनाचा मुजरा असेल! जय हिंद! जय शिवराय!

प्रा.डॉ.विठ्ठल खंडूजी जायभाये
कै.रमेश वरपूडकर महाविद्यालय, सोनपेठ
जि. परभणी (महाराष्ट्र)
मो. 9158064068

(टीप: लेखक हे व्याख्याता, शिवचरित्रकार, कवी, किर्तनकार, समीक्षक, योग-प्राणायाम प्रशिक्षक आहेत.) 

_________________________

🪀सर्व महत्वाच्या अपडेट मिळवा Whatsapp वर नंबर सेव्ह करा व लोकनेता न्युज ला जॉईन व्हा 👉 https://join.elokneta.in/

About Post Author

error: Content is protected !!