May 19, 2024

“खातेदाराची ३१ लाखांची फसवणूक” बँक ऑफ महाराष्ट्र नवघर प्रकार ; उरण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

लोकनेता न्युज नेटवर्क

उरण :- उरण तालुक्यातील भेंडखळ गावच्या प्रज्वला लक्ष्मण ठाकूर यांचे बँक ऑफ महाराष्ट्र नवघर शाखेत खाते होते. त्यांच्या खात्यावरील ३१ लाखांची रक्कम परस्पर काढून त्यांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. या संदर्भात उरण पोलीस ठाण्यात नवघर येथे असलेले बँक ऑफ महाराष्ट्र बँकेचे कर्मचारी मकरंद भोईर व चेतन इंटरप्रायझेस यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




 

      फिर्यादी यांचे बँक ऑफ महाराष्ट्र नवघर शाखा येथे बँक खाते आहे. त्यांनी मुलीच्या नावे २० लाख रुपयांची एफडी करावयाची असल्याचे सांगितले. एफडी करण्यासाठी बँक कर्मचारी मकरंद भोईर याच्यावर विश्वास ठेवून चेक बुक व पास बुक त्याच्याकडे दिले. त्यानंतर अनेक दिवस उलटूनही फिर्यादीला एफडी प्रमाणपत्र न मिळाल्याने त्यांनी २७/२/२०२३ रोजी बँकेत जाऊन विचारणा केली असता त्यांच्या खात्यावर अवघी २४ हजार सातशे अठ्ठेचाळीस इतकी रक्कम असल्याचे निदर्शनास आले.

बँक मॅनेजर यांनी फिर्यादीला बचत खात्याचा तपशील समजवून सांगितला असता त्यांच्या खात्यावरील २० लाख दि. २७/६/२०२२ रोजी व रुपये १० लाख दि. २१/१०/२०२२ रोजी आरोपी नंबर २ चेतन इंटरप्रायझेस या खात्यावर जमा झाल्याचे दिसते. तर रुपये १ लाख दि. ६/१०/२०२२ रोजी आरोपी नंबर १ मकरंद भोईर याने काढून घेतल्याचे उघड झाले आहे. यावरून बँक कर्मचारी मकरंद भोईर व चेतन इंटरप्रायझेसचा खातेदार यांनी संगनमताने फिर्यादीची एकूण ३१ लाखांची फसवणूक केल्याचा गुन्हा उरण पोलीस ठाण्यात २२/४/२०२३ रोजी दाखल झाला आहे. या प्रकरणी आरोपी विरोधात भादवी कलम ४२० व ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




 

      याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिवराज सोनवणे हे अधिक तपास करीत आहेत. बँकेतून एवढ्या मोठ्या प्रमाणात रक्कम वर्ग करताना महाराष्ट्र बैंक नवघर शाखेच्या मॅनेजर किंवा इतर कर्मचाऱ्यांनी हलगर्जीपणा केल्याचे उघड होते, अन्यथा त्यांचा ही यामध्ये हात असल्याचा संशय फिर्यादीने व्यक्त केला आहे.दोषीवर त्वरित कायदेशीर कारवाई करून सदर रक्कम त्वरित मिळावे अशी मागणी प्रज्वला ठाकूर यांनी केली आहे.

_____________

🪀सर्व महत्वाच्या अपडेट मिळवा Whatsapp वर नंबर सेव्ह करा व लोकनेता न्युज ला जॉईन व्हा 👉 https://join.elokneta.in

About Post Author

error: Content is protected !!